तेलंगणा : पुजाऱ्याशी लग्न करणाऱ्या महिलेस मिळणार 3 लाख

तेलंगणामध्ये पुजाऱ्यांशी लग्न करणाऱ्या महिलेस धनलाभ होणार आहे. ब्राह्मण पुजाऱ्याशी लग्न करणाऱ्या महिलेला तब्बल 3 लाख रूपये मिळणार आहेत.

तेलंगणा ब्राह्मण कल्याण मंडळानं ही घोषणा केली आहे. या घोषणनेनंतर तेलगंणामधील जनतेतून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मंदिरातील पुजाऱ्यांकडे असलेल्या आर्थिक चणचणीमुळे त्यांना लग्नासाठी मुली मिळण्यात अडचणी येत आहेत.

आणि म्हणूनच त्यांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टीनं ही घोषणा करण्यात आली आहे.

असं तेलंगणा ब्राह्मण कल्याण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

घोषणेवर टीका

"मंदिर आणि संस्कृती हे पुजाऱ्यांशिवाय चालू शकणार नाही. या निर्णयानं या समूहाला चांगला लाभ मिळेल." असं ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष के. व्ही. रमणाचारी यांनी सांगितलं.

तसंच या विषयावर बोलताना 'महा ब्राह्मण संघम, तेलंगणा'चे मुख्य सचिव अवधानुला नरसिंह शर्मा म्हणाले, "गरीब ब्राह्मणांची मदत करण्यासाठी आणि त्यांचे कल्याण करण्यासाठी तसंच संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी असे निर्णय आवश्यक आहेत."

तेलंगणा सरकारनंही यासाठी 2016-17 च्या अर्थसंकल्पात ब्राह्मणांच्या कल्याणासाठी 100 कोटींची तरतूद केली आहे.

पुजारी गरीब असले तरी मंडळाच्या निर्णयावरून समाजातील अनेकांकडून टीकाही होऊ लागली आहे.

एकाच वर्गाचं हित?

सामाजिक विकास परिषद या संस्थेच्या संचालक कल्पना कन्नाभिरन याबद्दल आपलं मत मांडताना म्हणाल्या की, "असे निर्णय असंवैधानिकच समजले पाहिजेत. संघटना आपला मूळ उद्देश लपवत आहे."

"कुणाचही लग्न हे राज्य सरकारची जबाबदारी कशी काय असू शकते? जर कुणी एकटा राहिला असेल तर ती सरकारची समस्या आहे काय?" असे सवाल त्यांनी उपस्थित केलेत.

विवाहाच्या मुद्द्यावर आर्थिक मदत देण्याच्या नावाखाली समाजातल्या एका वर्गाचं हित जपण्याचा हा प्रकार असल्याचेही त्या म्हणाल्या.

"देशाच्या संविधानानुसार, समाजातील मागासवर्गीयांसाठी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे हे सरकारचं कर्तव्य आहे. या कक्षेत न येणाऱ्या गोष्टींसाठी पैसा खर्च करणे योग्य नाही."

"लग्न काय पैशांव्यतिरिक्तही होऊ शकतं. अशा योजना म्हणजे समाजाचा स्तर घसरत चालल्याचं उदाहरण आहे. अशा निर्णयांमधून जाती व्यवस्थेची मुळं घट्ट होतात." असंही त्यांनी सांगितलं.

हिंदू विवाह कायद्याचं उल्लंघन

"या योजनेमुळं हिंदू विवाह कायद्याचं उल्लंघन झालं आहे." असं मत हायकोर्टमधील वकील रचना रेड्डी यांनी मांडलं.

तर, सामाजिक कार्यकर्त्या देवी म्हणाल्या की, "या योजनेवरून असं वाटतंय की, पुजाऱ्यांना हुंडा दिला जात आहे."

दरम्यान, आम्ही काही दिवसांमध्ये या योजनेचं विवरण जाहीर करू असं ब्राह्मण परिषदेनं जाहीर केलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)