You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दक्षिण आणि उत्तर कोरियात चर्चेची शक्यता
दक्षिण कोरियानं उत्तर कोरियाला 9 जानेवारीला उच्चस्तरीय चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. दक्षिण कोरियातील पोंगचांगमध्ये फेब्रुवारी महिन्यात हिवाळी ऑलंपिक स्पर्धा होणार आहे. या ऑलंपिकमध्ये उत्तर कोरियाच्या संभाव्य सहभागाच्या अनुषंगनं हा चर्चेचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन यांनी शुक्रवारी या ऑलंपिकमध्ये संघ पाठवण्याचा विचार करत आहे, असं मत व्यक्त केलं होतं. ते म्हणाले होते की, दोन्ही बाजूंनी तातडीनं भेटून या शक्यतेचा विचार केला पाहिजे.
दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी परस्पर संबंध सुधारण्यासाठी ही मोठी संधी आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.
मंगळवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेईन म्हणाले की, खेळाच्या संदर्भातील ही चर्चा उत्तर कोरियाच्या अण्विक चाचणीच्या पार्श्वभूमीवरच होईल.
ते म्हणाले, "उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी दक्षिण कोरिया स्वतंत्र प्रयत्न करू शकत नाही. त्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय समुदाय आणि सहकारी देशांशी समन्वय साधावा."
दक्षिण कोरियाचे एकत्रीकरण मंत्री चो मयोंग ग्योन यांनी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना पानमुंजनोम या गावात भेटण्याचा प्रस्ताव दिला आहे.
हे गाव सीमेवर असून तिथं मोठी सुरक्षाव्यवस्था आहे. या गावात या दोन्ही राष्ट्रांत या पूर्वी ऐतिहासिक चर्चा झाल्या आहेत.
चो म्हणाले, "दक्षिण आणि उत्तर कोरिया यांनी समोरासमोर बसून बोलावं. उत्तर कोरियाच्या पोंगचांगमधल्या स्पर्धेतील सहभाग आणि परस्पर हितसंबंधांत सुधारणा होण्यासाठी चर्चा करावी."
पुढील आठवड्यातील या प्रस्तावित चर्चेमध्ये कोण सहभागी होणार हे समजू शकलेलं नाही, कारण याला अजून उत्तर कोरियानं प्रतिसाद दिलेला नाही.
राष्ट्राध्यक्ष मून यांनी त्यांच्या मंत्र्यांना तातडीनं कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
शेवटची चर्चा केव्हा?
दोन्ही देशांतील शेवटची चर्चा डिसेंबर 2015मध्ये कैसाँग औद्योगिक परिसरात झाली होती.
या बैठकीचा अजेंडा जाहीर करण्यात आला नव्हता. ही चर्चा निष्फळ ठरली होती.
किंम जोंग उन काय म्हणतात?
नववर्षाच्या सुरुवातीला उन यांच्या भाषणात सर्वांनाच धक्का दिला. मी शेजाऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे, असं ते म्हणाले होते.
ते म्हणाले, "2018 उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांसाठी महत्त्वाचं आहे. उत्तर कोरियाचा 70वा वर्धापन दिन आहे, तर दक्षिण कोरियात हिवाळी ऑलंपिक होत आहे. या वर्षाला अधिक अर्थ देण्यासाठी उत्तर आणि दक्षिण कोरियात गोठलेले संबंध सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत."
हे वक्तव्य करण्यापूर्वी उन यांनी अणूबाँबचं बटण माझ्या हातात आहे, अशी धमकी अमेरिकेला दिली होती.
उत्तर कोरियानं गेल्या 2 वर्षांत त्यांच्या अण्विक आणि पारंपरिक शस्त्रांस्त्रांच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सुधारणा केली आहे.
त्यामुळे अमेरिकेनं उत्तर कोरियाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली उत्तर कोरियाला अलग पाडावं यासाठी अमेरिका इतर देशांना प्रोत्साहित करते. यात काहीतरी खंड पडावा या उद्देशानं उत्तर कोरियानं ही भूमिक घेतली असण्याची शक्यता आहे, असं विश्लेषकांना वाटतं.
खेळात कोण भाग घेतील?
उत्तर कोरियातील फक्त दोन खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्यांची नावं रयाम टै-ओक आणि किम जु-स्की अशी आहेत.
हे खेळाडू स्केटिंगपटू आहेत. या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठीची अधिकृत तारीख संपलेली आहे. पण हे खेळाडू आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या निमंत्रणानं ते या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
या स्पर्धेच्या नियोजन समितीचे अध्यक्ष ली ही बिओम यांनी उत्तर कोरियाच्या संभाव्य सहभागावर आनंद व्यक्त केला आहे. ही नववर्षाची भेट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
उत्तर कोरियानं यापूर्वी ऑलंपिकमध्ये भाग घेतला होता. पण 1988मध्ये दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये झालेल्या ऑलंपिकवर उत्तर कोरियानं बहिष्कार टाकला होता.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)