पेट्रोल 2 रुपयांनी स्वस्त, पण सोशल मीडियावर नाराजीचा सूर

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2 रूपयांनी कमी झाल्या आहेत. या संदर्भात बीबीसी मराठीनं वाचकांची मते मागवली होती. एकदंरीत चर्चेचा सूर पाहाता लोक या दरकपातीनं खूश दिसत नाहीत.

वाचकांच्या मते, आधीच इंधनाचे दर खूप वाढलेले असताना फक्त 2 रुपयांनी दर कमी करणं पुरेसं नाही.

भाग्यश्री पाटोळे जगताप म्हणतात, GST मधून पेट्रोल, डिझेल आणि गॅसला बाहेर ठेवण्याचा हेतूच हा आहे की, या गोष्टींच्या दरात अनियंत्रित वाढ करता यावी. सरकार या गोष्टींच्या किमती खूप वाढवतं आणि मग एक दोन रुपयांनी कमी करतं.

सचिन चोभे म्हणतात, केंद्र व राज्य सरकारांनी पेट्रोलवर १३० टक्के कर घेऊन भारतीयांची लूट सुरुच ठेवली आहे.

काही वाचकांचं म्हणणं आहे की, इंधनाचे दर कमी झाले असले तरी ते कुठल्याही अर्थानं स्वस्त झालेले नाहीत. विराज कोकणे म्हणतात की, ही शुद्ध फसवणूक आहे.

आधी दहा रुपयांनी दर वाढवले आणि आता दोन रुपयांनी कमी केले यात काय तीर मारला? असं प्रवीण बाड यांनी फेसबुकवर लिहिलं आहे.

पेट्रोल-डिझेलचे भाव अजून कमी व्हायला हवेत. असा सर्वसाधारण सूर दिसून येत आहे.

राकेश कुलकर्णींच्या मते दर अजून कमी व्हायला हवेत. अनिल पाटील म्हणतात पेट्रोलची किंमत सात रुपयांनी वाढवली आणि कमी करताना फक्त दोन रुपयांनी केली. तसंच सिलेंडरची किंमत दिड रुपयांनी वाढेल असं सांगून प्रत्यक्षात 50 रुपयांनी वाढवली आहे. हेच ते अच्छे दिन आहेत यात शंकाच नाही.

सरकारनं एक्साइज ड्युटी कमी करून जणू काही जनतेवर उपकार केले आहेत असं गिरीश पिसेंनी लिहीलं आहे.

आज 2 रुपये कमी केलेत उद्या चार रुपये वाढवतील. गेली 2 वर्ष इंधनावर दुष्काळ टॅक्स लावलेला आहे. आता तर दुष्काळही नाही आहे. सरकारनं सगळे छुपे खर्च कमी केले पाहिजेत. असं सुद्धा वाचकांचं म्हणणं आहे.

क्रुड ऑईलच्या किमती पाहिल्या तर पेट्रोल डिझेलच्या किमती अजून कमी व्हायला हव्यात. तसंच या गोष्टी GSTच्या अंतर्गत आल्या पाहिजेत असं याकुब सदलगे म्हणतात.

पेट्रोल-डिझेल चे भाव वाढल्यामुळे, जीवनावश्यक वस्तू महाग होतात. मात्र, पेट्रोल-डिझेल चे भाव कमी झाल्यास, त्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी होतात का? असा सवाल अजितोव यांनी उपस्थित केला आहे.

२०१४ पासून जागतिक स्तरावर क्रूड ऑईलच्या किंमती फार कमी झाल्यात. मात्र भाजप-मोदी सरकारनं पेट्रोल-डिझेलचे भाव सतत वाढवले आहेत. साठ वर्षे काँग्रेस भ्रष्टाचार करीत रहाली. मात्र, मोदी अवाढव्य भ्रष्टाचार केवळ साठ महिन्यांत (पाच वर्षांत) करू इच्छित आहे.

किरण बावीस्कर मिश्कीलपणे म्हणतात की 2 रूपये म्हणजे खूपच झालं एवढी अपेक्षा नव्हती.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)