You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेनं फेटाळले कोरियाचे आरोप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री री योंग हो यांनी केला आहे.
अमेरिकेच्या बॉम्ब वर्षाव करणाऱ्या विमानांना पाडण्याचा अधिकार असल्याची दर्पोक्ती योंग हो यांनी केली आहे.
अमेरिकेची विमानं आमच्या देशाच्या हद्दीत नसतील तरीही त्यांना पाडण्याचा अधिकारी आम्हाला आहे असंही त्यांनी पुढे सांगितलं. युद्धाची घोषणा पहिल्यांदा अमेरिकेने केली आहे हे जगानं लक्षात ठेवावं असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, अमेरिकेनं उत्तर कोरियाच्या या आरोपांना तथ्यहीन म्हणत आरोप फेटाळले आहेत.
चिथावणीकारक कृती करून उत्तर कोरियानं अमेरिकेला डिवचू नये असं अमेरिकेच्या पेंटागॉननं म्हटलं आहे.
या दोन देशांच्या एकमेकांविरुद्धच्या आक्रमक पवित्र्यामुळे गैरसमजुती वाढ होणार असल्याची शक्यता आहे असं संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.
उत्तर कोरिया सातत्यानं क्षेपणास्त्र चाचण्या करत आहे. यासंदर्भात ट्रम्प यांनी ट्विट केलं होतं. ''संयुक्त राष्ट्र अधिवेशनात उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचं भाषण ऐकलं. लिटिल रॉकेट मॅनच्या विचारांचं ते प्रतिनिधित्व करणार असतील तर त्यांचं अस्तित्व फार काळ नसेल'', असं ट्रम्प ट्विटमध्ये म्हणाले होते.
कोण किती वेळ टिकेल याचं उत्तर अमेरिकेला लवकरच मिळेल अशा शब्दांत ट्रम्प यांच्या टि्वटला उत्तर कोरियाच्या मंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
क्षेपणास्त्र चाचण्यांचा कार्यक्रम न थांबवल्यास उत्तर कोरियाला ताळ्यावर आणण्याचे सर्व पर्याय अमेरिकेकडे आहेत असं पेंटागॉनचे प्रवक्ते कर्नल रॉबर्ट मॅनिंग यांनी सांगितलं.
याप्रश्नावर सनदशीर मार्गानेच तोडगा निघू शकतो असं संयुक्त राष्ट्रने स्पष्ट केलं.
एकमेकांविरुद्ध तीव्र शाब्दिक आक्रमण करणारे दोन्ही देश प्रत्यक्षात युद्ध पुकारणार नाहीत असं तज्ज्ञांनी सांगितलं.
आंतरराष्ट्रीय दबाव आणि मोठ्या प्रमाणावर निर्बंध असूनही उत्तर कोरियानं क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा लावला आहे.
आण्विक क्षेपणास्त्रं केवळ देशाच्या सुरक्षेसाठी आहेत. आमच्यावर आक्रमण करण्याची भाषा करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी आम्ही सुसज्ज आहोत हे दाखवण्यासाठी ही क्षेपणास्त्रं आहेत असं उत्तर कोरियाच्या नेत्यांचं म्हणणं आहे.
क्षेपणास्त्र चाचण्यांनंतर संयुक्त राष्ट्र संघटनेनं उत्तर कोरियावर आणखी बंदीची घोषणा केली आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्ट्रागाम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)