You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बदलापूरच्या अक्षय कांबळेचं काय झालं?
- Author, प्रशांत ननावरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
कानपूर येथील आयआयटीमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या तिसऱ्या वर्षाला शिकणारा अक्षय कांबळे (२० वर्षे) हा बदलापूरचा तरुण गेल्या २१ दिवसांपासून बेपत्ता आहे.
बदलापूर (पूर्व) मधील अष्टविनायक सोसायटीत राहणारे आणि व्यवसायानं शिक्षक असलेले भीमराव कांबळे मुलाच्या शोधासाठी गेले दोन आठवडे कानपूरमध्येच तळ ठोकून आहेत. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतरही तपासातील दिरंगाईमुळे अक्षयच्या गायब होण्याचं गूढ कायम आहे.
अभ्यासात हुशार असलेला अक्षय जुलै २०१७ मध्ये नेहमीप्रमाणे आपल्या घरी आला होता. त्यानंतर कानपूरला परत गेल्यावर कुटुंबीयांना तो कायम फोन करून खुशाली कळवत असे. २७ नोव्हेंबरला अक्षय घरी येणार होता. परंतु, कॉलेजमध्ये प्रोजेक्टचं काम असल्याचं सांगून रेल्वेचं आरक्षण असूनसुद्धा तो बदलापूरला आला नाही.
त्यानंतर वडिलांनी फोन करून घरी येण्याची विनंती केल्यामुळे रेल्वेचं आरक्षण न करताच २९ नोव्हेंबरच्या रात्री साडेनऊ वाजता पुष्पक एक्स्प्रेसने बदलापूरला येण्यासाठी निघाल्याचं अक्षयने आईला फोन करून सांगितले होते. पण कानपूरहून निघालेला अक्षय महाराष्ट्रात दाखल झालाच नाही.
कुटुंबीयांचा कानपूरमध्येच मुक्काम
मुलाचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी कल्याण लोहमार्ग पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र, अक्षय मुंबईत आलाच नसल्याने तुम्ही त्याला कानपूरमध्येच शोधण्याचा सल्ला पोलिसांनी दिला.
अखेर अक्षयच्या वडिलांनी आयआयटी कानपूर गाठलं. स्थानिक पोलीस ठाण्यात अक्षय बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतरही दोन आठवडे पोलिसांकडून अतिशय धीम्या गतीने तपास सुरू होता.
पण गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनंतर तपासाला वेग आल्याचं भीमराव कांबळे 'बीबीसी'शी बोलताना सांगितलं.
अक्षयकडे एक स्मार्टफोन आणि कॉलिंगसाठी एक साधा फोन होता. यातील साधा फोन आणि दोन्ही सिमकार्ड कॅम्पसमधील एका सफाई कर्मचाऱ्याकडून हस्तगत करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे अक्षय दोन नंबरच्या हॉस्टेलमध्ये राहत होता, पण ही सिमकार्ड पाच नंबरच्या हॉस्टेलच्या कचरापेटीत सापडल्याची माहिती सफाई कर्मचाऱ्याने दिली आहे.
दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला अक्षयच्या हॉस्टेलच्या खोलीची सफाई करताना त्याची दोन एटीएम कार्ड आणि कॉलेजचं ओळखपत्र सापडलं. अक्षय या गोष्टी नेहमी आपल्या पाकिटात ठेवत असे, पण त्याच्यासोबत पाकिट न सापडल्यामुळे अक्षयच्या वडिलांनी आश्चर्य व्यक्त केलं.
सुरुवातीला नुसतीच चौकशी करून सोडून देण्यात आलेल्या दोन्ही कर्मचााऱ्यांचा आता व्हीडिओ जवाबही नोंदवला जाणार असल्याचं कांबळे म्हणाले.
शक्यतांचे खेळ
अक्षयचा अॅँड्रॉईड स्मार्टफोनही त्याच्यासोबत हॉस्टेलमध्येच राहणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणाऱ्या तरुण नावाच्या मित्राकडून हस्तगत करण्यात आला आहे. माझा फोन खराब झाल्याने अक्षयने आपल्याला तो वापरायला दिल्याचं तरुणचं म्हणणं आहे.
