दृष्टिकोन : बौद्धधर्म स्वीकारणं मायावतींच्या कारकीर्दीसाठी का महत्त्वाचं?

    • Author, अनिल यादव
    • Role, वरिष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

मायावतींची बौद्ध धर्म प्रवेशाची घोषणा चर्चेत आहे. राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या या घोषणेच्या निमित्ताने त्यांच्या दृष्टिकोनाचा घेतलेला वेध.

हिंदू धर्मातून धर्मांतर करणाऱ्या लोकांचं हिंदुत्ववाद्यांकडून होणाऱ्या छळाबद्दल मायावती चिंतेत आहेत. भाजपने दलित, मुसलमान, आदिवासी यांच्याबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलला नाही तर आपल्या लाखो समर्थकांसह त्या बौद्ध धर्मात प्रवेश करतील, अशी धमकी मायावतींनी दिली होती.

2001 ते 2010 या कालावधीत मुख्यमंत्रीपदी असताना स्वत:च्या मतदारसंघात बौद्धांच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर घसरण असतानाही मायावती एवढ्या चिंतित नव्हत्या. त्यावेळी बौद्ध संघटनांनी याकडे त्यांचं लक्षही वेधलं होतं. मात्र तेव्हा त्यांनी सूचक मौन बाळगलं होतं.

याच काळात मायावती गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठीही गेल्या होत्या. निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीने ब्राह्मणांसोबत युती केल्यावर त्यांनी आपल्या पक्षाचं वर्णन सर्वजन समाज पार्टी असंही केलं होतं.

लखनौ शहरात आपल्या घराच्या बाहेर त्यांनी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि बसपाचं निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तीला नवा आयाम मिळाला.

कांशीराम यांच्या कालावधीत मनुवाद्यांना चिरडून टाकण्याचा हाच हत्ती प्रतीक होता. बसपाचं नवीन घोषवाक्य झालं- 'हाथी नही गणेश है, ब्रह्मा विष्णू महेश है'.

मायावती नागपुरात, पण बौद्धधर्माचा स्वीकार नाही

'सर्वजन समय' काळातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मपरिवर्तनाला पन्नास वर्ष पूर्ण झाली. मायावती 14 ऑक्टोबर 2006ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर उपस्थित होत्या.

आधी दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी त्याप्रसंगी बौद्ध धर्म स्वीकारणं अपेक्षित होतं. बाबासाहेबांच्या धर्मपरिवर्तनाच्या सुवर्णजयंती प्रसंगी मी आणि उत्तराधिकारी मायावती बौद्ध धर्म स्वीकारतील, असं आश्वासन कांशीराम यांनी दिलं होतं.

मायावतींनी त्या कार्यक्रमात बौद्ध धर्मगुरुंचा आशिर्वाद घेतला. मात्र सभेत बोलताना त्या म्हणाल्या, "तुम्ही मला पंतप्रधान करा. त्यानंतरच मी बौद्ध धर्माचा स्वीकार करेन."

हे ऐकून बौद्ध भिक्षू चक्रावून गेले.

अकरा वर्षांनंतर मायावतींना बौद्ध धर्म आणि आंबेडकर यांची आठवण होणं, हे गंभीर आहे. सरळसरळ बोलायचं तर मायावतींनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिला आहे - दलितांच्या प्रचंड लोकसंख्येला बौद्ध धर्मात रुपांतर करायला मी सांगेन. आणि तसं झालं तर तुम्ही हिंदुत्वाचं राजकारण कसं कराल?

याचाच अर्थ काही अटींवर मायावती हिंदूधर्मीय राहतील. मात्र त्या अटीचं पालन झालं नाही तर मोठ्या प्रमाणावर दलितांसह बौद्ध धर्मात प्रवेश करतील.

