सुप्रीम कोर्ट : 18 वर्षांखालील पत्नीशी शरीरसंबंध म्हणजे बलात्कारच

सुप्रीम कोर्टाने बुधवारी अल्पवयीन पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवण्याविषयी महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

18 वर्षांखालील पत्नीशी शरीर संबंध ठेवणे हा गुन्हा असून त्याला बलात्कार समजलं जाईल, असं कोर्टानं म्हटलं आहे.

कोर्टाच्या निर्णयानुसार अल्पवयीन पत्नी ही एक वर्षाच्या आत तक्रार दाखल करू शकते.

असं असलं तरी बलात्काराच्या प्रकरणात संबधित भारतीय दंडसंहिता 375 मध्ये एक अपवाद पण आहे. त्यानुसार विवाहांतर्गत बलात्कार हा गुन्हा समजण्यात आलेला नाही. म्हणजे पती आपल्या पत्नीच्या संमतीशिवाय तिच्याशी शरीर संबंध ठेवत असेल तर तो गुन्हा नाही.

काही दिवसांपूर्वी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने विवाहांतर्गत बलात्कारच्या एका प्रकरणात याला गुन्ह्याच्या श्रेणीत टाकू नये, असं म्हटलं होतं.

"याला गुन्हा समजल्यास विवाह संस्था अस्थिर होईल. पतींना त्रास देण्यासाठी याचा गैरवापर केला जाऊ शकेल," असं दिल्ली हायकोर्टात केंद्र सरकारनं म्हटलं होतं.

'इंडिपेन्डंट थॉट' नावाच्या संस्थेने याविषयी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ही संस्था मुलांच्या अधिकाराशी संबंधीत कायद्यांवर काम करते. 2013ला ही याचिका कोर्टात पोहोचली होती.

निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे

  • अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवणं म्हणजे बलात्कारच आहे.
  • यापूर्वीच्या कायद्यानुसार 15 वर्षांखालील मुलीशी शारीरिक संबंध ठेवणेच गुन्हा मानला जायचा. आता हे वय 18 पर्यंत आणले आहे.
  • अल्पवयीन मुलीसोबत तिच्या पतीने शारीरिक संबंध ठेवल्यास तिला याबद्दलची तक्रार वर्षभरात दाखल करावी लागेल.
  • 'आयपीसी'चे कलम ३७५ (२)च्या वैधानिकतेवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल.
  • 2016 च्या राष्ट्रीय कौटुंबिक स्वास्थ्य सर्वेक्षणानुसार देशात 27 टक्के मुलींची 18 वर्षांच्या आतच लग्न होतात. 2005 मध्ये याच सर्वेक्षणात हा आकडा 47 टक्के होता.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)