You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गिरिजा देवींशिवाय ठुमरीची मैफल सुनी
- Author, यतींद्र मिश्र
- Role, संगीत समीक्षक, बीबीसी हिंदी
सेनिया बनारस घराण्याची पताका घेऊन कार्यरत गिरिजा देवी यांच्या निधनामुळे ठुमरी, दादरा, कजरी आणि चैती हे सगळे एकाचवेळी मुके झाले आहेत.
घरचे, नातेवाईक आणि शिष्य परिवारात अप्पाजी या नावाने प्रसिद्ध होत्या. गिरिजा देवी म्हणजे उपशास्त्रीय संगीतातलं चालतं बोलतं विद्यापीठ. पूरब अंग गायनातला चौमुखी गायन गिरिजा देवींचा हातखंडा.
ख्याल-टप ख्याल, ध्रुपद-धमार, ठुमरी-दादरा, चैती-होली अशा विविधांगी गायन प्रकारांत त्यांचा दमदार आवाज भारून राहत असे. प्रत्येक प्रकाराचं सौंदर्य समजून घेऊन त्याचा भावार्थ श्रोत्यांपर्यंत पोहचवण्यात त्या वाकबगार होत्या.
सरजू प्रसाद मिश्र आणि श्रीचंद मिश्र हे गिरिजा देवींचे गुरू. बनारस घराण्याचे संस्कार पारंपरिक पद्धतीने शिकवणं ही या गुरुद्वयींची हातोटी.
महान कलाकार
गाणं हाच आत्मा झालेल्या गिरिजा देवींनी संगीत साधनेचा अनोखा वस्तुपाठ सादर केला आणि गुरूंकडून गाण्यातल्या दुर्लभ गोष्टीही आत्मसात केल्या.
यामध्ये गुल, बैत, नक्श, रुबाई, कौल कलवाना आणि इतर घटकांचा समावेश होता. बनारस घराण्याच्या ठुमरी गायकीतील सौंदर्यस्थळं इतक्या प्रभावीपणे रसिकांसमोर मांडणाऱ्या गिरिजादेवी एकमेव गायिका असाव्यात.
आपल्या अनोख्या शैलीने त्यांनी गायनाची वेगळीच वाट चोखाळली. शुद्ध स्वर, रागांमधील भाव उलगडून दाखवणं आणि ठुमरी गायनाचं गुणवैशिष्ट्य असलेल्या पुकार ताना घेताना गिरिजी देवी जणू ईश्वराला साद घालत असत आणि श्रोतृवृंद भक्तिरसात न्हाऊन निघत असे.
बुढवा मंगलमध्ये कोण गाऊ शकतं?
पुस्तकाच्या लेखनादरम्यान बोलताना गिरिजा देवी म्हणाल्या होत्या, 'ठुमरीशिवाय मैफल रंगूच शकत नाही. अष्टनायिकांच्या भावविश्वाशी समरस झाल्याशिवाय ठुमरी किंवा दादरा खुलू शकत नाही. पूर्ण तयारीनिशी कौशल्यं घोटल्याशिवाय बुडवा मंगलच्या सोहळ्यात कोण गाऊ शकेल?'
या सगळ्या दुर्लभ गोष्टी गिरिजा देवी आपल्या शिष्यांना आवश्यक वाटेल तेव्हा सोप्या भाषेत समजावून सांगत. दिग्गजांकडून मिळालेले बाळकडू त्यांनी सहजतेनं सुनंदा शर्मा, अजिता सिंह, रुपान सरकार या शिष्यांना शिकवलं.
उत्कृष्ट बंदीश
पील, कौशिक ध्वनी, पहाडी, झिंझोटी, खमाज आणि भैरवी यासारख्या रागांचा नवा पैलू गिरिजा देवींनी मांडला. या राग संगीतातलं काठिण्य बाजूला सारत सुलभ सादरीकरणावर त्यांचा भर असे. त्यांची कारकीर्द भारतीय संगीतातलं अद्भुत पर्व आहे.
गिरिजा देवींमुळेच साहित्यिक रचनांचा उपयोग कजरी आणि झूला गायनात होऊ लागला. भारतेंदू हरिश्चंद्र आणि चौधरी बद्रीनारायण उर्फ प्रेमघन यांच्या अनेक काव्यपंक्तींना गिरिजा देवींचा स्वर लाभला आणि लिखाणासह त्यांचा आवाज अजरामर झाला.
अनोखा आवाज लाभलेल्या गिरिजा देवींनी स्वत: लिखाणही केलं. 'घिर आई है कारी बदरिया, राधे बिन लागे न मोरा जिया' ही उत्कृष्ट बंदीश त्यांच्याच लेखणीतून साकारली होती.
उपशास्त्रीय संगीताच्या शिलेदार रसूलबाई, बडी मोतीबाई, सिद्धेश्वरी देवी आणि निर्मला देवी यांच्यासह गिरिजा देवी म्हणजे अद्भुत समीकरण होतं. या सगळ्यांच्या स्वरात बनारसच्या संस्कृतीचा गंध अनुभवता येतो.
(लेखक यतींद्र मिश्र हे गिरिजा देवींच्या चरित्राचे लेखक असून, गिरिजा हे पुस्तक 2001 मध्ये प्रकाशित झालं होतं. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद 'गिरिजा: ए जर्नी थ्रू ठुमरी' 2005 मध्ये प्रकाशित झाला होता.)
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)