जवळपास महिनाभर तो हा फोन वापरत होता, अशी माहिती तरुणने पोलिसांना दिली आहे. तरुण सध्या सुट्टीच्या निमित्ताने पंजाबला त्याच्या घरी गेला आहे.
आई, वडिलांकडे कधीही जास्तीच्या पैशाची मागणी न करणाऱ्या अक्षयने २७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास बँक खात्यातून दहा हजार रुपये काढले होते. त्यानंतर जवळपास साडेतीन लाख रुपये आजही त्याच्या बचत खात्यात तसेच जमा आहेत.
२९ तारखेच्या संध्याकाळी अक्षय एकटाच बॅग घेऊन रिक्षामध्ये बसून जातानाचं कॅम्पसच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. अक्षयला आपण कानपूर रेल्वे स्टेशनला सोडल्याची माहिती सीसीटीव्ही फुटेजमधील रिक्षावाल्याने पोलिसांना दिली आहे.
गेल्या चार महिन्यांपासून तो वर्गात नियमितपणे जात नव्हता, तसंच शेवटच्या सेमिस्टरची परीक्षाही त्याने दिली नव्हती आणि जास्तीत जास्त वेळ लॅपटॉपवर घालवायचा अशी माहिती त्याच्या वसतिगृहातील मित्रांकडून मिळाल्याचं कल्यानपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र सिंग यांनी 'बीबीसी'शी बोलताना सांगितलं.
तपास सुरू असून फोनवर अधिक माहिती देता येणार नाही, असंही सिंग यावेळी म्हणाले.
जीवनशैली संशयास्पद
हॉस्टेलमध्ये अक्षय हा कॉम्प्युटर सायन्सचा आणि बाकीचे इतर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी होते. कॉम्प्युटर सायन्सच्या मुलांना नोकरीमध्ये चांगलं पॅकेज मिळत असल्याने इतर मुलं त्याला चिडवत असत. याबाबत अक्षयने दोन महिन्यांपूर्वी घरीसुद्धा कळवलं होतं, असं कांबळे म्हणाले.
पण चिडवणं फार मनावर घेऊ नकोस आणि त्याचा तुझा आत्मविश्वास वाढण्यासाठीच उपयोग होईल अशी त्यांनी अक्षयची समजूत काढली होती. त्यानंतर याविषयी तो घरी काहीच बोलला नव्हता.
अक्षय अभ्यासात अतिशय हुशार होता. गेल्या दोन वर्षांत त्याला एकूण 80 टक्के गुण आहेत. इतर भाषिक मुलांशी बोलताना त्याचा मराठी आणि हिंदीच्या उच्चारांचा घोळ होत असल्याने इतर मुलं त्याच्यावर हसायची. त्यामुळे तो त्यांच्याशी कमी बोलायचा, अशी माहिती अक्षयच्या वडिलांनी दिली.
'आयआयटी'मध्ये वर्षाला पाच ते सहा सेमिस्टरपैकी एखादी सेमिस्टर अतिशय कठीण असते. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेलाच बसत नाहीत. आणि त्यामुळे क्लासमध्येही जात नाहीत. ती परीक्षा ते नव्याने देतात.
अक्षय म्हणूनच मागच्या सेमिस्टरला बसला नसेल. कारण त्याच्यासोबत आणखी २७ विद्यार्थी त्या परीक्षेला गैरहजर असल्याची माहिती परीक्षा विभागातून मिळाल्याचं अक्षयच्या वडिलांना 'बीबीसी'ला सांगितलं.
मित्रांशी न बोलणं, क्लासला न जाणं, परीक्षेला न बसणं ही कारणं वेगळी असल्याने त्याचा संबंध अक्षयच्या गायब होण्याशी न जोडता, पोलिसांनी लवकरात लवकर सखोल चौकशी करून त्याच्या गायब होण्याचं खरं कारण आणि सर्वप्रथम अक्षयला शोधून काढावं, असं मत कांबळे यांनी 'बीबीसी'शी बोलताना व्यक्त केलं.
हे वाचलंत का ?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)