You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका पाकिस्तानला का त्रासली आहे?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पाकिस्तानला धोकेबाज आणि खोटं ठरवलं आहे. अमेरिकेनं गेल्या पंधरा वर्षात पाकिस्तानला अब्जावधी रुपयांची मदत केली आहे. पाकिस्तानला मदत करणं हा मूर्खपणाचा निर्णय होता असं ट्वीट ट्रंप यांनी केलं होतं.
'अमेरिकेनं मागच्या 15 वर्षांत पाकिस्तानला 33 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मदत केली होती. त्यांनी त्या बदल्यात खोटारडेपणा आणि विश्वासघाताशिवाय काहीही केलं नाही. त्यांना असं वाटतं की अमेरिकेचे नेते मूर्ख आहेत, आम्ही अफगाणिस्तानात ज्या कट्टरवाद्यांना शोधत आहोत त्यांना पाकिस्ताननं आश्रय दिला आहे. आता पुरे', अशा शब्दांत ट्रंप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ट्रंप यांच्या वक्तव्यानं पाकिस्तानात खळबळ उडाली. मंगळवारी कॅबिनेटची आपत्कालीन बैठक घेण्यात आली. तर बुधवारी सुरक्षा समितीचीही बैठक घेण्यात आली. पाकिस्तानचे नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत आहेत.
ट्रंप यांच्या वक्तव्याचं महत्त्व का?
न्यूयॉर्कमध्ये असलेले ज्येष्ठ पत्रकार सलीम रिझवी यांनी सांगितलं की, डोनाल्ड ट्रंप यांनी पाकिस्तानला सुनावताना आर्थिक रसदीचा मार्ग बंद करत असल्याचं सांगितलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी फौजांवर हल्ला करणाऱ्या आणि पाकिस्तानचं समर्थन असलेल्या 'हक्कानी नेटवर्क'कडे इशारा केला आहे.
ते म्हणाले, "पाकिस्ताननं अफगाण, तालिबानमधल्या नागरिकांना आपल्याकडे आसरा दिला आहे. अशा लोकांना थारा देऊ नका, असं आवाहन अमेरिकेनं पाकिस्तानला यापूर्वी अनेकदा केलं आहे."
"ट्रंप यांनी पाकिस्तानवर टीका करण्याची ही पहिली वेळ नाही. नुकत्याच प्रकाशित झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणानुसार कट्टरवादी समूहांचा नायनाट करण्याच्या प्रयत्नांत वेग आणण्यासाठी आम्ही पाकिस्तानवर दबाव टाकणार आहोत. कारण कोणताही देश कट्टरवादाचं समर्थन करत नाही," असंही ते सांगत होते.
पाकिस्तानला नोटीस दिली होती?
याशिवाय मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये दक्षिण आशियाबाबतच्या धोरणातसुद्धा अमेरिकेनं पाकिस्तानला आपल्या देशातून कट्टरवादी गटांना बाहेर काढण्याचा इशारा दिला होता.
रिजवी यांनी सांगितलं, "अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेंस अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर असताना बगराम लष्करीतळावर अमेरिकी सैनिकांना संबोधित करताना सांगितलं की अमेरिकेनं पाकिस्तानला पूर्वसूचना दिली होती."
त्यांनी सांगितलं, "पाकिस्ताननं तालिबान आणि इतर कट्टरवादी गटांना पाकिस्तानात संरक्षण दिलं आहे आणि आता ती वेळ निघून गेली आहे. त्याप्रमाणे पाकिस्तानला सूचना देण्यात आली आहे.
ट्रंप यांच्या ट्विटला उत्तर देताना पाकिस्तानचे मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, "आम्ही लवकरच ट्विटला उत्तर देऊ. आम्ही जगाला उत्तर देऊ. तथ्य आणि आभास यांच्यातला फरक आम्ही त्यांना समजावून सांगू. आम्ही आमच्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहोत. पाकिस्तानी सैन्य आणि नागरिकांनी कट्टरपंथीयांविरुद्धच्या लढाईत मोलाचं योगदान दिलं आहे."
