You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल : 'मायावतींच्या धर्मांतराने विकास होणार का? की केवळ राजकीय स्टंट?'
भाजपने जर मानसिकता बदलली नाही तर आपण बौद्ध धर्म स्वीकारू, असं वक्तव्य बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केलं आहे.
"भाजपनं दलित, अदिवासी, मागसवर्गीय आणि धर्मांतरित यांच्याबाबतची स्वतःची भूमिका बदलावी, अन्यथा मी धर्म बदलण्याचा निर्णय घेईन," असं मायावती म्हणाल्या.
त्यामुळे बीबीसी मराठीने आपल्या वाचकांना विचारलं होतं की मायावतींच्या या घोषणेबाबत त्यांना काय वाटतं?
वाचकांनी भरभरून प्रतिक्रिया पाठवल्या. त्यातल्याच या काही प्रतिक्रिया.
अभिजीत वानखेडे म्हणतात की मायावतींनी किंवा इतर राजकारण्यांनी हिंदू धर्म सोडण्यापेक्षा जाती/धर्माच्या नावाखाली राजकारण करणं सोडलं तर बरं होईल.
प्रवीण कांबळी म्हणतात की, "जातीचं राजकारण करणारे मतं मिळवू शकतात. पण विकास करू शकत नाही."
ज्यांनी बाबासाहेबांचे विचार वाचले आहेत, त्यांना कोणत्याही धर्माचं ना आकर्षण असतं ना द्वेष, असं सुहास भोंडे यांनी मत मांडलं आहे.
सविस्तर प्रतिक्रिया देत शेखर पाटील म्हणतात, "जर एखाद्या गोष्टीत बदल हवा असेल तर त्यासाठी लढा दिला पाहिजे. पण जातीचं राजकारण करणं थांबवा. शेवटी सगळं सत्तेभोवतीचं राजकारण आहे. त्यांना जर बौद्ध धर्म स्वीकारल्याने जनतेचा काही फायदा होणार आहे, असं वाटत असेल तर त्यांनी ते करावं. पण असं जाती-धर्माच्या नावाखाली या जनतेला फसवू नये."
ए. व्ही. मोहिते म्हणतात की हा एक पॉलिटीकल स्टंट आहे. "मायावतींना ना आंबेडकर कळणार ना बुद्ध झेपणार."
ज्योत्स्ना मेश्राम यांचं मत आहे की मायावतींनी कधीच हिंदू धर्म सोडायला हवा होता. तर पूर्वा सावंत म्हणतात की हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)