You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी दिली कॉस्मेटिक्स फॅक्टरीला भेट
मिसाइल मॅन म्हणून कुप्रसिद्ध उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांनी अचानक कॉस्मेटिक्स फॅक्टरीला भेट दिली. प्योनगांग शहरातील या फॅक्टरीला किम यांनी आपली पत्नी री सोल ज्यू आणि बहीण किम यो जोंग यांच्यासह भेट दिली.
सरकारतर्फे रविवारी किम यांच्या भेटीची छायाचित्रं प्रसिद्ध करण्यात आली, मात्र भेटीचा दिवस आणि तपशील जाहीर करण्यात आलेली नाही. किम यांची पत्नी आणि बहीण अगदी क्वचित जाहीर कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात.
काही दिवसांपूर्वीच किम जोंग उन यांनी बहीण किम जोंग यांना सरकारमध्ये बढती दिली होती.
क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांमुळे संयुक्त राष्ट्र संघटनेने उत्तर कोरियावर विविध स्वरुपाचे प्रतिबंध लागू केले आहेत. यामुळे उत्तर कोरियात परदेशातून येणाऱ्या प्रसाधन, मेकअपशी निगडित वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे.
कॉस्मेटिक्स फॅक्टरीला भेट का?
संयुक्त राष्ट्रांनी घातलेल्या प्रतिबंधामुळे असंख्य देशांनी उत्तर कोरियातून कॉस्मेटिक्सची आयात कमी केली. उत्तर कोरियाने स्वत:ची कॉस्मेटिक्स इंडस्ट्री विकसित केली आहे. बोमहायनगी आणि उन्हासू असे ब्रँड ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत.
लष्करी तळांवरचे फोटो आणि मिसाइल चाचण्या यासाठी किम जोंग उन प्रसिद्ध आहेत. मात्र प्योनगाँग शहरातील सधन आणि मध्यमवर्गीय वर्तुळात स्वत:चं नेतृत्त्व ठसवण्यासाठी कॉस्मेटिक्स फॅक्टरीला भेट ही किम यांची राजकीय खेळी आहे.
उत्तर कोरियाच्या नागरी जीवनाचा भाग असलेल्या कंपन्या तसेच आस्थापनांना किम भेटी देतात. त्याची छायाचित्रं सातत्याने प्रसिद्ध केली जातात. थ्री डी टेलिव्हिजन आणि स्मार्टफोन यांच्या उत्पादनात उत्तर कोरियाने मोठी भरारी घेतल्याचा दावा सरकारी माध्यम यंत्रणांनी केला आहे.
उत्तर कोरियाचं सरकार नागरिकांची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे. बीजिंग (चीन) आणि सेऊल (दक्षिण कोरिया) या शहरातील नागरिकांना ज्या सोयीसुविधा मिळतात त्या इथल्या नागरिकांनाही मिळू शकतात हे किम यांना दाखवून द्यायचं आहे, असं उत्तर कोरियाचे विश्लेषक अंकित पांडा यांनी सांगितलं.
उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांचा दाव्यात किती तथ्य आहे याची जगाला जाणीव आहे. मात्र आपल्या नागरिकांना अत्यावश्यक सेवांच्या बरोबरीने चैनीच्या वस्तूही पुरवू शकतो हे सरकारला सिद्ध करायचं आहे, असं ते म्हणतात.
प्योनगांग शहरातल्या कॉस्मेटिक्स फॅक्टरीच्या भेटीदरम्यान किम यांनी जागतिक दर्जाच्या उत्पादनांकरता कंपनीचं कौतुक केलं. यासाठी कंपनीने यंत्रणेत केलेल्या बदलांकरता किम यांनी शाबासकीची थाप दिली. केसीएनए या उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनं यासंदर्भात वृत्त दिलं.
भेटीदरम्यान कुटुंबीयांची सोबत कशाला?
काळ्या आणि पांढऱ्या आकर्षक ड्रेसमध्ये असलेल्या री अर्थात किम यांची बहीण छायाचित्रात प्रामुख्याने दिसत आहेत. किम यांच्या पत्नी छायाचित्रात दिसत नाहीत. मात्र सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह त्या उपस्थित असल्याचं केसीएनए या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.
किम आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. अगदी मोजक्या सार्वजनिक कार्यक्रमात किम यांचे कुटुंबीय सहभागी होतात. मिसाइल मॅन किम यांच्या सार्वजनिक कार्यक्रमातील सहभागाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळते.
'पत्नी आणि बहीण यांच्यासह कॉस्मेटिक्स फॅक्टरीला भेट आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कुटुंब हाच कणा असून, रक्ताचं नातं महत्वाचं आहे हे किम यांना दाखवून द्यायचं आहे', असं विश्लेषक सांगतात.
घरातील सदस्य त्यांच्यानंतर राज्यकारभार चालवतील हे त्यांना सूचित करायचं आहे, असंही पांडा यांनी सांगितलं.
'काही दिवसांपूर्वीच किम यांनी आपल्या बहिणीला सरकारच्या महत्वाच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी केलं. भविष्यात किम जोंग यांना बहिणीकडे आणखी महत्त्वाची सूत्रं सोपवायची आहेत', असं पांडा यांनी स्पष्ट केलं.
फॅक्टरी भेटीचं टायमिंग अचूक?
उत्तर कोरियातर्फे घेण्यात येणाऱ्या मिसाइल चाचण्या, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि किम जोंग उन यांच्यातील वाढता तणाव आणि ट्रंप यांच्या दक्षिण कोरिया भेटीच्या पार्श्वभूमीवर किम यांची कॉस्मेटिक फॅक्टरी भेट महत्त्वाची आहे.
अण्वस्त्रधारी उत्तर कोरिया ही स्थिती कधीही मान्य होणार नाही असे उद्गार अमेरिकेचे संरक्षण खात्याचे सचिव जेम्स मॅटिस यांनी काढले होते. त्याच्या पुढच्या दिवशीच उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने किम यांच्या फॅक्टरी भेटीचा तपशील जाहीर केला.
मॅटिस सध्या आशिया खंडाच्या दौऱ्यावर असून शनिवारी ते दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊलला भेट देणार आहेत. अण्वस्त्रांच्या चाचणीला किंवा वापराला अमेरिकेतर्फे चोख लष्करी हल्ल्याने प्रत्युत्तर दिले जाईल याचा पुनरुच्चार मॅटिस यांनी केला.
(बीबीसीच्या तेसा वोंग यांचं वृत्तांकन)
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)