You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुलभूषण जाधवांची आई आणि पत्नीशी भेट पण मध्ये काचेची भिंत!
सोमवारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांनी त्यांची पाकिस्तानमध्ये जाऊन भेट घेतली. पाकिस्तानात भारतासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची त्यांच्या आई आणि पत्नीनं इस्लामाबादमध्ये सोमवारी भेट घेतली.
या भेटीनंतर पकिस्तान सरकारनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत कुलभूषण यांचा एक व्हीडिओ मीडियाला दाखवण्यात आला. त्यामध्ये ते पाकिस्तान सरकारचे आभार मानताना दिसून आले आहेत. दरम्यान हा व्हीडिेओ भेटी आधीच रेकॉर्ड केला असावा असं दिसून येत आहे.
कुलभूषण जाधव यांना त्यांच्या आई आणि पत्नीला भेटता येईल, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं होतं. जाधव यांची भेट झाल्यावर त्या लगेच भारतात परततील, असं मंत्रालयनं रविवारी म्हटलं होतं.
बीबीसीच्या प्रतिनिधी शुमैला जाफरी यांनी सांगितलं, "जाधव यांच्या आई आणि पत्नी फार गंभीर होत्या. त्या माध्यमांशी काहीही न बोलता, नमस्कार करून पुढे निघून गेल्या."
पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता मोहम्मद फैझल यांनी भेटीच्या कार्यक्रमाची रूपरेषा आखली होती. या भेटी वेळी इस्लामाबादमधले भारताचे उप-उच्चायुक्त जे.पी. सिंह उपस्थित होते.
3 मार्च 2016 ला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानात अवैधपणे हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना अटक केली होती.
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं हेरगिरी आणि कट्टरतावादी कृत्यांचा पुरस्कार केल्याच्या आरोपावरून जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.
मात्र, मे महिन्यात इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसनं भारत सरकारच्या अपीलावर जाधव यांना शिक्षा देण्यावर प्रतिबंध केला होता.
सोमवारी झालेल्या या भेटीबद्दल पाकिस्तान सरकारचं मनपरिवर्तन कसं झालं आणि त्यांनी कुटुंबीयांना पाकिस्तानमध्ये येण्याची परवानगी कशी दिली, यावरून पाकिस्तानी पत्रकार वेगवेगळे अंदाज बांधत आहे.
पाकिस्तानचे उच्चायुक्त सोहेल महमूद आणि भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची एक बैठक झाली होती. त्या बैठकीत सुषमा स्वराज यांनी हा मुद्दा लावून धरला होता, असं काही पत्रकारांचं म्हणणं आहे.
आपल्या वकिलाला भेटण्याचा अधिकार, अर्थात 'कॉन्सुलर अॅक्सेस' कुलभूषण जाधव यांना देण्यात यावा, अशी मागणी भारतानं वारंवार केली आहे. पण ती पाकिस्ताननं धुडकावून लावली आहे.
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याकडे कुलभूषण जाधव यांनी क्षमेची याचना केली होती. यावर देखील अद्याप सुनावणी झाली नाही.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)