सावित्री देवी : हिटलरला विष्णूचा अवतार मानणारी साडीतली नाझी

    • Author, मारिया मार्गारोनिस
    • Role, बीबीसी न्यूज

जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरचा आज मृत्यूदिन आहे. 30 एप्रिल 1945 रोजी हिटलरचा मृत्यू झाला. हिटलरवर प्रेम करणाऱ्या सावित्री देवींची ही कहाणी...

हिटलरच्या चाहत्या आणि आर्य वंशवादावर नि:सीम प्रेम करणाऱ्या सावित्री देवी या त्यांच्या मृत्यूनंतर विस्मरणात गेल्या होत्या. पण अतिरेकी उजव्या विचारधारेच्या उगमानंतर त्यांचं नाव पुन्हा पुन्हा इंटरनेटवर चर्चेत येताना दिसत आहे.

2012 मध्ये एका लेखावर संशोधन करताना मी ग्रीसच्या 'गोल्डन डॉन पार्टी'च्या वेबसाईटवर गेले. तेव्हा माझी नजर एका छायाचित्रावर खिळली.

निळ्या साडीतली एक महिला संध्याकाळच्या पार्श्वभूमीवर असलेल्या हिटलरच्या छायाचित्राकडे रोखून पाहत असल्याचं चित्रात दिसत होतं.

ग्रीसमध्ये असलेल्या परदेशी नागरिकांना हुसकावून लावा, असं या पक्षाचं उघड मत आहे. मग एका वंशवादी पक्षाच्या वेबसाइटवर या हिंदू महिलेचं छायाचित्र का असावं?

माझ्या मनात त्या महिलेबाबत एक जिज्ञासा निर्माण झाली. युरोप आणि अमेरिकेत अतिरेकी उजव्या विचारधारेची लाट आल्यानंतर पुन्हा त्यांचं नाव चर्चेत आलं आहे.

कोण होत्या सावित्री देवी?

तर कोण होत्या या सावित्री देवी? का त्यांच्या विचारांची पुन्हा चर्चा होत आहे? जरी त्या साडीमध्ये दिसत असल्या तरी त्या भारतीय नव्हत्या.

त्यांची आई इंग्रज होती तर वडील ग्रीक-इटालियन होते. त्यांचं नाव मॅक्सिमियानी पोर्तास असं होतं. त्यांचा जन्म लियॉनमध्ये 1905 साली झाला होता.

सुरुवातीपासूनच त्या समानतेच्या तत्त्वांविरोधात तुच्छतेने बोलत असत. 'सुंदर मुलगी आणि कुरूप मुलगी या दोघी समान कशा असू शकतात?' असं मत त्यांनी एका मुलाखतकारासमोर मांडलं होतं.

'हॉलोकॉस्ट डिनायर' (हिटलरने ज्यूंचा वांशिक संहार केला नाही, असं मानणारा वर्ग) नावाच्या मासिकातल्या अर्न्स्ट झुंडेल यांनी 1978 मध्ये त्यांची मुलाखत घेण्यासाठी एका व्यक्तीला पाठवलं होतं. त्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपलं मत मांडलं होतं.

त्यांच्यावर ग्रीक राष्ट्रवादाचा प्रभाव होता. 1923 मध्ये त्या अथेंसमध्ये आल्या. पहिलं जागतिक युद्ध संपल्यानंतर ग्रीसच्या सैन्याला अपमान पत्करावा लागला होता.

या अपमानासाठी त्यांनी पाश्चिमात्य आघाडीला दोषी ठरवलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की ग्रीस आणि जर्मनी हे दोन देश पीडित आहेत.

'हिटलर विष्णूचा अवतार'

आजकाल त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची चर्चा इंटरनेटवर सतत होताना दिसते, विशेषतः 'द लाइटनिंग अॅंड सन्स' हे पुस्तक नव-नाझी ऑनलाइन फोरमवर चर्चेत दिसतं.

'हिटलर हा विष्णूचा अवतार आहे,' असा सिद्धांत या पुस्तकात त्यांनी मांडला होता. भविष्यात राष्ट्रीय समाजवादाचा उदय होईल यावर विश्वास ठेवावा असं देखील या पुस्तकात त्यांनी म्हटलं होतं.

