ब्लॉग : नवं साल उजाडलं आणि 'भारतमाता' 18 वर्षांची झाली!

    • Author, दिव्या आर्या
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

आपल्या देशात स्त्रीला दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याची तक्रार सतत केली जाते. तरी आपण देशाला व्यक्तिरूप देऊन बघतो तेव्हा 'भारत' या शब्दाबरोबर 'माता' हेच संबोधन आपसूक येतं.

वय आणि सन्मान या दोन्ही निकषांवर श्रेष्ठ असलेलं, कर्तव्य आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टींशी निगडित असलेलं आणि देशाला पूजनीय बनवणारं संबोधन!

नव्या वर्षातला पहिला आठवडा आता सरतोय. पण 2018 मधल्या पहिल्या सकाळीच मला हे संबोधन थोडं खटकलं. याचं मुख्य कारण म्हणजे 2018 या वर्षात '18' आहे. असा आकडा जो, सज्ञान होणं, मतदानाचा अधिकार मिळणं, लग्न करणं, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं आणि दारू पिण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त होणं, या आणि अशा अनेक गोष्टींशी निगडित आहे.

दुसरं कारण म्हणजे देशातली दर तिसरी व्यक्ती सध्या तरुण आहे.

2017मध्ये सरकारने 'युथ इन इंडिया' नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार लोकसंख्येच्या 34.8 टक्के लोकांचा वयोगट 15 ते 29 या दरम्यान आहे.

आता 'माते'च्या तुलनेत तरुण व्यक्तीची प्रतिमा नक्कीच वेगळी असते.

'तरुण भारता'तला तरुण आहे कसा?

तरुणाई नेहमी घाईत असते. त्यांचा पापड लवकर मोडतो, ते लवकर खूश होतात, त्यांची मैत्रीही लवकर होते, चटकन प्रेमातही पडतात, नोकऱ्याही पटापट बदलतात.

त्यांना तर श्वास घेण्याचीही फुरसत नसते. जरा वेळ मिळाला की, सोशल मीडियावर पटकन काहीतरी वाचतात आणि त्या गोष्टींवर विश्वासही ठेवतात.

हे तरुण बुद्धीपेक्षा भावनेला जास्त महत्त्व देतात. मनाची कवाडं उघडी ठेवली की, त्या कवाडांतून एखादं पाखरू सहज आत शिरतं. बिनधास्त प्रेम करतात. कवाडं बंद झाली की, दुस्वासही तेवढाच तीव्र होतो.

'अँटी रोमियो स्क्वॉड', 'बेरोजगारी', 'स्किल इंडिया', 'फेक न्यूज', आणि 'झुंडशाही' अशा परस्परविरोधी गोष्टींमध्ये हा तरुण थोडासा गडबडला आहे.

मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी

आपल्या या 'तरुण भारतात' मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण कमी आहे आणि येत्या दशकात ते आणखी कमी होण्याची चिन्हं आहे.

त्यामुळे माझ्या डोक्यात 'माता' ही प्रतिमा बदलली तेव्हा तरुण मुलीच्या जागी तरुण मुलाचं चित्र उमटलं.

मुलींमध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढलं आहे. जास्तीत जास्त मुली कमावत्या झाल्या आहेत. पण त्याची तुलना मुलांशी केली की, लगेचच हे आकडे अगदीच निष्प्रभ वाटायला लागतात.

2011च्या जनगणेनुसार मुलींच्या साक्षरतेचा दर 64.6 टक्के एवढा आहे, तर मुलांच्या साक्षरतेचा दर 80.9 टक्के! मुली शिकल्या, तरी त्यातल्या एक तृतीयांश घराबाहेर पडून कामही करत नाहीत.

बाल विवाहांचं घटतं प्रमाण

2011-12च्या सरकारी आकडेवारीनुसार कोणत्या न कोणत्या काम करणाऱ्यांच्या संख्येत पुरुषांचं प्रमाण 55 टक्के आणि स्त्रियांचं प्रमाण 18 टक्के आहे. हे प्रमाण ग्रामीण भागातलं आहे.

शहरी भागाकडे लक्ष दिलं तर या सुशिक्षित भागात काम करणाऱ्या महिलांचं प्रमाण जेमतेम 13 टक्के आहे.

एकच दिलासा म्हणजे महिला स्वत: कमावत्या नसल्या, तरी कमी वयात त्यांचं लग्न लावून देण्याचं प्रमाण तरी कमी झालं आहे.

भारत स्वतंत्र झाला त्या वेळी एकूण विवाहित महिलांपैकी 70 टक्के महिलांचं वय 15 ते 19 या दरम्यान होतं.

पण 2011मध्ये जनगणना झाली, त्या वेळी हे प्रमाण 20 टक्के असल्याचं दिसलं. मुलींचं लग्न करण्याचं सरासरी वय वाढून आता 22.3 वर्षांवर आलं आहे.

60 लाख पुरुषांची नसबंदी

मुलं जन्माला घालण्याच्या वयात महिलांच्या प्रजननक्षमतेत किंवा टोटल फर्टिलिटी रेटमध्येही घट झाली आहे. 1971मध्ये हा दर 5.2 एवढा होता. म्हणजेच एका महिलेला सरासरी पाच मुलं होत होती.

सत्तरीच्या दशकात पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारने लोकसंख्या नियंत्रणावर भर दिला, आणि त्या अंतर्गत देशभर नसबंदीची वादग्रस्त मोहीमही चालवली.

आणीबाणीच्या काळात तर एका वर्षात 60 लाख पुरुषांची नसबंदी करण्यात आली होती.

मनाने 18 वर्षांचाच

या वादग्रस्त मोहिमेनंतरच्या काळात टोटल फर्टिलिटी रेटमध्ये हळूहळू घट झाली. छोट्या कुटुंबांची संकल्पना रूढ झाली आणि 2014मध्ये हा दर घसरून 2.3 एवढा खाली आला.

पण या घटत्या दरांबरोबरच आरोग्यसेवा सुधारल्यामुळे मृत्यूदरही घटला. त्यामुळे या 'तरुण भारता'चा चेहरा येत्या काळात बदलणार आहे.

वर्ल्ड बँकेच्या अंदाजानुसार, येत्या काही दशकांमध्ये भारताच्या लोकसंख्येचा मोठा भाग तरुण राहणार नाही. तरुणांचं प्रमाण घटणार आहे.

इंग्लिशमध्ये एक प्रसिद्ध गाणं आहे, '18 Till I Die' म्हणजे 'मरेपर्यंत 18 वर्षांचा राहीन'.

ब्रायन अॅडम्सच्या या गाण्यात म्हटलंय की, ते इतिहासाच्या पारंब्यांना लटकत नाहीत, तर वर्तमानात जगायला उत्सुक आहेत. 55 वर्षांचा झाले, म्हणजेच म्हातारे झाले, तरी मनाने 18 वर्षांचेच राहायला उत्सुक आहेत.

भारताच्या लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा वयाने किंवा मनाने तरुण राहणार नाही, याची काळजी हे 2018च्या सकाळी सकाळी सुरू असलेल्या या चिंतनाचं कारण नाही.

इच्छा अशी आहे की, भारतात मूलभूत परिवर्तन व्हायला हवं.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)