You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल मीडियावरच्या भाजपच्या स्त्रीशक्तीला काँग्रेसकडे उत्तर आहे का?
2014 मध्ये भाजपने जणू सोशल मीडियावरच स्वार होऊन सत्ता मिळवली. फेसबुक असो वा ट्विटर, इथे रंगणाऱ्या चर्चेतून देशाचं राजकारण कोणत्या दिशेला जात आहे, याचा अंदाज येतो.
राजकारण्यांनाही आपलं मत मांडण्यासाठी आणि जनतेचं मत जाणून घेण्यासाठी हे एक सशक्त माध्यम बनलं आहे.
ट्विटरवर राहुल गांधीचे फेक फॉलोअर आहेत का, हा नुकताच चर्चेत आलेला विषय. आणि त्यावर गांधीवर स्मृती इराणींचा हल्लादेखील सोशल मीडियावर गाजला होता.
भाजपचं सोशल मीडिया आणि त्यावर असलेलं राजकीय वर्चस्व हे सर्वश्रूत आहेच. पण यामध्ये भारतीय महिला नेत्या कुठे आहेत?
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही महिला नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटवर नजर टाकली.
साहजिकच सोशल मीडियावर भाजपा महिला नेत्यांचा बोलबाला आहे. पण 'रीच'चा आढावा घेतला तर काँग्रेस नेत्या त्यांच्या आसपासदेखील नाहीत.
कोणकोणत्या महिला नेत्यांची कशी आहे पोहोच, यावर एक नजर.
किरण बेदी
महिला नेत्यांमध्ये पुद्दूचेरीच्या लेफ्टनंट गर्व्हनर आणि माजी IPS अधिकारी किरण बेदी आघाडीवर आहे. त्यांचे एक कोटी पाच लाख चाळीस हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
किरण बेदी ट्विटरवर अतिशय सक्रिय आहे आणि आतापर्यंत त्यांनी 28,000 पेक्षा जास्त ट्वीट केले आहेत.
सुषमा स्वराज
थेट ट्विटरवरून विजा मिळवून देणाऱ्या मंत्री म्हणून परराष्ट्र मंत्री आणि वरिष्ठ भाजप नेत्या सुषमा स्वराज लोकप्रिय आहेत.
त्यांचे सध्या जवळपास एक कोटी फॉलोअर्स असून महिला नेत्यांमध्ये त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
आजवर त्यांनी पाच हजारांपेक्षा अधिक ट्वीट केले आहेत, जे मुख्यत: परराष्ट्रासंबंधी विषयांवर असतात.
परदेशात अडचणीत सापडलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी त्या ट्वीट करत असतात. अनेक प्रकरणांत त्या परदेशी नागरिकांच्या समस्यासुद्धा सोडवतात.
स्मृती इराणी
तिसऱ्या क्रमांकावर माहिती आणि प्रसारण तसंच वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आहेत. त्यांना 72 लाखाहून अधिक लोक फॉलो करतात.
स्मृती इराणी ट्वीट करण्याच्या बाबतीत एकदम फास्ट आहेत आणि सक्रियही. त्यांनी आतपर्यंत 18,600हून अधिक ट्वीट केले आहेत.
इराणी फक्त आपल्या मंत्रालयाशी निगडितच ट्वीट नाही तर विरोधी पक्षांच्या नेत्यांवर निशाणा साधण्यासाठीसुद्धा ट्विटरचा पुरेपूर वापर करतात.
वसुंधराराजे सिंधिया
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांना ट्विटरवर 22 लाखापेक्षा अधिक लोक फॉलो करतात. राजे यांनी आतापर्यंत जवळपास 8,500 ट्वीट केले आहेत, ज्यापैकी बहुतांश ट्वीट शुभेच्छांचे किंवा सरकारी कामकाजाचे असतात.
भाजप, केंद्र सरकार तसंच राज्य सरकार आणि जनसंपर्क विभागाचे अनेक ट्वीट त्यांच्या अकाउंटवरून रिट्वीट होतात.
निर्मला सीतारामन
केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांना ट्विटरवर अंदाजे 16 लाख 63 हजार लोक फॉलो करतात. सीतारामन यांनी आतापर्यंत 10,600 पेक्षा जास्त वेळा ट्वीट केलं आहे.
त्यांचे बहुतांश ट्वीट्स हे सरकार आणि पक्षाच्या ट्विटर अकाऊंटवरचे रिट्विट्स असतात.
ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी ट्विटरवर भाजपेतर महिला नेत्यांमध्ये आघाडीवर आहे. त्यांचे 16 लाख 76 हजार फॉलोअर्स आहेत.
