You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#जाऊ_बाई_जोरात : 2017 गाजवणारे 7 हॅशटॅग
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
सरतं 2017 हे वर्ष तसं महिलांचं ठरलं. निदान व्हर्च्युअल जगात तरी. यावर्षी जगभरातल्या महिलांनी आपली मतं मांडण्यासाठी सोशल मीडियाचा चांगला वापर केला.
गंमत म्हणजे आपल्या विरुद्ध झालेल्या अन्यायाची दाद व्यवस्थेकडे न मागणाऱ्या स्त्रियांनी फेसबुक आणि ट्विटरलाच समांतर व्यवस्था बनवून टाकलं.
हे कितपत योग्य-अयोग्य यावर चर्चा होत राहील. पण यंदाचं वर्ष 'कजाग' (मागच्या वर्षी हिलरी क्लिंटन यांना डोनाल्ड ट्रंप यांनी nasty woman म्हणणं आणि त्यानंतर #iamnastywoman ही चळवळ उभी राहणं याचा या लेखाशी संदर्भ आढळल्यास निव्वळ योगायोग समजू नये.) बायकांनी गाजवलं. कधी स्टेटस अपडेट करून तर कधी फोटो अपलोड करून.
एवढंच नाही तर, फेमिनिझम हा शब्द यंदाचा 'वर्ड ऑफ द इयर' ठरला. बीबीसीनं दिलेल्या एका वृत्तानुसार फेमिनिझम या शब्दानं ऑनलाइन सर्चमध्ये एवढी उचल घेतली की मेरियम-वेबस्टर डिक्शनरीनं त्याला 'वर्ड ऑफ द इयर-2017'चा बहुमान दिला.
या शब्दाच्या ऑनलाईन सर्चमध्ये यंदा 70 टक्क्यांनी वाढ झाली. याचं कारण होतं जगभरात सोशल मीडियावर चाललेल्या स्त्रीवादी चळवळी.
म्हणूनच या वर्षाच्या शेवटी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ते स्त्रीवादी हॅशटॅग्स ज्यांनी वर्षभरात सोशल मीडिया दणाणून सोडला.
1) #MeToo
हा या वर्षातला सगळ्यांत गाजलेला स्त्रीवादी हॅशटॅग. हॉलिवुड अभिनेत्री अलिसा मिलानो यांनी लैंगिक छळाविरूद्ध आवाज उठवण्याचं महिलांना आवाहन केलं.
त्यांनी ट्वीटमध्ये लिहीलं की, तुम्ही जर कधी लैंगिक छळवणुकीचा सामना केला असेल तर फक्त दोन शब्द लिहा. #MeToo. तेव्हा हा हॅशटॅग 2017 मधला सगळ्यांत मोठी स्त्रीवादी चळवळ बनेल असं कोणालाच वाटलं नसावं.
अल्पावधीच अनेक महिलांच्या टाईमलाईनवर हा हॅशटॅग दिसायला लागला. इतकंच कशाला, ज्यांनी लैंगिक छळवणुकीचा सामना केला आहे अशा पुरुषांनी देखील हा हॅशटॅग वापरून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
एका हॅशटॅगमुळे जगभरातल्या स्त्रियांना व्यक्त व्हायला उद्युक्त करण्याची ताकद कुठून आली?
दिल्लीच्या मुनमुन चौधरी एका प्रॉडक्शन कंपनीत प्रोड्युसर म्हणून काम करतात. त्यांनी नुस्ता हा हॅशटॅग शेअर केला नाही तर त्यांचा एक अनुभवही शेअर केला.
"लैंगिक छळवणुकीबाबतचा मी सगळ्यांत पहिला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. मी नऊ वर्षांची होते तेव्हा. इतकी खासगी गोष्ट शेअर करायची की नाही याबद्दल मी खूप विचार केला. पण मग असं वाटलं की, जर मीही फक्त कॉपी-पेस्ट केलं तर काय उपयोग? निदान माझ्या पोस्टकडे बघून कोणाला तरी प्रेरणा मिळाली पाहिजे."
