दृष्टिकोन : 'मोदींनी ट्वीट केलं, पण वाल्मिकी समाजाचं दुःख शेअर नाही केलं'

    • Author, राजीव शाह
    • Role, वरिष्ठ पत्रकार

स्वच्छ भारतचा नारा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाताने मैला साफ करणाऱ्या वाल्मिकी समाजाच्या कामाला आध्यात्मिक अनुभव म्हटलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी एक ट्वीट केलं. 'वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा. महान ऋषी आणि साहित्यमहर्षी. त्यांचं जीवनकार्य अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरलं आहे', असं या ट्वीटचा आशय होता.

मोदी यांच्या ट्वीटमध्ये वाल्मिकींचा एक माणूस म्हणून, साहित्यिक म्हणून उल्लेख आहे आणि त्यांच्या कार्याचा गौरव आहे. रामायण या महाकाव्याचे जनक म्हणून वाल्मिकींचं योगदान उल्लेखनीय आहे. मात्र 'वाल्मिकी' याच नावाच्या उपेक्षित समाजाकडे मोदींचं दुर्लक्ष झालं.

मैला हाताने वाहून नेणारा वाल्मिकी समाज जातींच्या उतरंडीत सगळ्यांत तळाशी आहे. वर्षानुवर्षं वाळीत टाकणं या समाजानं सहन केलं.

वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने मोदी या समाजाबद्दल एक अक्षरही का बोलले नसावेत?

ते वर्ष होतं 2007. गुजरातमध्ये 'कर्मयोग' नावाचं पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आयोजित कर्मयोगी शिबिरात केलेल्या भाषणांचं संकलन या पुस्तकात होतं.

या पुस्तकाच्या 5000 प्रती छापण्यात आल्या. मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्या वितरित करण्यात आल्या नाहीत. कारण काही दिवसांतच विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या.

या पुस्तकासाठी 'गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशन' या सरकारी कंपनीला प्रायोजकत्व देण्यात आलं.

या आकर्षक पुस्तकाच्या पान क्रमांक 48 आणि 49 वर मोदी यांनी वाल्मिकींचा उल्लेख करतात. मैला साफ करणारा तसंच स्वच्छतागृहांची साफसफाई करणारा आणि शेकडो वर्ष हेच काम करणाऱ्या वाल्मिकी समाजाच्या कामाला मोदी यांनी 'अलौकिक अनुभव' म्हटलं आहे.

मोदी या पुस्तकात म्हणतात, 'केवळ रोजीरोटीसाठी वाल्मिकी समाज हे काम करतो, हे पटणं अविश्वसनीय आहे. जर तसं असतं तर त्यांनी हे काम सो़डून दिलं असतं.'

ते पुढे म्हणतात, 'आपलं काम संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी आणि देवासाठी आहे याची त्यांना एका विशिष्ट क्षणी नक्कीच जाणीव झाली असेल. देवानंच हे काम दिलं आहे, सफाईचं काम म्हणजे आत्मिक शांती असून ते यापुढेही अनेक शतकं सुरू राहिलं पाहिजे.'

'पुढच्या पिढ्यांनीही या आध्यात्मिक स्वरूपाच्या कामात सहभागी व्हावं. वाल्मिकी समाजाच्या पूर्वजांना हे काम सोडावं आणि दुसरं एखादं काम करावं असं कधीच वाटलं नाही, हे पटणं अशक्य आहे.'

24 नोव्हेंबर 2007ला 'टाइम्स ऑफ इंडिया'ने माझी एक बातमी छापली. 'Karmayogi swears by caste order : 'Scanvenging a spiritual experience for Valmikis' या शीर्षकासह ही बातमी प्रसिद्ध झाली.

ते पुस्तक अजूनही प्रकाशित झालेलं नाही. मैला वाहून नेणं आणि स्वच्छतागृहांची सफाई म्हणजे आध्यात्मिक अनुभव या मोदींच्या उद्गाराने खळबळ उडाली.

वाल्मिकी समाज शतकानुंशतकं हेच काम करत आहे. या बातमीने गुजरातमधले विचारवंत दलित जागे झाले आणि मोदींचे हे विचार पटण्यासारखे नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं.

कर्मयोगी हे पुस्तक जात आणि शोषण व्यवस्थेला खतपाणी मिळावं यासाठीच्या मोठ्या कटाचा भाग आहे, असं प्रसिद्ध दलित कवी नीरव पटेल यांनी सांगितलं. हे पुस्तक गुजरातच्या माहिती विभागानं प्रसिद्ध केलं होतं.

