भीमा कोरेगाव : दलित चळवळीला एकत्र आणणार- जिग्नेश मेवाणी

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

भीमा कोरेगाव संग्रामाला २०० वर्षं झाल्याच्या निमित्ताने पुण्यात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेसाठी गुजरातच्या वडगामचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी सहभागी झाले होते.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी दलित चळवळीला पुढे नेण्यासाठी आपण काय करणार आहोत याबद्दल चर्चा केली. फेसबुक लाईव्हमध्ये झालेल्या या मुलाखतीचा हा संपादित अंश. (संपूर्ण फेसबुक लाईव्ह पाहण्यासाठी स्क्रोल करा. )

प्रश्न :एल्गार परिषदेच्या निमित्ताने तुम्ही महाराष्ट्रात आहात आणि तुम्ही भीमा-कोरेगावलासुद्धा जाणार आहात. या निमित्ताने तुम्ही महाराष्ट्रात पाय रोवत आहात असं समजायचं का?

महार रेजिमेंटने पेशवाईविरुद्ध जो संघर्ष केला, त्या घटनेच्या २०० वर्षपूर्तीनिमित्त मी इथे आलो. त्यांच्या लढ्याचं स्मरण करणाऱ्या कार्यक्रमात मी सहभागी झालो. तरुण वर्गाचा मला मोठा पाठिंबा मिळतो आहे. ट्विटर, फेसबुक यावर मला खूप फॉलोअर्स मिळाले आहेत. या सगळ्या तरुणांना एकत्र करून एक नवी भाषा आणि नवा मजकूर असणारी नव्या दमाची दलित चळवळ मला उभी करायची आहे.

मी आत्ताच कर्नाटकात जाऊन आलो. माझ्या मतदारसंघाबरोबरच गुजरातमध्ये उपेक्षितांची चळवळ आणि २०१९ वर लक्ष ठेवून त्यादृष्टीने फॅसिस्ट शक्तींविरुद्ध मला काही करता आलं तर ते मला करायचं आहे.

प्रश्न: महाराष्ट्राला महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभला आहे. अनेक दलित नेते आहेत पण ते वेगवेगळ्या गटांबरोबर आहेत. असं असताना, या भूमीत तुमच्यासारखं युवा दलित नेतृत्व उभं राहील का?

माझ्यापेक्षा कित्येक पटींनी चांगलं दलित नेतृत्व इथून उभं राहू शकेल.

इथे रिपाइं, दलित पँथर यासारख्या चळवळींची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या तरुणाईत प्रचंड क्षमता आहे. पण फक्त महाराष्ट्रातच नाही, देशभरातल्या दलित चळवळीत एक विसकळीतपणा आहे. ही चळवळ विखुरलेली आहे.

दलित संघटना आपापले मतभेद बाजूला सारून एकत्र आल्या तर त्यातून नवं दलित नेतृत्व उभं राहू शकेल.

यासाठी दलित तरुणांनी स्वतःला चळवळीत झोकून द्यावं. तरुणांनी आपले आर्थिक आणि इतर महत्त्वाचे प्रश्न उभे केले तर त्यातून नवी चळवळ उभी राहील.

प्रश्न: रिपाइं ऐक्यासाठी तुम्हा काय कराल? काल तुम्ही प्रकाश आंबेडकरांबरोबर एकाच मंचावर होतात, त्यांचे आणि रामदास आठवलेंचे मतभेद आहेत. याचा अर्थ आता तुम्ही आठवलेंबरोबर असणार नाही असा घ्यायचा का?

रामदास आठवलेंनी दलितांचा सगळ्यात मोठा शत्रू असलेल्या फॅसिस्ट ताकदींबरोबर हातमिळवणी केली आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही. ते भीमसेना आणि शिवसेनेच्या ऐक्याबद्दल बोलतात. एकवेळ लाल सलाम आणि जय भीम एकत्र येऊ शकतील, पण भीम सेना आणि शिवसेनेचा मिलाफ होऊ शकत नाही. पण, RPI च्या कार्यकर्त्यांसाठी आमची दारं सदैव उघडी आहेत.

रामदास आठवले हे भाजपचे राम असलेल्या मोदींसाठी हनुमानाची भूमिका बजावत आहेत.

प्रश्न:दलित राजकारणात मायावती हे मोठं नाव आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा विचार करत आहात का?

आम्ही लवकरच मायावतींना भेटण्याच्या विचारात आहोत. त्यांच्याबरोबर मला 2019 च्या निवडणुकांमध्ये फॅसिस्ट शक्तींविरुद्ध कसं लढायचं यावर चर्चाही करायची आहे. पंतप्रधानांसमोर राष्ट्रीय स्तरावर एक दलित अजेंडा काय ठेवता येईल यावर सुद्धा आम्हाला चर्चा करायची आहे.

प्रश्न:काल तुम्ही ज्या मंचावर होतात तिथे वेगवेगळ्या विचारधारांचे लोक होते. तुम्ही या वेगवेगळ्या संघटनांना एकत्र आणू शकाल का? की दलित चळवळ उभी राहते आहे तीचा दुसरा कुणीतरी वापर करुन घेईल अशी तुम्हाला भीती वाटते?

लोकांसाठी लढा देताना वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आले पाहिजेत. काल वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आले ही सकारात्मक गोष्ट होती.

प्रश्न:अॅट्रॉसिटी संदर्भात महाराष्ट्रात काही आंदोलनं झाली. याबाबत तुमची भूमिका काय आहे?

या आधी असणारा नागरिक संरक्षण कायदा दलितांच्या रक्षणासाठी कुचकामी ठरला, म्हणून मग अॅट्रॉसिटी कायदा आला. त्याची कठोर अंमलबजावणी झालीच पाहिजे. पण दलित कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मध्यमवर्गीय दलितांपेक्षा कष्टकरी दलित वर्गाला अॅट्रॉसिटीचा आणि हिंसाचाराचा सामना जास्त करावा लागतो. त्यामुळे जात आणि वर्ग या दोन्हीशी लढा द्यावा लागणार आहे.

तुम्हाला हे वाचायला आवडेल

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)