अमेरिका : उत्तर कोरियासोबत चर्चा सुरू आहे

अमेरिका उत्तर कोरियाच्या थेट संपर्कात असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी म्हटलं आहे.

टिलरसन यांनी म्हटलं आहे की, ''वॉशिंग्टन प्योंगयांग सोबत चर्चेच्या शक्यतांची पडताळणी करत आहे, त्यामुळं थोडं सबुरीचं धोरण घ्या.''

चीनच्या दौऱ्यावर असलेल्या टिलरसन यांनी म्हटलं आहे की, ''आमची प्योंगयांग सोबत अनेक वेळा चर्चा झाली आहे. आमच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही.''

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. पण, या दोन देशांत चर्चा सुरू असल्याची बाब लोकांना माहिती नव्हती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांना 'रॉकेटमॅन' असं संबोधलं होतं. शिवाय उत्तर कोरिया मरणपंथावर असल्याचंही म्हटलं होतं.

या बदल्यात उत्तर कोरियानं ट्रंप यांच्या भाषणाची कुत्र्याच्या भुंकण्याशी तुलना केली होती.

उत्तर कोरियानं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे दोन्ही देशांमध्ये वाद सुरू झाला होता.

हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याचा दावा उत्तर कोरियानं 3 सप्टेंबरला केला होता.

उत्तर कोरियाच्या या चाचण्यांची संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनी निंदा केली होती. टिलरसन सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटणार आहेत.

उत्तर कोरिया आणि चीनचे व्यापारी संबंध आहेत. त्यामुळं या भेटीचा उद्देश चीनच्या माध्यमातून उत्तर कोरियावर निर्बंध घालणं हा आहे.

चीननं त्यांच्या देशातील उत्तर कोरियाच्या व्यापार-उद्योगांवर निर्बंध आणले आहेत.

दरम्यान, उत्तर कोरियाच्या समस्येवर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची चीनची भूमिका आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)