त्यांनी उपहासाने मोदींना टोला हाणताना विचारलं, 'मैला हातानं साफ करणं आध्यात्मिक आणि अलौकिक अनुभव आहे, मग समाजातल्या उच्च जातीच्या लोकांनी हा अनुभव का घेतला नाही?'

कादंबरीकार आणि चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या जोसेफ मॅकवान यांनी मोदींचे विचार म्हणजे ब्राह्मणी समाजाचा चष्मा आहे आणि वाल्मिकी समाजाची स्थिती जैसे थे राहावी असा त्यांचा दृष्टिकोन आहे, असं म्हटलं आहे.

आरोग्याला अपायकारक अशा गटारात उतरून काम करणं हा आध्यात्मिक अनुभव कसा असू शकतो? असा सवाल मॅकवान यांनी केला. भारतीय जनता पक्षाच्या दलित नेत्यांनी याविषयी भाष्य करण्यास नकार दिला.

दिवंगत दलित नेते फकीरभाई वाघेला यांना या प्रश्नावर कसं व्यक्त व्हावं हे कळेना. कारण त्यांना विधानसभेचं तिकीट हवं होतं आणि म्हणूनच अधिकृत असं ते काहीच बोलले नाहीत.

गुजरातमध्ये या बातमीने फारशी खळबळ उडवून दिली नाही. कारण राज्यातले काँग्रेस नेते आगामी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे अशा जटिल विषयावरची बातमी वाचायला त्यांना सवड झाली नाही.

काही दिवसांनंतर हे पुस्तक मला देणाऱ्या व्यक्तीने तुम्ही या बातमीने दणका उडवून दिला आहे असं सांगितलं. गुजरातमध्ये कोणीही या बातमीवर व्यक्त झालं नाही. कुठला दणक्याबाबत तुम्ही म्हणत आहात असं विचारलं असता तो माणूस म्हणाला, 'तामिळनाडूमध्ये या बातमीचं भाषांतर प्रसिद्ध झालं आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जाळण्यात आली.

त्या माणसाला हे पुस्तक परत हवं होतं. ते मी दिलं. मोदींच्या सूचनेवरून गुजरातच्या माहिती खात्यानं हे पुस्तक मागे घेतलं. आता या पुस्तकाची एकही प्रत बाजारात उपलब्ध नाही.

माहिती विभागाच्या एखाद्या जुनाट गोडाऊनमध्ये पुस्तकाच्या प्रती धूळ खात पडल्या असतील.

पुस्तक परत देण्यापूर्वी वाल्मिकी समाजाच्या कामाला आध्यात्मिक अनुभव म्हणणारा तो वादग्रस्त मजकूर मी स्कॅन करून मित्रांना पाठवला.

वर्षभरानंतर दलित चळवळीचे कार्यकर्ते आणि राजकारणी प्रवीण राष्ट्रपाल यांना स्कॅन केलेल्या पुस्तकाची प्रत सापडली. राष्ट्रपाल आता काँग्रेसमध्ये आहेत. मोदी दलितविरोधी आहेत, असं म्हणत त्यांनी हा मुद्दा राज्यसभेत मांडला.

हे सगळं एका वर्षानंतर घडलं. राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर काँग्रेस नेत्यांना जाग आली आणि त्यांनी माझ्याशी संपर्क केला. त्या पुस्तकाची प्रत तुमच्याकडे आहे का असं त्यांनी मला विचारलं.

गेल्या वर्षीही अनेक सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आणि सोनिया गांधी, अहमद पटेल यांच्यासह काही राजकारण्यांनी मला हे पुस्तक आहे का असं विचारलं. मी त्यांना नम्रपणे 'नाही' सांगितलं.

हे सगळं आठवून मी अवाक होतो. लोकांचा मैला साफ करण्याचं काम कुठल्या आधारे मोदींना आध्यात्मिक वाटलं? बहुधा ज्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी कर्मयोगी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठीच हे वक्तव्य असावं.

पुस्तकाचं नाव 'कर्मयोग' आहे. फळाची अपेक्षा न करता अविरतपणे आपलं काम करत राहावं, हा आध्यात्मिक विचार सरकारी बाबूंच्या गळी उतरवण्यासाठी या पुस्तकाचा घाट घातला असावा.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)