You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कसे राहतात 'ते' किम जाँग उनच्या मिसाइल भूमीत?
- Author, लुईस बरूचा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
उत्तर कोरियात राहून काम करणाऱ्या अतिदुर्मीळ राजनैतिक अधिकाऱ्यांमध्ये क्लेइतो सेंकल यांचा समावेश आहे.
"ते आमचे धाडसी अधिकारी आहेत. उत्तर कोरिया जगभरातल्या महत्वपूर्ण घडामोडींचं केंद्र झालं आहे. यासंदर्भातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कळीचं काम ते करत आहेत. जबाबदारी आव्हानात्मक आहे पण ती पेलण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे"
ब्राझीलचे परराष्ट्रमंत्री अलोयसिओ यांचे हे उद्गार आहेत उत्तर कोरियातील राजनैतिक अधिकारी क्लेइतो सेंकल यांच्याबाबत आहेत.
मिसाइल चाचण्या, अमेरिकेविरुद्धचं वैर आणि हुकूमशहा किम जोंग उनचं नेतृत्व यासाठी कुप्रसिद्ध उत्तर कोरियात आपल्या कुटुंबीयांसह राहणारे ते एकमेव विदेशी राजनैतिक अधिकारी आहेत.
विनाशकारी मिसाइलच्या चाचण्यांमुळे उत्तर कोरियाविषयी बहुतांशी देशांच्या मनात भीती आहे.
क्लेइतो उत्तर कोरियात पत्नी आणि मुलासह राहतात. प्योंगयांग शहरात क्लेइतो एका मोठ्या घरात राहतात. याच वास्तूत ब्राझीलचं दूतावास कार्यालयही आहे.
सेंकलवरची जबाबदारी काय?
किम जोंग उन सर्वेसर्वा असलेल्या उत्तर कोरियात काय सुरू आहे? या देशाची ध्येयधोरणं काय आहेत? याची माहिती सेंकल ब्राझील सरकारला देतात.
उत्तर कोरिया सातत्यानं करत असलेल्या मिसाइल चाचण्यांबद्दलही सविस्तर माहिती सेंकल आपल्या देशाला पुरवतात.
बीबीसीशी बोलताना सेंकल म्हणाले, "उत्तर कोरियात राहताना आम्हाला कोणतीही भीती वाटत नाही. मात्र काहीवेळा चिंता वाटावी अशी परिस्थिती असते." सेंकल यांनी कोणत्याही राजकीय आणि वादग्रस्त मुद्यावर बोलण्यास नकार दिला.
गेल्या आठवड्य़ात संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उत्तर कोरियावर जोरदार टीका केली होती.
आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर उत्तर कोरियाचा नायनाट करण्यावाचून आमच्यापुढे पर्याय नसेल अशा शब्दांत ट्रंप यांनी उत्तर कोरियाला इशारा दिला होता.
आत्मघातकी मार्गावरचा मिसाइन मॅन अशा शब्दांत ट्रंप यांनी उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किंम जोंग उन यांची हेटाळणी केली होती.
2009 मध्ये सुरू झाला दूतावास
सेंकल अकरा वर्ष ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत आहेत. राजनौतिक अधिकारी म्हणून त्यांनी हरारे (झिम्बाब्वे), जिनिव्हा (स्वित्झर्लंड) अशा ठिकाणी काम केलं आहे. जून 2016 पासून सेंकल उत्तर कोरियामध्ये कार्यरत आहेत.
आर्थिक विभागाचे प्रतिनिधी या नात्यानं सेंकल उत्तर कोरियात आपल्या देशाचं नेतृत्व करतात. पण ते राजदूत पदावर नाहीत.
त्यांची सहाजणांची टीम आहे. 2009 पासून ही टीम उत्तर कोरियात कार्यरत आहेत. सेंकल आणि त्यांचे कुटुंबीय तिथंच राहतात.
कसं चालतं त्यांचं काम?
सेंकल दरदिवशी आवश्यकतेनुसार 9 ते 18 तास काम करतात. उत्तर कोरियाच्या राजकीय घडामोडींशी निगडीत माहिती ब्राझीलला पुरवणं हे सेंकल यांचं मुख्य काम आहे.
आंतरराष्ट्रीय प्रतिबंध असूनही ब्राझीलनं उत्तर कोरियाशी संबंध तोडलेले नाहीत. म्हणूनच त्यांचा दूतावास प्योंगयोंगमध्ये सुरू आहे.
गेल्यावर्षीच्या आकडेवारीनुसार ब्राझील आणि उत्तर कोरियादरम्यान 1 कोटी डॉलर्स रक्कमेचा व्यापार झाला आहे. 2008 मध्ये ब्राझील-उत्तर कोरिया यांच्यात 37 कोटी 50 लाख डॉलर्स एवढ्या मोठ्या रक्कमेचा व्यापार झाला होता.
फावल्या वेळात सेंकल काय करतात?
ऑफिसचं काम आटोपल्यावर सेंकल फावल्या वेळेत आपल्या आवडत्या टीमची मॅच बघतात. उर्वरित वेळेत कुटुंबीयांसह भटकंती करणं तसंच रेडिओ ऐकायला त्यांना आवडतं.