पाकिस्तानात उलथापालथ
'अमेरिकेकडून मिळणारी रक्कम ही आर्थिक मदत नाही. उलट कट्टरवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानचा जो पैसा खर्च होतो त्याची ही नुकसानभरपाई आहे', असं पाकिस्तानचं सातत्यानं म्हणणं आहे.
अमेरिकेच्या मते पाकिस्तानतर्फे काही कट्टरवाद्यांवर कारवाई केली जाते. मात्र अफगाणिस्तानमध्ये अमेरिका आणि भारतीयांवर हल्ले करणाऱ्या कट्टरवाद्यांवर पाकिस्तान काहीही कारवाई करत नाही. .
कट्टरवादाचं निर्दालन करण्याऐवजी पाकिस्तान याचा एक माध्यम म्हणून वापर करतो अशी भारताची भूमिका आहे. अमेरिकेत रिपब्लिक सिनेटर ग्रँड पॉल यांनीही ट्रंप यांच्या परखड भूमिकेचं स्वागत केलं आहे.
ट्रंप यांच्या कठोर भूमिकेमागची अमेरिकेची भूमिका काय? अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध कायमस्वरुपी संपुष्टात आले आहेत का? नाईलाजास्तव झालेल्या या मैत्रीचा शेवट झाला आहे का? ट्रंप यांची भूमिका म्हणजे भारताच्या डावपेचांचं यश आहे?
ट्रंप यांना रकमेचा अंदाज नाही?
यासंदर्भात बीबीसीचे प्रतिनिधी वात्सल्य राय यांनी डेलावेयर विश्वविद्यालयातील प्राध्यापक मुक्तदर खान यांच्याशी बातचीत केली. डोनाल्ड ट्रंप यांचं ट्वीट तसंच त्यांचं बोलणं यामागे ठोस विचार आणि अभ्यास नसतो, हे अमेरिकेच्या नागरिकांनी लक्षात घ्यायला हवं. ट्रंप यांना एखादी बातमी मिळते आणि ते त्वरित प्रतिक्रिया देतात.
सप्टेंबर 2011 मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेंड सेंटर आणि अन्य ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर गेल्या दहा वर्षात अमेरिकेनं पाकिस्तानला 33 अब्ज डॉलरची आर्थिक मदत पुरवली आहे. या प्रचंड रकमेविषयी ट्रंप यांना अंदाज नाही. अमेरिकेनं पाकिस्तानला एवढी प्रचंड रक्कम दिली आहे, याची माहिती ट्रंप यांना देण्यात आली. याच काळात पाकिस्तानातल्या एबोटाबादमध्ये सैन्याच्या तळापासून काही किलोमीटरवर ओसामा बिन लादेन लपला होता हेही त्यांना कळलं, तेव्हा त्यांना राग आला आणि त्यांनी ट्वीट केलं.
निवडणुकीच्या आधी आणि नंतरही पाकिस्तानबाबतची डोनाल्ड ट्रंप यांची भूमिका बदललेली नाही. पाकिस्तानकडून मिळणारं समर्थन अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, असं ट्रंप प्रशासनातील काहीजणांना वाटतं. मात्र ट्रंप यांना असं वाटत नाही. पाकिस्तानवर एवढा प्रचंड पैसा खर्च करण्यात येत आहे आणि त्यातून कोणताही फायदा नाही, असं ट्रंप यांच्या लक्षात आल्यानंतर कठोर शब्दांत ट्वीट केलं. याआधीही ट्रंप यांनी अशा स्वरुपाची वक्तव्यं केली आहेत.
अमेरिकेचे पाकिस्तानच्या बाबतीतले धोरण बदलले?
पाकिस्ताननं ट्रंप यांच्या ट्विटला गांभीर्यानं घेतलं आहे. त्याचे संकेत तिथे झालेल्या बैठकीतून मिळत आहेत. त्यावरून पाकिस्तान अमेरिकाविषयक धोरणांमध्ये बदल करतो आहे का?
याच्या उत्तरात राय यांनी सांगितलं, "पाकिस्तानबाबतीत अमेरिकेच्या भूमिकेत बदल झाला आहे. भारत आणि पाकिस्तानबाबत अमेरिकेची भूमिका स्पष्ट दिसते आहे. भारत आणि अमेरिका आपले संबंध आणखी दृढ करण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेबाबत बोलायचं झालं तर अमेरिका पाकिस्तानबरोबरचे संबंध तोडण्याची संधी शोधत आहे.
