You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुकन्या आणि आरव : भारतातील पहिलं ट्रान्सजेंडर जोडपं लवकरच लग्न करणार
- Author, सुप्रिया सोगळे
- Role, बीबीसी हिंदीसाठी
केरळचे आरव आणि सुकन्या हे भारतातील पहिलं पूर्णपणे ट्रांसजेंडर जोडपं आहे. ते लवकरच लग्न करणार आहेत.
सुकन्याची अंतिम लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया बेंगळुरूमध्ये संपली आहे. एकदा ती पूर्णपणे बरी झाली की दोघांचा लग्नाचा इरादा आहे. दरम्यान, सुकन्या आणि आरवच्या प्रेम कथेविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
एकीकडे त्यांना भरभरून समर्थन मिळत आहे. तर दुसरीकडे मात्र फेसबुकवरून आरव आणि सुकन्याला जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा मिळत आहेत. पण त्याचबरोबर त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे.
आरव अप्पुकुटन जेंव्हा बाईचा पुरुष होतो...
आरव अप्पुकुटन हा केरळमधल्या मध्यम वर्गीय कुटुंबात बिंदू (मुलगी) म्हणून जन्माला आला. त्याचे वडील मेकॅनीक होते तर आई टेलरींगच काम करायची.
लहानपणापासूनच पुरूषी कामात बिंदूला रस होता. तेंव्हा पासूनच त्याच्यामधील आणि दुसऱ्या मुलींमधील फरक समजून आल होता. पण, कुणाला सांगताही येत नव्हतं.
सातवीत गेल्यावर आरवला मात्र राहावलं नाही. आपल्या मनातली धगधग त्यानं आईसमोर मांडली.
आईनं त्याला फॅमिली डॉक्टरकडे नेले. तेंव्हा डॉक्टरनं या गोष्टी स्पष्ट होण्यासाठी अजून थोडा वेळ द्यायला सांगितलं.
वय जसं वाढत गेलं तसं आरवला मुलींच्या घोळक्यात राहणं आवडेनासं झालं. लोकांमध्ये याबद्दल जागरूकता नसल्यानं डॉक्टरांकडेही यावर काही उपाय नव्हता.
दरम्यान, आरव कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्याच्या आईचं निधन झालं. त्याच दरम्यान वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि पोटच्या मुलांना सोडून दिलं.
त्यामुळे लहान बहिणीची जबाबदारी आरवकडे आली, त्याला शिक्षण सोडून काम करणं भाग पडलं.
खूप कष्टानं त्याला 1993 साली मुंबईत पर्यटन क्षेत्रात नोकरी मिळाली. जवळ-जवळ आठ वर्ष नोकरी करत आरवनं आपल्या बहिणीचा संभाळ केला.
पुढे त्याला दुबईत नोकरीची संधी मिळाली. दुबईला वर्षभर नोकरी केल्यानंतर मुंबईला येऊन आरवनं आपल्या छोट्या बहिणीचं लग्न लावून दिलं. आणि परत दुबईला गेला.
सर्व काही सुरळीत सुरू असतांना परिस्थितीनं पुन्हा घाव घातला. व्हॉलीबॉल खेळत असताना पाय मोडला आणि आरवला सहा महिने घरीच पडून राहावं लागलं.
मुंबईला येऊन उपचार करायचं ठरवलं. पण, मुंबईच्या डॉक्टरांकडे यावर काही उपाय नव्हता. परिणामी आरवला 5 वर्ष कुबडयांचा आधार घ्यावा लागला.
त्यादरम्यान त्याला एका मैत्रीणींची खूप मदत झाली. पकृती ठणठणीत झाल्यानंतर आरवनं दुबई गाठली आणि नोकरी सुरू केली.
त्याच दरम्यान तो प्रेमातही पडला. पण, ते खूप काळ चाललं नाही. हताश झालेल्या आरवनं मुंबईला येऊन पहिल्यांदा लिंग परिवर्तन करायचं ठरवलं.
सुकन्या कृष्णा जेंव्हा पुरुषाची स्त्री होते...
दुसऱ्या बाजुला, सुकन्या कृष्णा केरळच्या एका कुटुंबात 'मुलगा' म्हणून जन्माला आली. लहानपणीच वडिलांच छत्र हरपलेल्या सुकन्येला बाहुल्यांशी खेळायला खूप आवडायचं.
तिच्या अशा वागण्यामुळे शाळेमध्ये इतर मुलांकडून सतत अवहेलना सहन करावी लागली. मार आणि शिव्या खाव्या लागल्या. कधीकधी तर धमक्या सुद्धा मिळाल्या.
