You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोणते पुरुष देखणे असतात? मल्याळी की तामिळ?
- Author, दिव्या आर्या
- Role, बीबीसी प्रतिनिधी, नवी दिल्ली
'मल्याळी महिला आणि तामिळ महिला यांत सुंदर कोण?' हा प्रश्न एका टीव्ही चॅनलनं एका चर्चेच्या कार्यक्रमात विचारल्यानंतर अनेकांनी विरोध नोंदवला आहे. अखेर त्याचं प्रक्षेपण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
देखणा पुरुष नेमका कसा ओळखावा? मी आणि माझ्या काही मैत्रिणी हिवाळ्यातल्या एका संध्याकाळी या प्रश्नावर गप्पा मारत बसलो होतो.
"तो जास्त उंच नसावा आणि जास्त बुटकाही नसावा. थोडासा जाड असला तरी चालेल. म्हणजे मला बारीक व्हायची गरज नाही," असं माझी एक बुटकी आणि लठ्ठ मैत्रीण पटकन म्हणाली.
"मला जाड आणि पोट पुढे आलेला माणूस अजिबात चालणार नाही. ते वाईटच दिसतात. त्याच्या अंगावर केस तर अजिबातच चालणार नाहीत." माझ्या एक स्पष्टवक्त्या मैत्रिणीनं तिच्या भावना व्यक्त केल्या. "टायटॅनिकमध्ये लिओनार्डो दी कॅप्रिओनं 'ती' चित्रं काढली होती. त्याची जशी नखं होती, तशी नखं मला आवडतील." असंही ती म्हणाली.
एका मैत्रिणीला कुरळ्या केसांची खूप आवड. "करडे, कुरळे केस आणि हिप्पी लुक असावे. तसंच एक झकास गॉगल त्यानं लावला तर ती माझी खरी आवड असेल," असं ती म्हणाली.
माझ्या मैत्रिणींच्या भावना ऐकून मी मात्र बुचकळ्यातच पडले होते. कुणीही 6 फूट उंच, गोरा, काळे केस असलेला आणि स्ट्राँग बायसेप्स असलेला तरुण हवा, असं म्हटलं नाही.
मला वाटलं या मुलींना हृतिक रोशन, शाहरूख खान, रणवीर सिंग यांच्यासारखा तरुण हवा असेल. पण, या मुलींच्या स्वप्नात यातलं कुणीच नव्हतं.
त्यांना एखाद्या 'हीरो'सारख्या तरुणाची अपेक्षाच नव्हती. त्यांचे हीरो हे सध्याच्या हीरोंपेक्षा एकदम निराळेच होते.
एखादा प्रसिद्ध टीव्ही डिबेट शो जेव्हा 'कोण सुंदर आहे? केरळच्या महिला की तामिळ महिला?' यांसारखे विषय चर्चेला निवडतात, तेव्हा माझ्या मैत्रिणींनी हा विषय उलटा करून चर्चा करायचं ठरवलं.
पण दोन प्रांतातल्या लोकांची शारीरिक दृष्ट्या तुलना करण्याला माझा विरोध होता. जे टीव्ही शो करत आहेत, तेच माझ्या मैत्रिणीही करत नव्हत्या का?
महिलांना फक्त त्यांच्या बाह्यरूपावरून ओळखणं आणि एका प्रांतात सर्व महिलांना एकाच मापात मोजणं मला मंजूर नाही.
प्रत्येक प्रांतांतल्या सर्व महिला एकसारख्या असतीलच, असं नाही. माझी शेजारीण वेगळे कपडे घालते आणि माझ्यापेक्षा वेगळ्या रूपातच ती सगळयांसमोर वावरते.
पण या टीव्ही शोनं एक पाऊल पुढे टाकत सोशल मीडियावरही हा विषय चर्चेसाठी मांडला. त्यानंतर विरोधाची एक लाट उसळली. या कार्यक्रमामुळे महिलांचा अपमान होत असल्याचं विरोध करणाऱ्यांचं म्हणणं होतं.
अखेर टीव्ही चॅनलनं हा डिबेट शो न दाखवण्याचा निर्णय घेतला. तसंच सोशल मीडियावरील पोल आणि प्रोशनचे व्हीडिओ पण मागे घेतले.
माझी आणि मैत्रिणींची चहा पार्टी हा कार्यक्रम मागे घेतल्याबद्दलच होती. महिलांच्या सौंदर्याच्या साचेबद्ध संकल्पनांवर कार्यक्रम करणं योग्य नाही.
केवळ सौंदर्याची मूर्ती म्हणूनच केवळ महिलांकडे पाहिलं जाऊ नये.
"मग तुम्ही पुरुषांचा का अपमान करत आहात?" असा प्रश्न मी त्यांना विचारला. कारण कोणता पुरुष देखणा आहे याची त्या चर्चा करत होत्या.
"तुम्ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या इतर कंगोऱ्यांबद्दल का नाही चर्चा करत. त्यांची विनोदबुद्धी, शिक्षण, त्यांचे राजकीय विचार याबद्दल का नाही बोलत? फक्त त्यांच्या सौंदर्याबद्दलच का चर्चा करायची?"
कारण तुझ्याकडे 'विनोदबुद्धी' नाही, असं त्या सगळया माझ्याकडे बघून एकदम ओरडल्या. स्वतःवरही हसायला शीक, त्यांनी सल्ला दिला.
"आणि हीच तुमची मूळ समस्या आहे. मलासुद्धा देखणे पुरुष आवडतात, जे त्यांच्या पहिल्याच भेटीत आपली छाप पाडतात. पण गमतीत जरी आपण आदर्श पुरुष देखणे असतात, असं म्हटलं, तर आपण ही संकल्पना नकळत मान्य करत असतो," मी म्हटलं.
म्हणूनच डझनभर मुली या टीव्ही शोमध्ये सहभागी व्हायला तयार झाल्या आणि त्या चॅनललाही सवंग प्रसिद्धीसाठी हा कार्यक्रम करावासा वाटला.
म्हणूनच आपण गंमत म्हणून केलेल्या गप्पांची परिणती भयंकर डाएट्स, लिपोसक्शन, न्यूनगंड आणि नैराश्यात होते.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)