सेंकल यांचे कुटुंबीय घराजवळच्या क्लबमध्येही जातात. प्योंगयोंग शहरातल्या वेगवेगळ्या दुतावासाशी संबंधित माणसंच या क्लबमध्ये जाऊ शकतात.
या क्लबमध्ये स्विमिंग पूल आहे. शांतपणे वेळ व्यतीत करण्यासाठी हा क्लब संधी देतो.
या क्लबमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींवर कोरिया सरकारची करडी नजर असते. 24 देशांचे राजदूत आणि कार्यालयातील व्यक्तीवगळता या क्लबमध्ये कुणीच येऊ शकत नाही.
उत्तर कोरियात हॉलीवूडवर बंदी
सेंकल यांच्याकडे मनोरंजनाच्या फारसा सुविधा नाहीत. त्यांच्या घराजवळ एक हॉटेल आहे आणि एक शॉपिंग सेंटर आहे.
या सेंटरमध्ये सलून, कपड्यांची दुकानं आणि सुपरमार्केट आहे. या सेंटरमध्य़े चीज, वाईन आणि बीयरही खरेदी करता येऊ शकते.
मात्र खरेदीच्या प्रमाणावर मर्यादा आहे. संपर्काची भाषा इंग्रजी आहे. उत्तर कोरियात फक्त स्थानिक चित्रपट प्रदर्शित होतात. टीव्हीवरही तेच चित्रपट असतात.
या चित्रपटांना सबटायटल्स नसतात त्यामुळे संवाद समजत नाहीत. हॉलीवूडवर उत्तर कोरियात बंदी आहे.
मोफत इंटरनेट नाही
उत्तर कोरियात मोफत आणि मुक्त इंटरनेट नाही असं सेंकल सांगतात. गुगल, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अशा वेबसाइट्सवर बंदी आहे.
"उत्तर कोरियाचं राजकीय आणि सामाजिक स्वरूप लक्षात घेऊन आम्ही बराचसा वेळ घरातच राहतो. आमच्या मातीतलं अर्थात ब्राझीलच्या स्वादाचं खावं असं अनेकदा वाटतं पण तशी मेजवानी इथं मिळत नाही" अशी खंत सेंकल यांनी व्यक्त केली.
"ब्राझीलच्या आठवणी जागवत भात आणि फळांवर आम्ही जगतो" असंही त्यांनी सांगितलं.
विदेशी माणसं उत्तर कोरियाचं स्थानिक चलन वोनचा उपयोग करत नाहीत. खर्चासाठी चीनचं युआन, डॉलर आणि युरो यांचा वापर केला जातो.
याला प्योंगयोंगचं टोंग इल मार्केट अपवाद आहे. या मार्केटमध्ये दूतावासाशी संलग्न माणसं फळफळावळ खरेदी करण्यासाठी जातात. इथं मात्र स्थानिक चलनच वापरावं लागतं.
ड्रायव्हिंगसाठी परवानगी
सेंकल सांगतात, "इथे खाणाखुणांच्या माध्यमातून संवाद होतो. सामान खरेदी केल्यानंतर कॅल्युकेटरवर आकडे दाखवले जातात. तेवढे पैसे दिले की व्यवहार होतो."
"मात्र भाषेची अडचण सतत जाणवते. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी लेखी परीक्षा द्यावी लागते. अभ्यास काय करणार आणि उत्तरं काय देणार?"
मर्यादांची सीमारेषा
राजनैतिक अधिकाऱ्यांना इतर नागरिकांच्या तुलनेत थोडं स्वातंत्र्य असतं. मात्र उत्तर कोरियात त्यालाही काही मर्यादा आहेत.
विदेशी अधिकाऱ्यांवर सतत पहारा असतो असं सेंकल यांनी सांगितलं. जवळच्या म्युझियममध्ये जायचं असेल किंवा मेट्रो रेल्वेनं एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर परवानगी घ्यावी लागते.
प्योंगयोंग शहराबाहेर जायचं असेल किंवा घरापासून दोन तासांवरच्या एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर तरीही परवानगी घ्यावीच लागते असं ते म्हणाले.
"उत्तर कोरिया आणि ब्राझील यांच्यातलं भौगोलिक अंतर प्रचंड आहे. त्यामुळे नातेवाईक आम्हाला भेटायला येऊ शकत नाहीत. आशियाई उपखंडात काम करणारे ब्राझीलचे अधिकारी मित्र येतात" असं सेंकल सांगतात.
कशी आहे संस्कृती
उत्तर कोरिया आणि इतर देश यांच्यातील संस्कृतीत किती फरक आहे असं विचारलं सेंकल म्हणतात, "इथे लष्करी संस्कृती आहे. उत्तर कोरियाचे नागरिक शिस्तबद्ध असतात. त्यांच्या वागणुकीत लष्करी खाक्या जाणवतो. बस स्टँडवर गेलं, पन्नास माणसं असतील तरी गोंधळ नसतो. सगळे रांगेची शिस्त पाळतात. ही गोष्ट चकित करणारी आहे."
उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातलं वाढत्या वैर याबाबत विचारलं असता सेंकल म्हणाले, "आमचं त्याकडे बारीक लक्ष आहे. मात्र ब्राझीलला परतण्याचा कोणताही विचार नाही."
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)