'मध्य रेल्वेवर काय गरीब लोक राहतात का?'

    • Author, रोहन टिल्लू
    • Role, बीबीसी मराठी

भारतीय रेल्वेच्या इतिहासातली पहिलीवहिली एसी लोकल सोमवारी पश्चिम रेल्वेवर धावल्याबद्दल मुंबईकरांनी आनंद व्यक्त केला आहे. रेल्वेनं ख्रिसमसच्या निमित्तानं चांगलीच भेट दिल्याची भावना पश्चिम रेल्वेचे प्रवासी व्यक्त करत आहेत.

पण मध्य रेल्वेवर मात्र याबाबत नाराजीची भावना आहे. ही लोकल मुंबईत येताना मध्य रेल्वेवर धावणार, असं ठरलं होतं. पण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या लोकलच्या देखभाल-दुरुस्तीबद्दल असमर्थता दर्शवल्यानं ती पश्चिम रेल्वेकडे सोपवण्यात आली.

एकीकडे नव्या कोऱ्या एसी लोकलचं कौतूक करताना दुसऱ्या बाजूला ही लोकल किमान दहा वर्षांपूर्वीच यायला हवी होती, अशी भावनाही प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता म्हणतात, "ही लोकल दहा वर्षं आधीच यायला हवी होती. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मेट्रोसारख्या सेवाही आधी मुंबईत सुरू व्हायला हव्या होत्या. याबाबत आपण अक्षम्य दिरंगाई केली आहे."

सुभाष गुप्ता नॅशनल रेल्वे युजर कन्सल्टेशन कमिटीचे माजी सदस्य आहेत. त्यांनी एका वेगळ्या मुद्द्यावरही प्रशासनाला धारेवर धरलं आहे.

"रेल्वे प्रशासनानं नवी एसी लोकल चालवताना साधारण लोकलच्या 12 फेऱ्या कमी केल्या आहेत, यामुळे मुंबईकरांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे, रेल्वेनं त्याऐवजी 12 जादा फेऱ्या चालवायला हव्या होत्या," असं त्यांचं म्हणणं आहे.

दिरंगाई तर नेहमीचीच

"सरकारी आणि त्यातही रेल्वेचा प्रकल्प दिलेल्या मुदतीत पूर्ण झाला, असं कधीच होत नाही. अनेकदा तर पूर्ण होऊन सेवेत आलेल्या प्रकल्पांमध्येही त्रुटी राहिल्या आहेत," मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाच्या महिला सदस्य लता अरगडे यांनी सांगितलं.

"या आधी पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेल्या एमयुटीपी-2 प्रकल्पातील बंबार्डिअर बनावटीच्या लोकल तब्बल दोन वर्षं कारशेडमध्ये उभ्या होत्या. त्यानंतर त्यांच्या चाचण्या होऊन अडीच वर्षांनी त्या सेवेत आल्या," सुभाष गुप्ता यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं.

ही AC लोकलही गेल्या वर्षी म्हणजे 5 एप्रिल 2016 रोजी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली होती. आता पुढली AC लोकल येण्यासाठी नऊ महिने वाट पाहावी लागणार आहे. म्हणजे पुढील नऊ महिने एकच एसी लोकल धावणार असल्याचंही गुप्ता यांनी सांगितलं.

"लोकल मुंबईत आल्यानंतर मग रेल्वे प्रशानाला तिची उंची जास्त असल्याचा जावईशोध लागला. मुंबईतली परिस्थिती माहीत असूनही रेल्वे अधिकारी गाड्या बनवणाऱ्या कंपन्यांना आगाऊ सूचना देत नाही. हा दोष प्रशासनाचा आहे," गुप्ता म्हणाले.

मध्य रेल्वेबरोबर नेहमीच सापत्न वागणूक

उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाचे प्रमुख संघटक नंदकुमार देशमुख यांनीही रेल्वे प्रशासनावर पक्षपाताचा ठपका ठेवला.

