जेरुसलेमचा वाद : मराठी ज्यूंच्या स्थलांतराची कथा

    • Author, रोहन टिल्लू
    • Role, बीबीसी मराठी

"अठरा वर्षं ठाण्यात काढल्यानंतर एकदम इस्राईलला स्थायिक होण्याचा निर्णय सोपा नव्हता," शर्ली पालकर सांगतात. "अनेक अडचणी आल्या. पण सगळ्या अडचणींवर मात करून मी इथे राहत आहे. इस्राईल आता माझा देश आहे, पण त्याचबरोबर भारताबद्दल आजही तेवढीच आपुलकी वाटते," असं त्या पुढे सांगतात.

शर्ली ठाण्यातल्या श्रीरंग सोसायटी आणि नंतर वृंदावन सोसायटीमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. बारावीपर्यंतचं शिक्षण ठाण्यातल्याच पाचपाखाडीमधल्या सरस्वती एज्युकेशन ट्रस्टच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये झालं.

वयाच्या 18व्या वर्षी त्या इस्राईलमध्ये स्थायिक झाल्या. आता त्या तिथल्या गेदेरा शहरात राहतात आणि इस्राईलच्या शिक्षण विभागात मार्केटिंग आणि अॅडव्हर्टायझिंग व्यवस्थापक आहेत.

"पर्यटक म्हणून मी अनेकदा इस्राईलमध्ये आले होते. माझी चुलत भावंडं वगैरे इथंच राहतात. 18व्या वर्षी अशीच पर्यटक म्हणून आले आणि मला इथल्या संधी, हा देश खुणावत गेला. मग मी इथेच स्थायिक व्हायचा निर्णय घेतला," शर्ली सांगतात.

इस्राईलचं नागरिकत्व आणि आव्हानं

1999 साली इस्राईलमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय शर्लीसाठी सोपा नक्कीच नव्हता. पर्यटक म्हणून येण्यात आणि नागरिक म्हणून स्थायिक होण्यात प्रचंड फरक आहे, हे त्यांना जाणवला.

"सर्वांत मोठी अडचण भाषेची होती. आम्ही ज्यू असलो तरी भारतात मराठी, हिंदी, इंग्रजीच बोलत आणि लिहीत होतो. पण इथे हिब्रूशिवाय दुसरी भाषाच बोलत नाहीत."

"मग सुरुवातीला सरकारतर्फे मोफत असलेला बेसिक कोर्स केला. त्यानंतर स्वत: पदरमोड करून चार परीक्षा दिल्या," शैली यांना 18 वर्षांपूर्वीचे दिवस अजूनही आठवतात.

भाषेबरोबरच त्यांना कपडे, जेवण, चालीरीती अशा सगळ्याच पैलूंवर आव्हानं आली. भारतातून इस्राईलमध्ये गेलेल्या इतर बेने इस्राईल लोकांप्रमाणे त्यादेखील हळूहळू तिथं स्थिरावल्या.

"तरीही इस्राईलमधले बेने इस्राईल लोक आपलं वेगळेपण जपून आहेत," असं त्या सांगतात.

"इतर देशांमध्ये ज्यू लोकांवर अन्याय झाले. काही देशांमध्ये अनन्वित अत्याचार झाले. त्यामुळे त्या देशांमधून आलेल्या ज्यू लोकांना त्यांचा देश, त्याबाबतची कोणतीही गोष्ट विसरायची आहे."

"पण बेने इस्राईलींचं तसं नाही. भारतानं आम्हाला आपलं मानलं, आपुलकी दिली. त्यामुळे आम्हाला अजूनही भारताबद्दल आपुलकी वाटते," असं शर्ली सांगतात.

महाराष्ट्रातून इस्राईलमध्ये स्थायिक झालेल्या शर्ली काही एकट्याच नाहीत. 1948पासून हळूहळू अनेक मराठी ज्यू इस्राईलमध्ये जायला लागले आणि तिथे स्थायिक झाले. आजमितीला इस्राईलच्या गेदेरा, तेल अविव, बीरशेवा, अशदोद, येरुहाम, दिमोना, हैफा अशा शहरांमध्ये सुमारे 50 हजारांपेक्षा जास्त मराठी ज्यू आहेत, असं रूईया महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक विजय तापस सांगतात.

पण महाराष्ट्रातून इस्राईल हे काही बेने इस्राईली लोकांचं पहिलं स्थलांतर नाही. त्यांचं पहिलं स्थलांतर झालं, दोन हजार वर्षांपूर्वी... तेदेखील इस्राईलमधून महाराष्ट्रात!

कुठून आले बेने इस्राईली?

दोन हजार वर्षांपूर्वी इस्राईलमधून काही ज्यू कुटुंबांना घेऊन जाणारं एक जहाज कोकण किनाऱ्यावर अलिबागजवळ फुटलं. या जहाजातले सात पुरुष आणि सात महिला वगळता सगळेच बुडून मेले. हे 14 जण अलिबागजवळच्या नवगाव या खेड्याच्या किनाऱ्याला लागले आणि भारतात आणखी एका धर्माची पाऊलखुण उमटली.

