You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
समानतेच्या लढ्यासाठी ती रंगभूमीवर विवस्त्र अवतरते तेव्हा...
कल्पना करा, एक तरुण महिला स्टेजवर नग्नावस्थेत उभं राहून सादरीकरण करत आहे. संकुचित भारतीय समाजात अशी कल्पना करणं जरा कठीण असलं तरी नाट्यलेखिका आणि अभिनेत्री मल्लिका तनेजा यांच्यासाठी शरीर हे समानतेची लढाई लढण्याचं प्रभावी साधन आहे.
"मी पहिल्यांदा एका सार्वजनिक ठिकाणी नग्नावस्थेत सादरीकरण केलं... ते फारचं गंमतीशीर होतं."
"तिथं एक कॅमेरामन होता. तुम्ही जर फुटेज बघीतलं तर प्रकाश पडल्यावर कॅमेरा हललेला दिसतो. तो शॉकमध्ये गेला होता. आणि प्रेक्षकांमधूनही कोणीतरी अय्यो! असं म्हणालं," मल्लिका तनेजा हे आठवून जोरादार हसतात.
त्यांच्या नाटकाविषयी भरभरून बोललं जात असलं तरी 33 वर्षीय मल्लिका म्हणतात, नग्नता हा त्यांच्यासाठी मुद्दाच नाही.
'थोडी काळजी घ्या' हे लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करतं. खरंच महिलांच्या कपड्यांचा लैंगिक हिंसेशी काही संबध आहे का?
"कोणत्याही समुहाला पांगवण्यासाठी काय लागतं? फक्त एका व्यक्तीची असहमती."
"फक्त एक शरीर भरगर्दीमध्ये उभं राहून हे थांबवू शकतं," त्या म्हणतात.
"उदाहरणार्थ, जर सर्व लोकं एका दिशेनं पळत असतील आणि तो प्रवाह थांबवयाचा असेल तर फक्त एक व्यक्ती विरुद्ध दिशेनं पळणारी असावी."
सुरुवातीच्या दृष्यांमध्ये जेव्हा त्या नग्न अवस्थेत आठ मिनिटं प्रेक्षकांकडे फक्त पाहत असतात. हे एक त्याचं उदाहरण आहे.
गेल्या चार वर्षांत त्यांनी केलेल्या प्रत्येक प्रयोगावेळी सुरूवातीच्या त्या मिनिटांत नाट्यगृहात अगदी शांतता पसरलेली असते.
त्या क्षणाविषयी मल्लिका सांगतात की, त्या जेव्हा त्यांच्याकडे बघणाऱ्या प्रेक्षकांकडे बघतात तेव्हा त्यांना जाणवतं ते त्यांच्या शरीराचं सामर्थ्य. अर्थात, त्यावेळी त्या सर्वांत असुरक्षितही असतात.
"विशेषतः एक महिला म्हणून ही संपूर्ण कल्पनाच आकर्षक वाटू लागते. आपलं शरीर असं काय आहे की जे लोकांना इतकं घाबरवत आणि जे नेहमी लपवलं जातं आणि नियंत्रित होतं?"
नग्नावस्थेत स्टेजवर सादरीकरण करणं हा त्यांच्यासाठी आजही अयोग्य अनुभव आहे. नाट्यगृहात मोबाईल फोन किंवा इतर रेकॉर्डिंगची उपकरणं आणण्यास त्यांचा सक्त विरोध आहे. म्हणूनच चार वर्षांत त्यांचा नाट्यातील एखादं नग्न छायाचित्र किंवा व्हीडिओ ऑनलाईन आलेला नाही.
जसंजसं प्रयोग पुढे सरकत जातो तसतशा तनेजा जास्तीत जास्त कपडे अंगावर चढवतं जातात. एकवेळी तर त्या हेल्मेटही घालतात. दरवेळेस त्यांच्या प्रेक्षकांना त्या सांगत असतात की, एक महिला म्हणून त्यांना 'थोडी काळजी घेणं' गरजेचं आहे.
"थोडी काळजी घ्या' हे असं वाक्य आहे जे बरेचदा लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्यांच्या बाबतीत वापरलं जातं. ते लज्जास्पद आहे. महिलांना नेहमी विचारलं जात त्या रात्री उशीरापर्यंत बाहेर काय करत होत्या?"
"पुरूषासोबत त्या एकट्याच का होत्या? त्यांनी विशिष्ट कपडेच का परिधान केले होते? त्यांना सातत्यानं सांगितलं जात की त्याही काही प्रमाणात यास जबाबदार आहे, त्यांनी थोडी काळजी घ्यायला हवी होती."
त्यांच्या शरिराचा वापर एका शस्त्रासारखा करत तनेजा या प्रवृत्तीलाच आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत.
"महिला सहजपणे याच्याशी जुळवून घेतात. परंतु महत्त्वाचं म्हणजे अनेक पुरुष म्हणतात की, त्यांच्यासाठी हे एक डोळे उघडणारं आहे."