कदाचित जगभरातल्या हजारो महिला एकमेकींना सांगत होत्या, तू एकटीच नाही आहेस, हे माझ्याही बाबतीत झालं आहे.
2) #NotShaadiMaterial
नोव्हेंबर महिन्यात एका हॅशटॅगनं भारतातल्या लग्नेच्छुक मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या उरात धडकी भरवली होती.
एका चॅनेलनं आपल्या एका मालिकेच्या प्रसिद्धीसाठी हा हॅशटॅग सुरू केला खरा, पण मालिकेपेक्षा या हॅशटॅगलाच जास्त प्रसिद्धी मिळाली.
पितृसत्ताक पद्धतीत लग्नाला पात्र ठरावं, म्हणून मुलींना ज्या ज्या गोष्टी कराव्या किंवा त्यांना ज्या ज्या गोष्टी आल्याच पाहिजेत, अशी अपेक्षा असते, त्या गोष्टी करणार नाही, असं जाहीरपणे सोशल मीडियावर लिहून मुलींनी हा हॅशटॅग वापरला.
करियरला प्राधान्य देणाऱ्या, स्पष्टवक्त्या असणाऱ्या, स्वतःची मतं असणाऱ्या, घरकाम नावडणाऱ्या, एवढंच काय गोल पोळ्या न लाटू शकणाऱ्या अशा सगळ्या मुलींवर 'लग्नायोग्य नाही' असा शिक्का बसतो. याच बुरसटलेल्या विचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मुलींनी हा हॅशटॅग वापरला.
व्हीजे बानी जे यांनी ट्वीट केलं, "मी नाजूक दिसत नाही, म्हणून मी #NotShaadiMaterial ठरते का?"
मुलांनीही नंतर या वादात उडी घेतली. पारंपरिक समाजात लग्नाला पात्र ठरण्यासाठी फक्त मुलींकडूनच नाही तर मुलांकडूनही बऱ्याच अपेक्षा असतात. त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर त्या मुलालाही किंमत उरत नाही, असं या मुलांचं म्हणणं होतं.
'माझ्याकडे गाडी-बंगला नाही, माझा सहा आकडी पगार नाही, माझी होणारी बायको कितीही शिकलेली असली तरी मी उच्चविद्याविभूषीत नाही. #NotShaadiMaterial' अशा आशयाचे ट्विटही अनेकांनी केले.
3) #AintNoCinderella
ऑगस्ट महिन्यात हरियाणातल्या वर्णिका कुंडू या मुलीला छळवणूकीला तोंड द्यावं लागलं. रात्री उशीरा घरी परतत असताना दोन मुलांनी अपहरण करण्याच्या हेतूनं तिचा पाठलाग केला. शेवटी तिची सुटका करायला पोलिसांना यायला लागलं, असं तिनं सोशल मीडियावर लिहिलं.
या घटनेनंतर भाजपचे नेते रामवीर भट्टी यांनी, "ती मुलगी जर वेळेत घरी पोचली असती, तर तिच्यावर ही वेळच आली नसती. मुलींनी रात्री 12 नंतर बाहेर फिरायला नको," असं विधान केलं.
महिलांनी भट्टी यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घ्यायचं ठरवलं. अभिनेत्री तसंच राजकारणी असलेल्या दिव्या स्पंदना यांनी याविरुद्ध 'मी सिंड्रेला नाही' असं म्हणत एक चळवळ उभारली. त्यांनी स्वतःचा रात्री उशीरा बाहेर फिरतानचा फोटो सोशल मीडियावर ##AintNoCinderella या हॅशटॅगसकट पोस्ट केला.
रात्री उशीरापर्यंत बाहेर राहणाऱ्या महिलांना कायमच नावं ठेवली जातात. याच विचारसरणीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी स्पंदना यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. देशभरातून महिलांनी आपले रात्री उशीरा बाहेर फिरतानाचे फोटो या हॅशटॅगसह प्रसिद्ध केले.