दिनविशेष, नामवंत लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पक्ष तसंच राज्य सरकारच्या योजनांविषयीचे त्यांचे ट्वीट्स असतात.
मीनाक्षी लेखी
ट्विटरच्या मिलियन फॉलोअर्स क्लबमध्ये भाजपाच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांचासुद्धा समावेश होतो.
त्यांचे 12 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. मीनाक्षी लेखी अनेकदा ट्विटरवरून विरोधी पक्षांवर टीका करताना दिसतात.
आनंदीबेन पटेल
गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे ट्विटरवर सहा लाख फॉलोअर्स आहेत. त्यांनी आतापर्यंत 5458 ट्वीट्स केले आहेत.
आनंदीबेन पटेल ट्विटरचा वापर सरकारी आणि पक्षाचे रिट्विट आणि शुभेच्छा देण्यासाठी करतात.
दिव्या स्पंदना
काँग्रेसच्या युवा नेता आणि सोशल मीडिया प्रभारी दिव्या स्पंदना यांना ट्विटर वर 5 लाख 59 हजार लोक फॉलो करतात.
त्यांनी 19 हजारापेक्षा अधिक ट्वीट केले आहेत, आणि पक्षाच्या सोशल मीडियाची कमान त्यांच्या हाती असल्यानं साहजिकच त्या ट्विटरवर अतिशय सक्रिय आहेत.
काँग्रेसच्या बहुतांश अकाउंटवरून झालेले ट्वीट त्या रिट्वीट करण्याशिवाय भाजपवर निशाणा साधताना दिसतात.
नजीकच्या काळात काँग्रेस सोशल मीडियावर सक्रिय होण्यामागे त्या असल्याचं म्हटलं जातं.
शाझिया इल्मी
भाजप प्रवक्त्या शाझिया इल्मीसुद्धा ट्विटरवर फार सक्रिय आहेत.
सहा हजारापेक्षा अधिक वेळा ट्वीट केलेल्या शाजिया यांना 3 लाख 21 हजार लोक फॉलो करतात. त्या ट्विटरवर भाजपाची बाजू मांडतात आणि विरोधी पक्षांना लक्ष्य करतात.
मेनका गांधी
केंद्रीय माहिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांचे ट्विटरवर 3 लाख 7 हजार फॉलोअर्स आहेत. त्यांनी आतापर्यंत 4943 ट्वीट केले आहेत.
त्या आपल्या मंत्रालयाशी निगडीत ट्वीट जास्त करतात.
काँग्रेस फारच मागे
महिला नेत्यांच्या सोशल कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात काँग्रेस पिछाडीवर आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं तर ट्विटर अकाउंटही नाही. त्यांची मुलगी प्रियंका गांधीसुद्धा ट्विटरवर नाहीत.
पण काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी ट्विटरवर अतिशय सक्रिय आहेत. त्यांचे जवळजवळ 2 लाख 53 हजार फॉलोअर्स आहेत.
दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचे जवळपास 1 लाख 3 हजार फॉलोअर्स आहेत. त्यांनी फक्त 636 ट्विट्स केले आहेत.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित ट्विटरवर आहेत पण त्याही फारशा सक्रिय नाहीत. त्यांनी आतापर्यंत 253 ट्वीट केल आहेत आणि त्यांचे 37 हजार फॉलोअर्स आहेत.
माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार ट्विटरवर आहेत. त्यांनी आतापर्यंत 296 ट्वीट केले आहेत आणि त्यांचे 21 हजार फॉलोअर आहेत.
'आप'च्या नेत्या कुठे
भाजपा आणि काँग्रेसशिवाय आम आदमी पार्टीच्या महिला नेत्यांना ट्विटरवर फॉलॉइंग आहे. पण ते इतर दोन पक्षांपेक्षा कमीच.
आपच्या अतीशी मारलेना यांचे जवळजवळ 1 लाख 9 हजार फॉलोअर्स आहेत, तर प्रीती शर्मा मेनन यांचे 71 हजार फॉलोअर्स आहेत.
आपच्या प्रवक्ता रिचा पांडे मिश्रा यांना ट्विटरवर 6312 लोक फॉलो करतात.
इतर महिला नेता
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे जवळजवळ तीन लाख फॉलोअर्स आहेत. त्या मराठी भाषेत महाराष्ट्राशी निगडीत मुद्दयांवरच ट्वीट करतात.
समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांना 14,000 लोक फॉलो करतात.
लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती यांनी तर तब्बल 20 हजाराहून अधिक ट्विट केले आहेत आणि त्यांना 87 हजाराहून अधिक लोक फॉलो करतात. मीसा बहुतांशवेळा भाजपावर निशाणा साधतात.
त्याचवेळी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती ट्विटरवरच नाहीत.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)