सुकन्या मोठी होत गेली तसं पालकांना तिचे हावभाव लक्षात येऊ लागले. त्याच वेळी सुकन्यालाही फॅमिली डॉक्टरांकडे नेण्यात आलं.
डॉक्टरांनी तिच्या हार्मोन्समध्ये असंतुलन असल्याचं कारण सांगितलं. सुकन्याला सलग दोन वर्ष पुरूषी हार्मोन्सची इंजेक्शन्स देण्यात आली.
त्यामुळे ती पुरुषासारखी तर दिसायला लागली. पण, त्याचा तिच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून आला.
हार्मोन्सचे उपचार सुरू असतांनाच दहावीचा दुसरा पेपर देऊन घरी परतत असतांना ती बेशुद्ध पडली. तब्बल 16 तासानंतर ती शुद्धीवर आली.
अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये घालवल्यानंतर यापुढे पुरूषी हार्मोन्सची इंजेक्शन्स घेणं बंद करण्याचं तिनं ठामपणे ठरवलं.
तसंच एक मुलगी म्हणून पुढचं आयुष्य जगण्याचा निर्णय तिनं घेतला. पण, आईनं तिला कडाडून विरोध केला.
सुकन्या ऐकत नाही हे लक्षात आलेल्या आईनं तिला मारहाणही केली. एवढचं नाही तर तथाकथीत तांत्रिक आणि ज्योतिष्याची सुद्धा मदत घेतली.
शेवटी सुकन्यानं आत्महत्या किंवा लिंगपरिवर्तन या दोनच अटी आईसमोर ठेवल्या. त्यानंतर मात्र आईनं लिंगपरिवर्तनाची परवानगी दिली आणि सुकन्या उपचारासाठी बेंगलुरूला गेली.
हॉस्पीटलमध्ये सुरु झाली प्रेमकथा
नंतर सुकन्या लिंगपरिवर्तन उपचारासाठी केरळ जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये गेली. त्यावेळी आरवही आपल्या मित्राच्या मदतीसाठी तिथं आला होता.
आरवनं जेव्हा सुकन्याला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा तो तिला पाहतच राहीला. सुकन्या त्यावेळी फोनवर तिच्या आईशी मल्याळममध्ये बोलत होती.
त्यावरून ती सुद्धा केरळची असल्याचं आरवला समजलं आणि त्यानं सुकन्याशी बोलायला सुरु केली.
तासाभराच्या बोलण्यात दोघंही ट्रांसजेंडर असून त्यांच्या अडचणी सुद्धा सारख्याच असल्याचं कळालं. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर्स घेतले आणि फोनवर बोलत राहीले.
पुढे जाऊन त्यांच्या या फोनवरच्या या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या मैत्रीनं आरव आणि सुकन्याला खूप आधार मिळाला. त्यांनी एकमेकांची दु:खं वाटून घेतली.
दरम्यान 46 वर्षांच्या आरवला परत तिसऱ्यांदा प्रेमात पडायचं नव्हतं. तर 22 वर्षाच्या सुकन्याला तीन वर्षात दोन वेळा प्रेमाचे प्रस्ताव आले होते.
पण, तिने आधीचं आरवला पसंत केलं होत. याबद्दल त्याला सांगायला मात्र ती लाजत होती. शेवटी आरवनं सुकन्याला लग्नाची मागणी घातली.
जुन्या आठवणींना उजाळा देत सुकन्या सांगते, "आरवला मला पाहिल्यानंतर त्याच्या आईची आठवण येते, असं त्यानं मला सांगितलं. हे बोलून त्यानं माझ मन जिंकल. प्रत्येक अडचणीत तो माझ्यामागे खंबीरपणे ऊभा राहतो आणि मी सुद्धा त्याला साथ देते."
वयोमानानुसार बाळाला जन्म देण्याऐवजी आरव एका मुलीला दत्तक घेण्याचा विचार करतोय. जेणेकरुन त्याच्यानंतर सुकन्या एकटी पडू नये.
"ट्रांसजेंडर्स बाबत आपल्या समाजात खूपच गैरसमज आहेत. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक आई-वडिलांना या समस्येची जाण असायला पाहिजे. अशा प्रसंगात त्यांनी स्वतःहून आपल्या मुलाची साथ द्यायाला पाहिजे. जशी माझ्या आईने मला साथ दिली" असं आरवचं म्हणण आहे.
विरुद्ध शरीरात अडकलेल्या लोकांसाठी हे जोडपं यापुढं काम करणार आहे. आजही त्यांच्याकडं लिंगबदलाच्या उपचाराच्या माहितीसाठी तीन-चार फोन कॉल्स येत राहतात, असं सुकन्याने बीबीसीला सांगितले.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)