4) #WomanSpreading
manspreading म्हणजे पुरुषांनी आजूबाजूच्यांची पर्वा न करता पाय फाकवून बसणं, विशेषतः सार्वजनिक वाहनांमध्ये प्रवास करताना.
ऑक्टोबर महिन्यात काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कच्या सॅम साइया या महिलेला एका पुरुषानं मेट्रोमध्ये शिवीगाळ आणि मारहाण केली. कारण? तिनं त्या माणसाला पाय जवळ घेऊन नीट बसायला सांगितलं, म्हणजे तिलाही बसायला व्यवस्थित जागा मिळेल.
या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला आणि जगभरातल्या महिलांनी याचा विरोध म्हणून एक मोहिम सुरू केली. #womanspreading.
हजारो महिलांनी #womanspreading या हॅशटॅगसह त्यांचे पाय पसरून बसलेले फोटो ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवर टाकले. यात बेला हदिद (अमेरिकन गायिका आणि मॉडेल) सारख्या सेलिब्रिटीजचाही समावेश होता.
बीबीसी मराठीनं त्यांच्या महिला वाचकांनाही manspreading विषयी त्यांना काय वाटतं ते विचारलं. अनेक महिलांनी सांगितलेल्या त्यांच्या अनुभवातून असं लक्षात आलं की, वरवर शुल्लक वाटणाऱ्या या manspreading चा महिलांना किती त्रास होते ते. या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या महिलांच्या सर्व प्रतिक्रिया वाचू शकता.
5) #GainingWeightIsCool
यावर्षी जगभरात चर्चेत राहिलेला आणखी एक हॅशटॅग म्हणजे #GainingWeightIsCool.
महिलांनी एका विशिष्ट आकारातच असावं, त्यांचं वजन प्रमाणात असाव, बाई मापातच चांगली दिसते असं म्हणणाऱ्यांना हा हॅशटॅग म्हणजे एक सणसणीत चपराक होती.
बाईनं जिमला जावं ते वजन कमी करायला आणि फिगर मेंटेन करायला. सुदृढ असणं, आपली ताकद वाढवणं, जिमला जाणाऱ्या तरुणांच्या भाषेत सांगायचं झालं तर 'मसल वेट' वाढवणं या रस्त्याला बाईनं जाऊ नये असं म्हणणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशांना महिलांनी आपले जिममधले, वजन वाढलेले फोटो टाकून आव्हान दिलं.
इतकंच नाही, हा हॅशटॅग वापरून बायकांनी त्यांच्या मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. वजन वाढल्यानं कुणाचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता तर कुणाला 'आता मी लोकांची नावडती ठरेन' अशी भीती होती.
या हॅशटॅगनं जगभरातल्या body positivity (आपल्या शरीरावर प्रेम करा) च्या चळवळीला आणखी मजबूत केलं.
6) #LahuKaLagaan
यावर्षी गाजलेला एक मुद्दा म्हणजे GST. टिकल्या, कुंकू, अल्ता या स्त्रियांसाठी महत्त्वाच्या (?) असणाऱ्या गोष्टी GST मधून वगळल्या असल्या तरी सॅनटरी नॅपकिनसारख्या वस्तूवर बराच टॅक्स लावण्यात आला होता.
याविरुद्ध एका स्वयंसेवी संस्थेनं हा हॅशटॅग वापरून ट्वीट केलं आणि अर्थमंत्री अरूण जेटलींना हा टॅक्स मागे घेण्याची विनंती केली. 'लहू का लगान' ला नाही म्हणा, असं आवाहनही त्यांनी केलं.
त्यानंतर हा हॅशटॅग सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरला. सेलिब्रिटींनी पण हा हॅशटॅग वापरून या चळवळीला पाठिंबा दिला. यात मलिका दुआ, केनी सेबॅस्टिअन, सायरस ब्रोचा यासारख्यांचा समावेश होता.