अमेरिकेचा पाकिस्तानला शेवटचा इशारा?
पण जोवर पाकिस्तानमध्ये कट्टरवादाचा सिलसिला सुरू आहे, तसंच अमेरिकेला जोवर गरज आहे तोवर अफगाणिस्तान, तालिबानला, पाकिस्तानात जागा मिळत राहील. जर पाकिस्तानाच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणाकडे नीट बघितलं तर अंदाज येईल की, अमेरिका सुरक्षा सहाय्यासाठी आपली गुंतवणूक आणि अवलंबित्व कमी करत त्यांनी चीनकडे मोर्चा वळवला आहे.
नाईलाज की नातेसंबंध?
खान यांनी सांगितलं, "डोनाल्ड ट्रंप असो वा आणखी कोणी असो आता यापुढे संबंध दृढ होणार नाही. या संबंधांना दुसऱ्या पातळीवर नेण्याचे प्रयत्न होणार नाहीत. व्यापार किंवा पर्यटन या क्षेत्राचा विचार केला तर या क्षेत्रातसुद्धा पाकिस्ताननं फारशी प्रगती केलेली नाही. 1979 पासून नाईलाज म्हणून हे संबंध सुरू आहेत. पण आता अमेरिकेचे लोक वैतागले आहेत."
"याशिवाय अमेरिका फर्स्ट या धोरणाला इतरांचा पाठिंबा मिळतो आहे. अमेरिकेत स्थायिक झालेले श्वेतवर्णीय, ज्यांना अमेरिकेत राहून 25-30 वर्ष झाली आहेत, तेसुद्धा अमेरिका फर्स्टची बाजू घेत आहेत. अशातच पाकिस्तानला जे वारंवार सहाय्य केलं जात आहेत त्यावर प्रश्न उपस्थित होत राहतील. त्याचं उत्तर पाकिस्तानकडून येणं अपेक्षित आहे आणि तेसुद्धा फक्त शब्दात व्यक्त करून चालणार नाही तर त्यासाठी योग्य पावलं उचलणं आवश्यक आहे," असंही वात्सल्य राय यांनी सांगितलं
मोदींच्या धोरणांचा परिणाम झाला?
खान यांच्यामते, जेव्हा ओसामा बिन लादेनला मारलं तेव्हा अमेरिकेनं पाकिस्तानला याबाबत काहीही सांगितलं नव्हतं. या घटनेनंतर सार्वभौमत्वावर घाला घातला या कारणास्तव पाकिस्तानात खळबळ माजली होती. बराक ओबामा जेव्हा दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा अमेरिकेचा पाकिस्तानवर विश्वास नाही हे स्पष्ट झालं होतं.
"जेव्हा दोन देशांमध्ये विश्वासाचं वातावरण नसतं तेव्हा अडचणी वाढण्याची शक्यता जास्त असते. अमेरिका आणि इस्राईलमध्ये अशीच परिस्थिती आहे. अमेरिका आणि ब्रिटन या देशात सुद्धा तशीच स्थिती आहे. काही अंशी ते अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यात आहे. ओबामा परराष्ट्र धोरणाविषयी सजग होते. त्याबद्दल ते खुलेआम वक्तव्य करत नसतात. ट्रंप मात्र याविषयी बोलत राहतात.
पाकिस्तानवर आणखी हातोडा चालवणार का?
याचा पाकिस्तानवर काय परिणाम होईल? याबाबत ब्रह्म चेल्लानी यांनी ट्वीट केलं आहे, "ज्या आर्थिक मदतीला रोखण्याचा विचार पाकिस्तान करत आहे त्यामुळे पाकिस्तानला फारसा फरक पडणार नाही. कारण चीन आणि सौदी अरेबिया त्यांच्याबरोबर आहे. अमेरिकेला पाकिस्तानबरोबरचा नाटो सहयोगी हा दर्जा परत घ्यायला हवा. त्याचप्रमाणे देशानं प्रायोजित केलेल्या कट्टरवाद्यांच्या नेटवर्कच्या मागची जी ताकद आहे त्यांच्यावर कडक कारवाईची गरज आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)