अमेरिकेतील अतिरेकी उजव्या विचारधारेची वेबसाईट 'काउंटर करंट'वर त्यांच्या संदर्भातील माहिती उपलब्ध आहे.

या विचारसरणीचे नेते रिचर्ड स्पेंसर आणि ब्रिटबॅट न्यूजचे अध्यक्ष स्टीव्ह बॅनन यांच्या प्रचारामुळे सावित्री देवींचे विचार खूप लोकांपर्यंत पोहचत आहेत.

'इतिहास म्हणजे चांगल्या विरुद्ध वाईटांचा संघर्ष' असा सिद्धांत सावित्री देवींनी मांडला होता. गंमत म्हणजे असा सिद्धांत मांडणाऱ्या त्या एकट्याच नव्हत्या.

त्यांच्याप्रमाणेच 20 शतकातील एका फॅसिस्ट विचारवंताने देखील असाच विचार मांडला होता. या सिद्धांताचा दाखला स्पेन्सर आणि बॅनन यांनी दिला.

अमेरिकेतील काही डार्क मेटल बॅंड आणि रेडिओ स्टेशनवर कलियुगाबाबत नेहमीच ओरड होताना दिसते. हिंदू पुराणांप्रमाणे कलियुग हे अंधकारमय आहे. सावित्री देवी म्हणत असत या कलियुगाचा अंत हिटलरच्याच हाताने होईल.

भारतात आगमन

हिटलरने ज्यू लोकांविरोधात केलेल्या कृत्याचं त्यांनी समर्थन केलं होतं. आर्य वंशाला वाचवण्यासाठी हे पाऊल अपरिहार्य होतं, असं त्यांनी लिहिलं होतं.

त्या हिटलरला आपला 'फ्यूरर' मानत असत. जर्मनीमध्ये फ्यूरर म्हणजे नेता किंवा मार्गदर्शक.

1930 च्या सुरुवातीला त्या भारतात आल्या. भारतात जात व्यवस्थेमुळे भिन्न वंशाचे लोक लग्न करत नाहीत. त्यामुळे भारतातच शुद्ध आर्य वंशाचे लोक आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं.

त्यांच्यावर इंग्रज अधिकाऱ्यांचं लक्ष असायचं, म्हणून त्या नेहमी रेल्वेतून सामान्य लोकांच्या डब्यातूनच प्रवास करत असत. पण तसं तर त्यांना इंग्रजांशी काही देणं-घेणं नव्हतं.

सावित्री देवींनी भारतीय भाषा शिकल्या. त्यांनी एका हिंदू ब्राह्मण पुरुषासोबत विवाह केला. आपला पतीदेखील आपल्याप्रमाणेच आर्य आहे, अशी त्यांची धारणा होती.

त्यांनी हिंदू पुराण आणि फॅसिझम दोन्ही एकत्र केलं. 'हिटलर हा काळाच्या प्रवाहाविरुद्ध जाणारा नेता आहे. तो एके दिवशी कलियुगाचा अंत करून सुवर्ण युग आणेल,' असं त्या म्हणत असत.

भारतात केला हिंदुत्वाचा प्रचार

याच काळात त्या कोलकातामध्ये हिंदू राष्ट्रवादाचा प्रचार करण्याचं काम करत होत्या. ब्रिटिश राजवटीत भारतात धार्मिक गटांमधलं राजकारण वाढलं, तेव्हा हिंदुत्वाच्या चळवळीला बळ मिळालं.

हिंदू हेच आर्यांचे खरे वंशज आहेत आणि भारत हे एक हिंदुराष्ट्र आहे असं या चळवळीच्या काळात म्हटलं जात होतं.

सावित्री देवी यांनी या चळवळीची संचालक स्वामी सत्यानंद यांच्यासोबत काम केलं होतं. हिंदुत्वाबरोबरच फॅसिझमबद्दल आपले विचार प्रगट करण्याची परवानगी सत्यानंद यांनी सावित्री देवींना दिली होती.

सावित्री यांनी भारतभर दौरे केले होते. त्या लोकांशी बंगाली किंवा हिंदीतून संवाद साधत असत. आर्यांचं काय महत्त्व आहे, याची चर्चा त्या त्यांच्यासोबत करत असत.