7) #WomenBoycottTwitter
याच वर्षी रोझ मॅकगोवन या हॉलिवूड अभिनेत्रीनं हॉलिवूडचा निर्माता हार्वी वाईनस्टेन यानं केलेल्या कथित लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता. तिनं यासंदर्भात एक ट्वीट केलं. त्यानंतर तिचं ट्विटर अकाऊंट बारा तासांसाठी बंद करण्यात आलं होतं.
ट्विटरच्या या कारवाईचा विरोध करण्यासाठी भारतासह जगभरातल्या बायका एकवटल्या. #WomenBoycottTwitter हा हॅशटॅग ट्रेंड व्हायला सुरूवात झाली आणि बघता बघता तो टॉप ट्रेंड झाला.
पत्रकार बरखा दत्त यांनी या हॅशटॅगसह ट्वीट केलं, "या विरोधात एकत्र या आणि निषेधामध्ये सहभागी व्हा. आम्ही ट्विटरकडून अधिक चांगल्या छळवणूकविरोधी धोरणांची आणि चांगल्या लोकशाहीची मागणी करत आहोत."
'बझफीड इंडिया' वेबसाइटच्या संपादक रेघा झा यांनीही ट्वीट केलं, "अनेक वर्षांपासून अत्याचारविरोधी चांगल्या धोरणांची आवश्यकता आम्हाला भासत असताना ट्विटरनं यात फारसं काही चांगलं केलं नाही. एक दिवसासाठी महिलांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बघूयात काय होतं."
एवढं सगळं झालं पण बदल घडला?
भले 2017 मध्ये सोशल मीडियावर अनेक स्त्रीवादी चळवळींचा जन्म झाला. पण त्यानं महिलांच्या आयुष्यात काही फरक पडला का? मुळात, सोशल मीडियावर जन्माला येणाऱ्या स्त्रीवादी लाटांचा स्त्रीवाद सशक्त करायला काही उपयोग होता का?
थिएटर रिसर्चर असणाऱ्या ओजस सुनीती विनय यांना वाटतं की, "स्त्रियांनी आपल्या खाजगी गोष्टी शेअर करणं किंवा सोशल मीडियावर खुलेपणानं आपली मत मांडण थोडं रिस्की असू शकतं."
"पण, एक बाई म्हणून आपलंही हे कर्तव्य आहे की दुसरीनं काही पोस्ट केली असेल, स्वतःचा अनुभव शेअर केला असेल तर तिला खंबीरपणे साथ देणं. बोलायला लागा. एवढंच मला सांगायचं आहे इतर बायकांना. माझा अनुभव आहे हा. तुम्ही बोलायला लागल्या की बाकीच्या बायकांना पण बोलण्याचा हुरूप येतो."
महिला हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते मिलिंद चव्हाण यांना वाटतं की, सोशल मीडियावरच्या या हॅशटॅग चळवळी महत्त्वाच्या आहेत.
"सोशल मीडियावर किती लोक आहेत पाहा ना. त्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे. सोशल मीडियावर जेव्हा अशा चळवळी सुरू होतात, तेव्हा सगळ्यांत आधी महिलांना जाणीव होते की, मी एकटी नाही. माझ्यासारख्याच हजारो-लाखो जणी आहेत. एकमेकींना गरजेचा असणारा पाठिंबाही त्यांना एकमेकींकडून मिळतो."
"शहरी भागात या चळवळींचा प्रभाव जास्त आहे. ग्रामीण भागातल्या एखाद्या सत्तरीच्या आजीला कदाचित सोशल मीडियावर चालणाऱ्या चळवळींचा उपयोग होणार नाही. पण तिथल्या नव्या पिढीला मात्र याचा फायदा आहे. फरक दिसेल, थोडा वेळ लागेल इतकंच."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)