"काहीजण म्हणतात, हा नाट्यप्रयोग बघीतल्यानंतर त्यांना पुरुष म्हणून घ्यायची भीती वाटते. पण माझ्या प्रयोगाचा हा मुद्दाच नाही. त्यांनी स्वतःविषयी वाईट वाटून न घेता संवादाची सुरूवात करावी."
एकपात्री प्रयोगाकरिता त्यांना स्वतःच्याच आयुष्यापासून प्रेरणा मिळाली. मल्लिका अविवाहित आहेत. एकट्या राहतात आणि नऊ ते पाच अशी नोकरी न करता नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून त्यांचा खर्च भागवतात.
यातून त्यांनी जे यश आणि आर्थिक सुरक्षितता मिळाली आहे त्यानं जगण्यासाठी अधिकचं बळ दिलं आहे, हे त्या मान्य करतात.
"कोणी नाही, माझे वडिल किंवा कुटुंबही नाही. माझ्या राहणीमानाविषयी किंवा कामाविषयी कोणीही प्रश्न उपस्थित करत नाही," त्या म्हणतात.
या प्रकारचं स्वातंत्र्य दुर्मिळ राहीलेलं नाही. पण अद्यापही भारतात ते आदर्श मानलं जात नाही. अविवाहीत महिला असतील तर त्यांनी पालकांच्याच घरात राहणं अपेक्षित असतं.
प्रत्यक्षात या प्रकारचा विद्रोह दुर्लक्षित असला तरी महत्त्वपूर्ण आहे. अनेक तरुण महिला त्यांच्या छायेतून बाहेर येत असून त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. तनेजा हेच सांगायचा प्रयत्न करतात की, त्या त्यांच्या कामातून हे सर्व पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
"नाही म्हणायचा अधिकार आपल्याला आहे. त्याचे परिणाम होतील, आमच्या पैकी काही जणींना इतरांच्या तुलनेत हे करणं सोपं आहे. परंतु शेवटी हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. जर आपण नाही म्हटलं नाही तर मग कोण म्हणेल?"
महिला एकदा जरी नाही म्हणत असेल तर ते समानतेच्या धेय्यासाठी तिचं योगदान असतं. लोकांना एकत्र आणण्यासाठी मोठ्या चळवळीचं महत्त्व ती मान्य करते. बदल तेव्हाच होईल जेव्हा एक व्यक्ती तिच्या निर्धारावर ठाम असेल, असंही ती आवर्जून सांगते.
भारतानं 2012 मध्ये हे घडताना पाहिलं आहे. दिल्ली गँग रेपनंतर हजारो महिला रस्त्यावर उतरल्या. आता फार झालं अशा घोषणा देत होत्या. या रागाचा परिणाम म्हणूनच भारतात बलात्काराविरोधात कडक कायदे करण्यात आले.
त्यानंतर वर्षभरानंतर मुंबईत एका फोटो जर्नालिस्टसोबत झालेल्या गँगरेपमुळं मल्लिका व्यथित झाल्या. त्यावेळच्या संतापातूनच त्यांना हा प्रयोग करण्यास प्रोत्साहन मिळालं.
"लढाई कशासाठी आहे? आपलं शरीर आणि जे ते परिधान करतात त्यासाठी," त्या म्हणतात.
त्यांना अनेक प्रश्नांनाही सामोरं जावं लागतं.
त्यांचा नाट्यप्रयोग पाहिल्यानंतर अनेक महिला विचारतात तुम्ही जर सडपातळ नसतात तर तुम्ही हा प्रयोग केला असता का?
"माझ्याजवळ त्या प्रश्नाचं उत्तर नाही. हे एकमेव शरीर मझ्याजवळ आहे. मी इतकचं म्हणू शकते की मला आशा आहे. मला याची कल्पना आहे की, माझ्यासारखं शरीर हे समाजात जास्त प्रमाणात स्वीकारलं जातं," त्या विचारपूर्वक सांगतात.
प्रयोगागणिक हे सोपं होत गेलं असं त्या मान्य करतात. अनोळखी लोकांसमोर उभं राहणं हे प्रेक्षकांतील ओळखीच्या लोकांपेक्षा जास्त चांगलं आहे. पण अजूनही लांबचा पल्ला गाठायचा आहे.
"कधीकधी मला बरं वाटतं नसतं. कधी पाळी सुरू असते. तरीसुद्धा मला जावंच लागतं, तिथं उभं रहावं लागतं. प्रयोग करावा लागतो," त्या म्हणतात.
"पण हे माझं शरीर आहे आणि त्यावरचं माझं नियंत्रण मला घालवायचं नाही."
(हा लेख समानतेसाठी लढा देणाऱ्या भारतीय महिला या मालिकेचा एक भाग आहे.)
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)