फोटो पाहा : अभिजीत कटकेने असा पटकावला महाराष्ट्र केसरी किताब

    • Author, राहूल रणसुभे
    • Role, बीबीसी मराठी

अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अखेर पुण्याच्या अभिजीत कटकेने जिंकली.

साताऱ्याच्या किरण भगतला पराभूत करून अभिजीतने महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावर घेतली. अत्यंत चुरशीच्या लढतीत डाव-प्रतिडावांची खेळी करीत पुण्याच्या या तरुणानं विजय मिळवला.

पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भूगावमध्ये 61वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली.

विजेत्या अभिजीत कटकेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रसे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते गदा देण्यात आली.

अभिजीतला महिंद्रा थार गाडी आणि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतला बुलेट देऊन सन्मानित करण्यात आलं.

अशी रंगली अंतिम लढत

सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये अभिजीत आणि किरणने प्रथम एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतला.

सुरुवातीला अभिजीतने किरणच्या हाताला चुकीच्या पद्धतीने हिसका दिला. त्यामुळे किरणचा हात दुखावला आणि तो मॅटच्या बाहेर पडला आणि अभिजितला याचा १ गुण मिळाला.

अभिजीतला पंचांनी ताकीद दिली आणि पुन्हा कुस्ती सुरू झाली. त्यानंतर दोघेही आक्रमक झाले. एक मिनिटापर्यंत दोघांमध्ये 1-0 अशी बरोबरी होती.

पुन्हा अभिजीतनं किरणवर आक्रमक होऊन 2 गुण मिळविले. मात्र आपली सुटका करून घेत किरणनं अभिजीतच्या पाठीवर येऊन 1 गुण मिळवला. मध्यंतरापूर्वी 3-1 अशी गुणसंख्या होती. मध्यंतरानंतर किरण मात्र आक्रमक झाला.

खाली खेचण्याचा अभिजीतचा प्रयत्न त्याने 2 वेळा धुडकावून लावला. त्यानंतर पंचांना किरणला कुस्ती करण्याची ताकीद द्यावी लागली.

पुन्हा अभिजीतने किरणच्या हाताला चुकीच्या पद्धतीने झटका दिला. त्यावेळी किरणच्या प्रशिक्षकांनी आक्षेप घेऊन गुणांची मागणी केली. व्हीडिओ पाहून पंचांनी अभिजीतच्या विरोधात 2 गुण किरणला दिले.

त्यामुळे 3-3 अशी बरोबरी झाली होती. निष्क्रियतेच्या विरोधात अभिजितला पुन्हा 1 गुण मिळाला.

पुढच्या मिनिटाला किरणनं उंचीवरून अभिजीतला खाली खेचलं. यावेळी किरणच्या प्रशिक्षकांनी त्याला 4 गुण द्यायला हवेत, असा आक्षेप घेतला.

हा आक्षेप मान्य करत पंचांनी किरणच्या बाजूनं निकाल दिला. दुसऱ्या फेरीत 4-7 अशी गुणसंख्या झाली.

पुढच्या क्षणात चपळाईनं किरणनं डाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु अभिजीतने त्याला न जुमानता त्याच्यावरच पकड घेतली आणि २ गुण मिळवले.

त्या पकडीतून शेवटच्या 23 सेकंदात अभिजीतनं वेगळा डाव टाकून 2 गुणांचीही कमाई केली. यावेळी 8-7 अशी गुणसंख्या झाली.

त्यानंतर किरणचा प्रयत्न अखेरचा हाणून पाडत अभिजीतनं किरण त्यावर टाकू पाहत असलेला डाव धुडकावला.

उलट अभिजीतनं किरणवर आक्रमकरीत्या पकड मिळवत 2 गुण खिशात टाकले. निर्धारीत वेळेत 10-7 गुण कमवत अभिजीतने महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावर घेतली.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)