पठाणकोट हल्ल्याची 2 वर्षं : 'आमच्या मुलानं देशासाठी प्राण वेचले याचा अभिमान आहे'

    • Author, अरविंद छाब्रा
    • Role, बीबीसी पंजाबी प्रतिनिधी

"2016च्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारीला तो आमच्याशी बोलला आणि दुसऱ्या दिवशी त्याला मृत्युनं गाठलं..." सुचा सिंग आठवणीने गदगदले... "पण माझ्या मुलानं देशासाठी प्राण वेचले. आम्हाला त्याचा अभिमान आहे," सुचा सिंग सांगत होते.

दोन वर्षांपूर्वी पंजाबमधील पठाणकोटच्या लष्करी तळावर झालेल्या ऑपरेशनमध्ये गार्ड कमांडो कॉर्पोरल गुरसेवक सिंग (वय 25) यांचा मृत्यू झाला होता. सुचा सिंग हे गुरुसेवक यांचे वडील.

मुलाच्या आठवणीनं नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिंग कुटुंबीय हताश होतं, पण आपला मुलगा गुरसेवक सिंगनं देशासाठी प्राण वेचले याचा मात्र त्यांना अभिमान वाटतो.

"मरण काय अगदी घरबसल्या येऊ शकतं, पण माझ्या मुलानं देशासाठी लढताना प्राणाची आहुती दिली आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो," असं गार्ड कमांडो कॉर्पोरल गुरसेवक सिंग यांचे वडील सुचा सिंग सांगत होते. त्यांचं कुटुंब अंबाला येथील गर्नाला गावात राहतात.

"आमचं 1 जानेवारीला दुपारी तीन वाचताच्या सुमारास बोलणं झालं होतं. त्याचं पोस्टिंग जालंधर जवळ आदमपूरला होतं. मी त्याला कधी येणार असं विचारल्यावर 'लवकरच', असं त्यानं उत्तर दिलं." सुचा सिंह जड अंत:करणाने सांगत होते... "दुसऱ्याच दिवशी तो गेल्याचं आम्हाला कळलं."

काही आठवड्यांआधीच लग्न

गुरसेवकचं दीड महिन्याआधी लग्न झालं होतं. "त्याची पत्नी जसप्रीत आता दीड वर्षांच्या मुलीची आई आहे." वडील सांगत होते. "आम्ही तिचं नाव गुर्रीत ठेवलं आहे." त्या दोघांनी हे नाव आधीच ठरवून ठेवलं होतं. "गुरसेवक आणि जसप्रीत ही दोन्ही नावं यात येतात.. गुर्रीत."

"गुर्रीत अजून खूप लहान आहे. ती तिच्या वडिलांसारखी एअर फोर्समध्ये गेली तर मला खूप आवडेल," सुचा सांगत होते. सध्या ते शेतकरी असले तरी त्यांनीसुद्धा सैन्यात काम केलं आहे. त्यांचा मोठा मुलगा हरदीपदेखील सैन्यात अधिकारी आहे.

हरदीप म्हणाले, "गुरुसेवकच्या मृत्यूनं आम्हाला मोठा धक्का बसला होता. कट्टरवादी केवळ किती लोकांना मारू शकतात हे बघतात, आपण कोणाला मारतोय हे काही ते बघत नाहीत."

भारतीय लष्कराच्या वेशातील काही शस्त्रधारी व्यक्तींनी 1 जानेवारी 2016 रोजी पठाणकोट हवाईतळावर धुमाकूळ घातला होता. हा हवाईतळ पाकिस्तान सीमेच्या जवळ आहे.

भारताने या हल्ल्यासाठी जैश-ए- मोहम्मद या कट्टरवादी संघटनेला जबाबदार ठरवलं होतं. सहा शस्त्रधारी व्यक्ती आणि सात सुरक्षा दलाचे जवान या ऑपरेशनमध्ये मारले गेले असं सरकारनं सांगितलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)