"आरएसएस आणि भाजपसाठी ही दुखरी नस आहे. हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म देऊन लोकसंख्या वाढवली नाही, तर आपल्याच देशात मुसलमानांप्रमाणे अल्पसंख्याक व्हाल," असं सांगून हिंदुत्ववादी हिंदूंना धमकावतात.

याच धर्तीवर मायावतींनी हिंदूधर्म वाचवण्याची शक्कल त्यांनी हिंदुत्तवाद्यांकडूनच घेतली.

मायावतींना तुरुंगवास झाला असता

बसपाचं मुख्य लक्ष्य असलेला दलित समाज या पक्षापासून दुरावला आहे. मात्र केवळ हेच या पक्षासमोरचं संकट नाही. बाकी समस्यांनी देखील बसपाला घेरलं आहे.

भाजपशी संधान केलं नसतं तर मायावतींना पुन्हा एकदा तुरुंगवास भोगावा लागला असता.

उत्तर प्रदेशात निवडणुकांपूर्वी विरोधकांची आर्थिक रसद तोडण्यासाठी भाजपनं कंबर कसली. नोव्हेंबर 2016च्या नोटाबंदीच्या आदेशामुळे बसपाला कोट्यवधी रुपये बँकेत जमा करावे लागले. हे पैसे देणगीतून जमा झाले होते का, की ते आणखी कुठून आले होते, याचा तपास सध्या आयकर विभाग करत आहे.

तसंच, मायावतींकडे उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचं प्रकरणही अद्याप न्यायालयात आहे. मायावतींचा भाऊ आनंद कुमार यांच्या बोगस कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना राज्यातील साखर कंपन्यांनी अत्यंत किरकोळ किमतीला दारूची निर्मिती करणाऱ्या कंपनीला विकल्याचं प्रकरण न्यायालयात आहे.

मायावती सद्यस्थितीला राजकीय कारकीर्दीतील सगळ्यांत अवघड कालखंडातून जात आहेत. यामुळेच आता त्यांची प्रत्येक कृती बाबासाहेबांच्या धर्तीवर आहे. संसदेचा राजीनामादेखील बाबासाहेबांना प्रमाण मानूनच दिला, असंही त्या सांगत आहेत.

दलित अभ्यासक आणि उत्तर प्रदेशचे माजी आयपीएस अधिकारी एस. आर. दारापुरी म्हणतात, "हिंदू स्त्रियांना विशिष्ट अधिकार मिळवून देणार असलेलं हिंदू कोड बिल संसदेत पारित होऊ शकलं नाही. या मुद्द्यावरून आंबेडकर नेहरू सरकारवर नाराज होते. म्हणून त्यांनी राजीनामा दिला."

"दुसरीकडे संसदेत दहा मिनिटांत आपलं म्हणणं मांडू न शकल्याच्या मुद्द्यावरून मायावती यांनी राजीनामा दिला. धर्म हा अगदीच वैयक्तिक निर्णय आहे. धर्म स्वीकारण्याच्या मु्द्यावरून धमकावण्याची काय गरज होती?"

दारापुरी यांच्यानुसार बाबासाहेबांचा बौद्ध स्वीकारण्याचा निर्णय राजकीय नव्हता. विविध धर्मांचा सलग एकवीस वर्षं केलेला अभ्यास आणि हिंदू धर्मात सुधारणा करण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानं त्यांनी बौद्ध धर्म अंगीकारला. हे सगळं ठाऊक असतानाही मायावती यांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला तर पुढच्या घडामोडी आणि परिणाम अभ्यासणं रंजक ठरेल.

त्यांना आपल्या घरासमोरची गणपतीची प्रतिमा हटवावी लागेल तसंच ब्राह्मणवाद आणि कर्मकांडाला विरोध करणाऱ्या बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञांचं पालन करावं लागेल. अशा परिस्थितीत निवडणुकांसाठी युती किंवा आघाडी कशी करणार? स्पष्ट आहे की हे त्यांना शक्य नाही.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)