प्रेस रिव्ह्यू - 'सोशल मीडियावर फोटो टाकणे इस्लामविरोधी'

सोशल मीडियावर फोटो टाकणं इस्लमाविरोधी; महाराष्ट्रात एसटीचे हाल आणि जालियनवाला बाग साठी कोण करत आहे माफीची मागणी, या बातम्यांचा आढावा आजच्या वृत्तात.

सोशल मीडियावर फोटो टाकणं इस्लामविरोधात आहे, त्यामुळे मुस्लिमांनी सोशल मीडियावर फोटो अपलोड करू नये, असा फतवा दारुल उलूम देवबंदने काढला आहे.

सामनामधील वृत्तानुसार दारुल उलूम देवबंदला एका व्यक्तीने विचारलं होतं की, "मी किंवा माझ्या पत्नीने फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर फोटो टाकणं इस्लामच्या विरोधात आहे की नाही?"

त्या प्रश्नाला उत्तर देत दारुल उलूम देवबंदने या फतव्यात म्हटलं आहे की मुस्लिमांनी फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करू नये. हे इस्लामविरोधी आहे.

आंतरधर्मीय विवाहाला धार्मिक द्वेषाचा रंग देणे चुकीचे

प्रत्येक आंतरधर्मीय विवाहाला धार्मिक द्वेषाचा रंग देणं चुकीचं आहे, असं केरळ उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, न्यायालयानं म्हटलं आहे की अनेक धार्मिक संघटनांकडून आंतरधर्मीय विवाहाला 'लव जिहाद' संबोधलं जातं. मात्र आंतरधर्मीय विवाहाला असा रंग देणं चुकीचं आहे. यामुळे सामाजिक एकतेला धक्का पोहचत आहे.

जालियानवाला बाग हत्याकांडाची माफी मागा

१९१९ मध्ये घडलेल्या जालियानवाला बाग हत्याकांड घटनेबद्दल थेरेसा मे यांच्या ब्रि़टन सरकारने माफी मागावी, अशी मागणी इंग्लंडमधील लेबर पक्षाचे नेते विरेंद्र शर्मा यांनी केली आहे.

भारतीय वंशाचे शर्मा हे एलिंग साऊथहॉल भागातून निवडून आलेले संसद सदस्य आहेत. मंगळवारी लंडनमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये त्यांनी पंतप्रधान थेरेसा मे यांनी स्वतः माफी मागावी, अशी मागणी केली.

सोबतच जालियानवाला बाग हत्याकांड इतिहासातील एक लाजिरवाणी घटना आहे, असा धडा शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये घालावा, असंही त्यांनी मागणीत नमूद केले आहे.

लाल डब्बा पिछाडीवर

अन्य राज्यांमधील परिवहन सेवांच्या तुलनेत महाराष्ट्रातील एसटी बस सेवा पिछाडीवरच असल्याचं वृत्त लोकसत्तामध्ये आलं आहे.

अनेक वर्षांत राज्यातील एसटीची कामगिरी आणि प्रगती कमीच झाल्याचे एसटी महामंडळाच्या वेतन सुधारणा समितीने केलेल्या परीक्षणातून स्पष्ट करण्यात आले आहे.

रस्त्यावरील वाहतुकीत एसटीचा वाटा हा अवघा १८ टक्केच असल्याचं या परिक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)