महाभारतातली द्रौपदी फेमिनिस्ट होती का?

    • Author, सिंधूवासिनी
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

"द्रौपदीचे पाच पती होते आणि त्यांच्यापैकी ती कोणाचंच ऐकायची नाही. ती फक्त आपला मित्र असलेल्या कृष्णाचंच सगळं ऐकायची." हे म्हणणं आहे भारतीय जनता पक्षाचे महासचिव राम माधव यांचं.

त्यांनी द्रौपदीला जगातली पहिली फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी, असं संबोधलं आणि म्हटलं की, "महाभारताचं युद्ध तिच्या हट्टामुळे झालं होतं. या युद्धात 18 लाख लोक मारले गेले होते."

राम माधव यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी त्यांच्या बोलण्यावर आक्षेप नोंदवला आणि असहमती दर्शवली.

प्रसिद्ध लेखिका आणि कादंबरीकार अनिता नायर सांगतात, "द्रौपदी अन्याय आणि असमानतेचा सामना केलेल्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते."

"असं मानलं जातं की नवरा बायकोला सगळ्या अडचणींपासून सोडवतो, तिचं रक्षण करतो. पण द्रौपदीच्या प्रकरणात काय झालं? जेव्हा तिचा भरसभेत अपमान केला तेव्हा तिचे पती मान खाली घालून बसले होते."

'What Draupadi Did To Feed Ten Thousand Sages' नावाचं पुस्तक लिहिणाऱ्या अनिता नायर मानतात की, "द्रौपदी परिस्थितीनं लाचार झालेली महिला होती. तिला आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली नाही."

दोन दंतकथा

अनिता नायर विचारतात, "या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर द्रौपदी स्त्रीवादी कशी होईल? द्रौपदीनं आपल्या मनानं पाच नवरे निवडले होते का?"

द्रौपदीच्या पाच पतींबाबत दोन नवीन दंतकथा आहेत. पहिली अशी की स्वयंवर झाल्यावर अर्जुन जेव्हा आपल्या भावांसोबत कुंतीजवळ गेला तेव्हा तिनं सांगितलं की, तुम्हाला जे काही मिळालं ते आपसात वाटून घ्या.

कुंतीच्या आदेशाची अवहेलना होऊ नये म्हणून द्रौपदीला पाचही पांडवांची पत्नी व्हावं लागलं.

दुसरी गोष्ट अशी आहे की, द्रौपदीनं मागच्या जन्मी शंकराकडे वेगवेगळे गुण असलेल्या पतीची कामना केली होती. एकाच माणसात असे गुण असणं अशक्य होतं, म्हणून तिला एकाऐवजी पाच पती मिळाले.

द्रौपदी आपल्या पाचही पतींसोबत राहायची, असं नव्हतं. तिला आळीपाळीनं प्रत्येक पतीबरोबर एकेक वर्ष राहायचं होतं. या कालावधीत कुठल्याही अन्य पांडवांबरोबर राहण्याची तिला परवानगी नव्हती.

इतकंच नाही तर काही पौराणिक ग्रंथात सांगितलं आहे आहे की, द्रौपदीला एक वरदान लाभलं होतं. त्यानुसार एका पतीबरोबर एक वर्ष घालवल्यावर तिला तिचं कौमार्य परत मिळायचं.

जर नियम सगळ्यांसाठी सारखे असतील तर कौमार्याचं नूतनीकरण द्रौपदीसाठी इतकं गरजेचं होतं का? पांडवांसाठी का नाही?

महाभारत फक्त अहंकारामुळे

अनिता नायर सांगतात, "राम माधव यांनी द्रौपदीच्या फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी असण्याबद्दल जी कारणं सांगितली आहेत ती हास्यास्पद आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की एकापेक्षा अधिक जोडीदार असणं हे एखाद्या स्त्रीच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा विषय आहे. असं करून कोणी स्त्रीवादी होत नाही."

"राम माधव यांच्या म्हणण्यानुसार तर असं वाटतं की, स्त्रीवादी महिला अराजकता माजवणाऱ्या आणि बेशिस्त असतात आणि प्रत्येक ठिकाणी अडचणी निर्माण करतात..." नायर हसत हसत सांगत होत्या.

स्त्रीवादाचा उद्देश स्त्रियांना आणि पुरुषांना समान हक्क देणं हा असतो हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आम्हाला इतिहास आणि पौराणिक गोष्टींमध्ये अंतर ठेवायला पण शिकायला हवं, असं त्या म्हणतात.

'मिस द्रौपदी कुरु' पुस्तकाच्या लेखिका त्रिशा दास महाभारतासाठी द्रौपदीला जबाबदार ठरवण्याची भूमिका साफ नाकारतात.

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "महाभारताचं युद्ध कौटुंबिक संपत्ती आणि पुरुषांच्या अहंकारामुळे झालं होतं. कोणत्याही महिलेमुळे वगैरे झालं नव्हतं."

द्रौपदीला युद्धाचं कारण सांगणं म्हणजे पीडितालाच दोषी मानण्यासारखं आहे असं त्या ठासून सांगतात.

त्यांनी सांगितलं, "पांडव आणि कौरवांमधल्या शत्रुत्वाचे परिणाम द्रौपदीला भोगावे लागले होते. युद्धासाठी तिला जबाबदार ठरवणं अतिशय चुकीचं आहे."

पण त्या मान्य करतात की, द्रौपदी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या एक सक्षम महिला होती. पण महाभारताचा संदर्भ लक्षात घेतला तर द्रौपदीला स्त्रीवादी म्हणणं त्यांना बरोबर वाटत नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)