या 14 जणांनी त्यांच्याबरोबर आलेल्या, पण बुडून मरण पावलेल्यांवर नवगावच्या किनाऱ्याजवळच अंत्यसंस्कार केले. ही भारतातली पहिली ज्यू दफनभूमी होती.

त्यावेळी रायगड जिल्ह्यात राहणाऱ्यांना या नव्या लोकांचं आकर्षण वाटणं स्वाभाविक होतं. हे लोक वेगळी भाषा बोलतात, त्यांच्या चालीरीती वेगळ्या आहेत, हेदेखील त्यांच्या लक्षात आलं.

हे लोक कोण आहेत, असं त्यांनाच विचारलं असता त्यांनी 'बेने इस्राईल' असं सांगितलं.

"हिब्रू भाषेत बेने म्हणजे मुलगा. त्यामुळे बेने इस्राईल म्हणजे इस्राईलचं मूल असा अर्थ होतो," असं मुंबईच्या रूईया महाविद्यालयातील इतिहासाच्या प्राध्यापिका मोहसिना मुकादम यांनी सांगितलं.

'शनिवार तेली' का म्हणतात?

कोकणात ज्यू लोकांना शनिवार तेली असं म्हणतात. त्याचं कारण काय असावं?

बेने इस्राईल समाज महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर विखुरला आहे. तेल गाळणं हा यांचा मुख्य व्यवसाय होता. त्यांचे तेलाचे घाणे असायचे. तसंच शनिवारी ते काम बंद ठेवायचे. त्यामुळे त्यांना कोकणात 'शनिवार तेली' म्हणूनही ओळखलं जातं.

जहाज फुटल्यानं भारतात आलेल्या बेने इस्राईली लोकांकडे धर्मग्रंथ नव्हते. त्यामुळे त्यांनी जसं जमेल तसं हळूहळू आपला जम बसवायला सुरुवात केली.

ब्रिटिश राजवटीच्या काळात कोकणातले बेने इस्राईली मुंबईत स्थिरावले. 1948मध्ये इस्राईल राष्ट्राची निर्मिती झाली. त्या वेळी जगभरातल्या ज्यूंनी आपल्या 'प्रॉमिस्ड लँड'मध्ये परत यावं, आवाहन करण्यात आलं.

या आवाहनाला प्रतिसाद देत भारतातल्या बेने इस्राईलींनीही टप्प्याटप्प्याने इस्राईलकडे जायला सुरुवात केली.

तिथे गेल्यानंतरही त्यांनी महाराष्ट्रातील संस्कृती काळजीपूर्वक टिकवली आहे.

जसा सत्यनारायण, तसाच मलिदा

"कोकणात राहणाऱ्या आणि कोकणी लोकांच्याच चालीरीती आत्मसात करणाऱ्या या लोकांचं वेगळेपण इंग्रजांनी हेरलं. ज्यू लोक खवले असलेलेच मासे खातात, ते शनिवारी चूल पेटवत नाहीत, त्यांचं जेवण सोवळ्यातलं म्हणजेच 'कोशर' पद्धतीचं असतं. कोणते प्राणी कसे कापायचे याचीही त्यांची पद्धत ठरलेली आहे. हे लोक ज्यू आहेत, हे कळायला इंग्रजांना फार वेळ लागला नाही," असं निरीक्षण मोहसिना मुकादम नोंदवतात.

पुण्यात राहणारे सॅम्युअल रोहेकर निवृत्त इंजिनीअर आहेत. स्वत: बेने इस्राईली असलेल्या सॅम्युअल यांच्या अनेक पिढ्या रायगड जिल्ह्यातल्या रोह्यात वास्तव्याला होत्या. त्यानंतरच्या दोन-तीन पिढ्या गुजरातमध्ये होत्या. त्यांचे आजोबा नंतर पुण्यात आले.

बेने इस्राईल समाज भारतात पसरला तो इंग्रजांच्या आमदनीत, असं निरीक्षण सॅम्युअल नोंदवतात. रेल्वे, लष्कर, वैद्यकीय सेवा आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये बेने इस्राईली लोक पुढे आले आणि भारतभर विखुरले, असं सॅम्युअल सांगतात.

ते पुढे सांगतात, "त्याच दरम्यान हे ज्यू मुंबईतही आले. मुंबईत मशीद बंदर स्थानकाजवळ सर्वांत जुना सिनेगॉग म्हणजे ज्यूंचं प्रार्थनास्थळ आहे. त्याच्याच पुढे आणखी एक सिनेगॉग आहे. हे दोन्ही सिनेगॉग बेने इस्राईली लोकांचे आहेत."