नाझी लोकांच्या ऱ्हासानंतर त्या 1945 मध्ये युरोपमध्ये परतल्या. इंग्लंडला पोहोचल्यावर काय झालं, याची कथा त्यांच्या 'लाँग व्हिस्कर अॅंड द टू लेग्ड गॉडेस' या पुस्तकात आहे.

हे पुस्तक त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलं होतं. या पुस्तकातील नायिका नाझी आणि मांजरांवर प्रेम करणारी दाखवण्यात आली होती.

'या कथेतील नायिका 'हिलियोडोरा' ही प्राण्यांवर खूप प्रेम करते. लोकांचा प्राण्यांप्रती असलेला दृष्टिकोन पाहून ती नायिका दुःखी होते,' असं त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं होतं.

'हिटलर की जय'

हिटलरप्रमाणेच त्या नेहमी शाकाहार करत असत. त्या जगाकडे आपल्याच नजरेतून पाहत असत आणि निसर्गाच्या जवळ जाऊन त्याचा अनुभव घ्यावा असं त्यांना वाटत असे.

आइसलॅंडमधील हेकलाच्या पर्वतरांगांमध्ये त्यांनी दोन रात्र मुक्काम ठोकला होता. ज्वालामुखीचा उद्रेक याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी त्या तिथे गेल्या होत्या.

आपल्या या अनुभवावर त्यांनी लिहिलं आहे, "निर्मितीचा मूळ स्वर हा ओम आहे. ज्वालामुखीतून प्रत्येक दोन तीन सेकंदानंतर ओम ओम हा ध्वनी निघत होता आणि पायाखालची जमीन हलत होती.'

1948ला त्या जर्मनीत गेल्या. त्या ठिकाणी त्यांनी नाझींच्या समर्थनासाठी पत्रकं वाटली आणि घोषणा दिल्या. 'एके दिवशी आमचा उदय होईल आणि विजय होईल. आशा आणि विश्वास ठेवा. वाट पाहा. हिटलर की जय,' असं त्यांनी पत्रकावर लिहिलं होतं.

त्यांना इंग्रज सरकारने अटक केली होती. त्या अटकेबाबत त्या म्हणतात, 'ही तर माझ्यासाठी आनंदाची बाब होती. या अटकेमुळं मी माझ्या नाझी साथीदारांच्या जवळ पोहोचले.'

नंतर सावित्री देवी यांच्या पतींनी इंग्रज सरकारच्या मदतीने त्यांची शिक्षा कमी करवून घेतली होती.

पुन्हा भारतात परतल्या

सावित्री देवी आणि त्यांच्या लग्नाबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही, असं जाणकारांचं मत आहे. त्यांचं लग्न असित मुखर्जींसोबत झालं होतं. पण त्यांच्या दोघांच्या जाती भिन्न होत्या म्हणून त्यांचं लग्न झालं नसावं, असं काही जण म्हणतात.

आपल्या आयुष्याच्या शेवटची काही वर्षं त्यांनी भारतात घालवली. त्या दिल्लीमध्ये एका सदनिकेत राहू लागल्या. आजूबाजूच्या मांजरांना त्या खाऊ घालत असत.

त्यांना दागिन्यांची हौस होती. हिंदू महिला ज्या पद्धतीचे दागिने त्या काळी परिधान करत असत, तसेच दागिने त्या वापरत असत.

नंतर त्या पुन्हा इंग्लंडला गेल्या. 1982 मध्ये त्यांचं इंग्लंडमध्ये निधन झालं. त्यांच्या अस्थी अमेरिकन नाझी नेता जॉर्ज लिंकन रॉकवेल यांच्या बाजूला ठेवण्यात आल्या होत्या.

सावित्री देवी यांच्याबाबत कुणाला फारसं माहीत नाही. भारतात त्यांची आठवण काढली जात नाही.

आज सावित्री देवींना भारतात ओळखणारी व्यक्ती सापडणं कठीण आहे. पण त्यांनी हिंदू राष्ट्रवादाच्या प्रचारात भारतात काही काळ घालवला होता, हे देखील सत्य आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)