You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गूगल डूडलवर आलेल्या पहिल्या भारतीय महिला फोटोग्राफर कोण होत्या?
भारताच्या पहिल्या महिला छायाचित्रकार होमी व्यारावाला यांचा शनिवारी म्हणजेच 9 डिसेंबरला 104वा जन्मदिन होता. यानिमित्ताने गूगलनं डूडलद्वारे त्यांचा सन्मान केला. पण त्या नेमक्या होत्या कोण? चला जाणून घेऊया.
होमी यांचा जन्म 1913मध्ये गुजरातच्या नवसारीमध्ये झाला.
शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या होमी यांनी त्यानंतर व्यावसायिक फोटोग्राफीला सुरुवात केली.
स्वत:च्या डोळ्यांनी ब्रिटिशांचा निरोप समारंभ पाहणारे अनेक होते. पण त्यांच्यापैकी 21व्या शतकात जिवंत असलेल्या काही मोजक्या लोकांमध्ये होमी यांचा समावेश होता.
संपूर्ण कारकीर्दीत होमी यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, भारतभेटीवर येणाऱ्या विदेशातील पाहुण्यांची आणि ऐतिहासिक प्रसंगांची छायाचित्रं टिपली आहेत.
यामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, भारतातले शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन, दलाई लामा आदी व्यक्तींचा समावेश होतो.
"जवाहरलाल नेहरूंचे फोटो घेणं मला सर्वाधिक आवडायचं," असं होमी यांनी अनेक मुलाखतींत सांगितलं होतं.
"नेहरूंच्या कार्यक्रमाला मी नेहमी उपस्थित राहायचे. तू इथं पण आलीस? असं मला बघितल्यानंतर नेहरू म्हणायचे."असं होमी यांनी 'प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया' या वृत्तसंसथेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
पारशी कुटुंबात जन्मलेल्या होमी यांचं पुढील शिक्षण मुंबईमध्ये झालं. 1942 साली त्या दिल्लीत आल्या.
आपल्या कारकीर्दीत होमी 20 व्या शतकातील महनीय व्यक्तींच्या संपर्कात आल्या.
अनेकदा तर त्यांनी सुरक्षेचा कडोकोट बंदोबस्त भेदून असे फोटो मिळवले जे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मिळवता आले नाही.
अनेकदा सुरक्षेचा कडोकोट बंदोबस्त भेदून होमी यांनी फोटो मिळवले. यामुळेच कदाचित होमी यांच्यावर समीक्षकांनी टीका केली असावी.
होमी यांचं कार्य हे अतिशयोक्ती दर्शवणारं होतं. तसंच नवीन राष्ट्रांच्या वचनांसंबंधी भ्रमनिरास करणारंही होतं. असं त्यांच्या समीक्षकांचं मत आहे.
उत्कृष्ट छायाचित्रांमधून आपल्या व्यवसायाला न्याय देणाऱ्या छायाचित्रकार म्हणून होमी व्यारावाला यांची ओळख आहे.
15 जानेवारी 2012 रोजी बडोदा येथे राहत्या घरी होमी यांचं निधन झालं. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त गूगलने 'फर्स्ट लेडी ऑफ द लेन्स' असं म्हणत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
(सर्व छायाचित्र सौजन्य होमी व्यारावाला आर्काईव्ह/ अल्काझी कलेक्शन ऑफ फोटोग्राफी)
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)