बेने इस्राईली लोकांच्या लग्नात हळद होते, मुंडावळ्या बांधल्या जातात. तसंच नववधू हिरव्या रंगाचा चुडाही भरते, असं सॅम्युअल सांगतात.

ज्यू लोकांच्या सिनेगॉगमध्ये कोणत्याही देवाची मूर्ती नसते. पश्चिम दिशेकडे असलेल्या एका कपाटात पवित्र ग्रंथ ठेवलेले असतात. त्या ग्रंथांना 'सेफेरतोरा' म्हणतात. ते महिन्यातल्या मुख्य शनिवारी बाहेर काढून त्याचं वाचन होतं.

ताज्या द्राक्षांच्या वाईनला ज्यू लोकांमध्ये 'किद्दुश' म्हणतात. या वाईनला त्यांच्या लग्नविधीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसं हिंदूंमध्ये अग्नीला साक्षी मानून लग्नं होतात, तसंच बेने इस्राईली लोकांमध्ये या किद्दुशला म्हणजेच वाईनला साक्षी मानून लग्नं होतात.

शर्ली पालकर म्हणतात, "मलिदा हे प्रकरणही सत्यनारायणासारखं आहे. कोणत्याही शुभ कार्यानंतर किंवा आधी मलिदा करतात. अगदी लग्नानंतर, मूल झाल्यावर, कोणत्याही शुभ प्रसंगी मलिदा करतात."

तसंच ज्यू लोकांची कालगणना चंद्रावर अवलंबून असते. सूर्य मावळला की, त्यांचा एक दिवस संपून दुसरा दिवस सुरू होतो. ही गोष्ट फक्त बेने इस्राईलच नाही, तर सगळ्याच ज्यूंमध्ये समान असतं.

या बेने इस्राईल ज्यूंबद्दल शर्ली सांगतात, "जगभरातील ज्यू आणि हे बेने इस्राईली यांच्यात अनेक बाबतीत फरक आहेत. इतर देशांमध्ये ज्यूंवर अत्याचार झाल्याने ते त्यांच्या त्यांच्या लोकांमध्येच राहिले. याउलट कोकणातले ज्यू इथल्या स्थानिकांमध्ये मिसळले. एवढंच नाही, तर त्यांनी इथल्या लोकांच्या चालीरीतीही उचलल्या."

मराठी शिकण्याची तळमळ

इस्राईलला गेलेल्या बेने इस्राईलींच्या पुढील पिढ्यांना मराठी बोलता येतंच असं नाही. त्यासाठी आता तिथल्या लोकांनी एकत्र येऊन मराठी भाषेचा अभ्यासक्रमही सुरू केला आहे.

या अभ्यासक्रमाचाच भाग म्हणून रूईया महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक विजय तापस इस्राईलला गेले होते. "इस्राईलमध्ये गेलेल्या बेने इस्राईलींना अजूनही मराठी भाषेबद्दल प्रचंड आस्था आहे. भारतात असलेल्या आपल्या समाजाकडेही त्यांचं लक्ष आहे. मुंबईतील अनेक सिनेगॉग्जचा खर्च ते इस्राईलवरून उचलतात." तापस सांगतात.

मराठी शिकण्यासाठीची त्यांची तळमळही वाखाणण्याजोगी असल्याचं तापस सांगतात.

भारताची बातच न्यारी

"इस्राईलमध्ये अनेक देशांमधले ज्यू आहेत. प्रत्येक देशातल्या ज्यू लोकांची प्रार्थना करण्याची पद्धत वेगळी असते. पण प्रार्थना मात्र तीच असते."

"बेने इस्राईल लोक त्यांच्यातल्या 'मलिदा' या प्रथेमुळे वेगळे ठरतात. पण विशेष म्हणजे आता इतर देशांमधून आलेल्या ज्यूंबरोबरही बेने इस्राईलींची लग्न होतात आणि त्यांनाही मलिदाबद्दल आकर्षण वाटू लागलं आहे," शर्ली यांचा बेने इस्राईलींच्या वेगळेपणाबद्दलचा अभिमान त्यांच्या बोलण्यातून जाणवतो.

त्या अनेकदा भारतात येतात. "भारतात आल्यावर मला काय खाऊ आणि काय नको, असं होतं. घराजवळ मिळणारा वडा तर विमानतळावरच घेऊन यायला मी आईला सांगते. तसंच पाणीपुरी, चाट वगैरेही खूप आवडतं," हे सांगताना शर्ली यांना भारतातली चाटची गाडीही आठवते.

शर्ली यांचे आईवडीलही नुकतेच ठाण्याहून इस्राईलला स्थायिक झाले. पण इतकी वर्षं भारतात काढल्यानंतर त्यांना इस्राईलला करमणं कठीण जात आहे.

शर्ली यांची मुलगी इस्राईलमध्येच जन्माला आली आहे. तिला मराठी बोलता येतं, पण आता तिला इस्राईलमध्येच राहायचं आहे.

संबधित बातम्या

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)