You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल : 'मुंबईचं विभाजन करून काय होणार? लोकांची कामं होणार का?'
मुंबईतल्या साकीनाका परिसरात सोमवारी सकाळी एका फरसाण फॅक्टरीला आग लागली. या आगीत बारा जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबईमधले काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी मुंबई महानगरपालिकेच्या त्रिभाजनाची मागणी केली.
प्रशासनाच्या सोयीसाठी मुंबई महानगरपालिकेचे पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर आणि मुंबई शहर असे तीन भाग करावेत असं त्यांचं म्हणणं होतं. त्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होता की, काँग्रेसच्या या प्रस्तावाबद्दल तुमचं काय मत आहे.
वाचकांनी त्यांची मतं खुलेपणानं मांडली. त्यातलीच ही काही प्रतिनिधिक मतं.
सुहास पाठक लिहितात की, "हा प्रशासनाच्या दृष्टीनं योग्य निर्णय आहे." मंगेश गहेरवार यांनीही महापालिकेच्या विभाजनाच्या बाजूने मत दिलं आहे.
गहेरवार म्हणतात, "काय हरकत आहे मुंबईचं त्रिभाजन करण्यात? मुंबईची लोकसंख्या आणि विस्तार बघता सध्याच्या व्यवस्थेला मर्यादा पडतात हे स्पष्ट आहे."
संदेश सामंत यांनी ट्वीट केलं आहे की, MMRDAचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण NCR (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) प्रमाणेच वेगळं राज्य व्हावं.
"जर विभाजन झालं तर उद्धव ठाकरेंच्या डोक्याला कमी ताप होईल या पावसाळ्यात. नाहीतरी त्यांच्याकडून मुंबईचे प्रश्न पुढच्या 100 वर्षांतही सुटतील असं वाटतं नाही," असा टोमणा मारला आहे मकरंद ननावरे यांनी.
अर्थात सगळ्याच वाचकांना काँग्रेसची भूमिका मान्य नाही. दीपक चौगुले म्हणतात, "काँग्रेसची ही भूमिका न पटणारी आहे. आधीच मुंबईचे लचके तोडले. त्यात असं विभाजन झालं तर वेगवेगळे गट, भाषावार रचना व्हायला वेळ लागणार नाही."
"विभाजन करून काय होणार? लोकांची कामं होणार का?" संजय देशपांडे विचारतात.
"भाषावार सत्ता गाजवण्यासाठी मराठीद्वेषी काँग्रेसची ही खेळी आहे. काँग्रेस मराठीद्वेषी याचा अर्थ सेना किंवा मनसे मराठी लोकांसाठी फारच चांगली असा मुळीच घेऊ नका. मांडवली सगळीकडे होते राजकारणात," असं मत व्यक्त केलं आहे अमोल शेडगे यांनी.
सचिन चव्हाण लिहितात, "काँग्रेसची ही खेळी, भाषावार मतदारसंघ (उत्तर भारतीय/गुजराथी वगैरे) बळकावण्यासाठी केलेली आहे असं वाटतं. यातून किमान एखादा तरी मासा गळाला लागेल अशी भाबडी आशा त्यांना आहे, असं दिसतं."
हे वाचलं का ?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)