"गेल्या काही वर्षांमध्ये कोणताही नवीन प्रकल्प, कोणतीही नवीन योजना किंवा नवीन गाडी सर्वप्रथम पश्चिम रेल्वेकडे जाते. तिथं ती जुनी झाल्यावर मगच मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या वाट्याला येते. रेल्वे हे जाणूनबुजून करत आहे," देशमुख आरोप करतात.

"ही एसी लोकलही सुरुवातीला मध्य रेल्वेवर चालावी, म्हणून आणली होती. ती हार्बर किंवा ट्रांस हार्बर मार्गावर चालवण्यात येईल, असंही बोललं जात होतं. पण मध्य रेल्वेकडे देखभाल-दुरुस्तीची सोय नाही. या एसी लोकलला मध्य रेल्वेवर प्रवासी मिळणार नाहीत, अशा अनेक सबबी देत ही गाडी पश्चिम रेल्वेकडे वळवली," असं देशमुख यांनी सांगितलं.

"एसी लोकलचं तिकीट न परवडायला मध्य रेल्वेवर राहणारे प्रवासी गरीब आहेत का, देशभरातल्या रेल्वे अधिकाऱ्यांना, इंजिनीअरना समान प्रशिक्षण देऊनही मध्य रेल्वेवर एसी लोकलची देखभाल करण्यात इंजिनीअरना काय अडचणी येतात," नंदकुमार देशमुख विचारतात.

महिला सदस्या लता अरगडेही या मुद्द्याची री ओढतात. त्या म्हणतात, "दरवेळी पश्चिम रेल्वेवर धावून जुन्या झालेल्या गाड्या मध्य रेल्वेवर पाठवतात. आता बंबार्डिअर लोकलबाबतही तेच झालं आहे."

एकच लोकल किती सेवा देणार?

हा मुद्दा मुंबईकरांच्या पुढल्या 9-10 महिन्यांच्या आयुष्यात कळीचा ठरणार आहे. सध्या एकच एसी लोकल आली आहे. या लोकलच्या 12 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

"सध्या मध्य रेल्वेवर 15 डब्यांची एकच लोकल धावते. ही लोकल बऱ्याचदा उशिरानं असते. ही साधी लोकल असल्याने त्यावाचून कोणाचं अडत नाही. पण एसी लोकल अशीच दिरंगाईनं धावली, तर मासिक पासधारक काय थांबून राहणार का," लता अरगडे हा मुद्दा उपस्थित करतात.

एसी लोकलनं जायचं म्हणून लोक पास काढतीलही. पण ही लोकल 15 डब्यांच्या लोकलसारखी 15-20 मिनिटं उशिरानं धावायला लागली, तर काय करणार, हा प्रश्न असल्याचंही त्या सांगतात.

"रेल्वेनं किमान चार लोकल ताफ्यात आल्यानंतरच सेवा सुरू करायला हवी होती. तसंच गेल्या दीड वर्षांमध्ये पुढील गाड्यांची ऑर्डर देण्याची गरज होती. आता नव्या गाड्या येण्यासाठी रेल्वे आणखी 9-10 महिने थांबणार आहे," अरगडे यांनी स्पष्ट केलं.

आरामदायक प्रवासासाठी खटाटोप

याबाबत पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकूल जैन यांनी सावध प्रतिक्रिया दिली.

"ही एक लोकल मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्यात आल्यानंतर त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. अशा आणखी दहा लोकल ताफ्यात येतील. या दहांमधली पहिली लोकल येण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागेल," जैन यांनी सांगितलं.

रेल्वेनं या एसी लोकलचं तिकीटही जास्त महाग ठेवलेलं नाही. त्यामुळे सामान्य प्रवाशांना सहजपणे या लोकलमधून प्रवास करता येईल, असंही जैन यांनी सांगितलं.

इतर कोणत्याही आक्षेपावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.

तुम्हाला हेदेखील वाचायला आवडेल

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)