नो वन किल्ड दाभोलकर : पोलिसांनी तपास चुकीच्या दिशेने नेला का?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'चे संस्थापक आणि विवेकवादी लेखक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात हत्या झाली, त्याला आज 52 महिने पूर्ण होत आहेत.

52 महिन्यांनी या प्रकरणात एक नवं वळण येतं आहे आणि त्यात झालेल्या तपासाभोवती काही प्रश्न उभे राहत आहेत.

सुरुवातीला झालेला तपास विशिष्ट हेतूनं चुकीच्या दिशेनं केला का? याची चौकशी शासनानं करावी असं मुंबई हायकोर्टानं म्हटलं आहे.

सुरुवातीला महाराष्ट्र पोलिसांकडे असलेला तपास कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर CBIकडे सोपवण्यात आला.

CBIनं तपासाची दिशा बदलत 'सनातन'संस्थेशी संबंधित काही व्यक्तींना संशयित म्हणून अटक केली. पण अद्याप डॉ. दाभोलकरांचे मारेकरी तपास यंत्रणांच्या हाती लागलेले नाहीत.

डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर जेव्हा या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस आणि महाराष्ट्र ATS मिळून करत होते, तेव्हा जानेवारी २०१४ मध्ये मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांना त्यांनी संशयित म्हणून अटक केली.

त्यांच्याकडे सापडलेली बंदूक आणि त्याच नंतर न्यायालयात सादर झालेला बेलेस्टिक रिपोर्ट यांच्या आधारे डॉ. दाभोलकरांच्या हत्येतल्या त्यांच्या सहभागाचा दावा पोलिसांनी केला होता.

सीबीआयकडे तपास

मे 2014 मध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्यात आला. एका याचिकेद्वारे उच्च न्यायालय या तपासावर लक्ष ठेवून होतं.

CBIनं त्यांच्या तपासाअंतर्गत सनातन संस्थेशी संबंधित वीरेंद्र तावडे याला अटक केली आणि सोबतच सारंग अकोलकर आणि विनय पवार यांचाही संशयित मारेकरी म्हणून शोध सुरू केला.

सप्टेंबर २०१६ मध्ये CBIनं दाखल केलेल्या चार्जशीटमध्येही हा उल्लेख केला.

पण त्याअगोदरच महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या नागोरी आणि खंडेलवाल या दोघांनाही वेळेत चार्जशीट दाखल न झाल्यानं जामीन मंजूर झाला होता.

आता तपासावरून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं न्यायालयानं सरकारला द्यायला सांगितली आहेत.

१२ ऑक्टोबरला उच्च न्यायालयात न्यायमूर्ती धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती डांगरे यांनी याचिकेवर सुनावणी करताना या मुद्द्यावर म्हटलं की,

"आम्ही हे जाणून घेऊ इच्छितो की, काही व्यक्तींना अटक झाली, मुद्देमाल हस्तगत केला गेला आणि नंतर या व्यक्ती सुटल्या ही तपास अधिकाऱ्यांकडून मुद्दामहून झालेली कृती होती का? की हे अधिकारी तपासाचा केवळ देखावा करत होते का? गुन्हेगारांशी त्यांचा काही संबंध होता का? त्यामुळेच तपासाची दिशा चुकली का?"

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर म्हणतात,

"पहिल्यांदा जेव्हा महाराष्ट्र पोलिसांकडे केस होती तेव्हा, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांनी प्लँचेट करून डॉक्टरांचे खुनी शोधायचा प्रयत्न केला होता. किती करूण विनोद आहे हा. कोर्टानं आता यासंदर्भात महाराष्ट्र सरकारनं भूमिका घ्यावी असं म्हटलेलं आहे, म्हणजे पोलिसांनी चुकीच्या दिशेनं तपास केला का?

नागोरी आणि खंडेलवाल नावाच्या दोन माणसांना पकडण्यात आलं होतं. प्रत्यक्षात त्यांना सोडून देण्यात आलं. काहीही त्याच्यातून निष्पन्न झालेलं नाही. खूप वेळ गेला त्याच्यामध्ये. म्हणजे अशास्त्रीय आणि चुकीच्या दिशेनं केलेल्या तपासात त्यांनी मौलिक वेळ गमावला."

न्यायालयाकडून कानपिचक्या

न्यायालय आपल्या आदेशात अधिक कठोर होत पुढे म्हणतं,

"जसं याचिकाकर्ते म्हणतात, तशी ही तपासातली गंभीर त्रुट आहे, ज्यामुळे मारेकरी फरार झाले. जर पोलीस दलातली कोणती व्यक्ती यासाठी जबाबदार असेल तर आम्ही आशा करतो की, वरिष्ठ अधिकारी शिस्तपालनाची कारवाई करतील."

"ही एक गंभीर त्रुट आहे आणि वरिष्ठांनीही ती तशीच पाहिली पाहिजे. यावर काय कारवाई केली याचा अहवाल आम्हाला सादर करण्यात यावा."

उच्च न्यायालयाची ही निरीक्षणं आणि आदेशाविषयी आम्ही महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांना विचारलं असता ते म्हणाले,

"मी कामानिमित्त दोन आठवडे बाहेर असल्यानं ही ऑर्डर व्यवस्थित पाहू शकलो नाही. तिचा अभ्यास करूनच प्रतिक्रिया देणे उचित ठरेल."

दरम्यान, CBIचा डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातला तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे. पण मुख्य मारेकरी अद्याप फरार असल्यानं दाभोलकर कुटुंबीय असमाधानी आहेत.

"तपासात काही प्रमाणात प्रगती झाली आहे. उदाहरणार्थ, सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोन व्यक्तींची नावं आलेली आहेत. CBIनं यांच्यावर ५-५ लाखांचं इनाम जाहीर केलेलं आहे. पण अजून ते पकडलेच गेलेले नाहीयेत…"

"असं लक्षात आलं आहे की दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या तिघांच्या खुनामध्ये एक लिंक आहे. एवढ्या सगळ्या लोकांना हे आरोपी हवे असून ते पकडले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे समाधान वाटणं शक्यच नाही," मुक्ता दाभोलकर वैतागून सांगतात.

CBI करत असलेल्या तपासावर 'सनातन संस्थे'ला, ज्यांच्याशी संबंधित वीरेंद्र तावडे यांना अटक करण्यात आली आहे आणि अकोलकर-पवार या दोघांवर दाभोलकरांचे मारेकरी म्हणून संशय घेण्यात आला आहे, या तपासाबाबत आक्षेप आहेत.

"हा संपूर्ण तपास भरकटलेला आहे. CBI कडे कोणतेही पुरावे नाहीत. खरे मारेकरी पकडले जात नाहीत म्हणून 'सनातन'ला लक्ष्य केलं जात आहे. खटला वेगानं चालू दिला जात नाही आणि दिवस काढले जात आहेत," असे 'सनातन संस्थे'चे प्रवक्ते चेतन राजहंस म्हणाले.

हे वाचलंत का ?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)