हॅलो, मी दाऊद बोलतोय! पत्रकाराला जेव्हा येतो धमकीचा फोन

    • Author, राजेश जोशी
    • Role, माजी रेडिओ एडिटर, बीबीसी हिंदी

दाऊद इब्राहिम हे नाव आजही तपास यंत्रणांसाठी कोडं आहे. दाऊदशी थेट फोनवरून बोलण्याचा अनुभव कसा असेल?

मी फोन उचलला तर पलीकडचा माणूस अत्यंत शांत आवाजात म्हणाला, 'होल्ड रखो, बडा भाई बात करेगा'. फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं छोटा शकील.

माझ्यासमोर आऊटलुक मासिकाचे ज्येष्ठ पत्रकार अजित पिल्लई श्वास रोखून उभे होते. मी आजूबाजूला पाहिलं तर ऑफिसमधले सगळे माझ्याकडेच रोखून बघत होते.

सगळ्यांना ठाऊक होतं की, असा फोन रोज येत नाही. फोन करणाऱ्याची ताकद बरीच आहे आणि परिस्थिती बिघडली तर दिल्लीत पत्रकाराची हत्या अशी बातमीही येऊ शकते.

काही मिनिटांनंतर पलीकडून दुसरा आवाज कानी पडला. माझं नाव किंवा हुद्दा न विचारता तो माणूस बोलू लागला.

'तुम्ही लोकांनी हे काय छापलं आहे? मी ड्रग्जचा धंद्यात आहे असं तुम्ही लिहिलं आहे. तुम्हाला ठाऊक आहे ना की, आमच्या धर्मात हे करायला मनाई आहे. माझा जगभरात रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे आणि तुम्ही म्हणता ड्रग्जचा धंदा.'

तो पलीकडचा आवाज होता दाऊद इब्राहिमचा.

तोच दाऊद इब्राहिम- मुंबईच्या अंडरवर्ल्डचा डॉन आणि भारताचा नंबर एकचा शत्रू. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेचा मास्टरमाइंड.

त्याच आठवड्यात आऊटलुक मासिकाच्या अजित पिल्लई आणि चारुलता जोशी यांनी दाऊदच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला होता. अमली पदार्थांच्या धंद्यात दाऊदचे 2000 कोटी रुपये गुंतल्याचं सरकारी सूत्रांचं म्हणणं होतं. दाऊद या बातमीवर नाराज होता.

'दाऊदभाई...' असं म्हणत मी माझ्या आवाजात बेपवाईचा आणायचा प्रयत्न केला. जसं दाऊद आणि माझी जुनी घट्ट मैत्री आहे आणि आम्ही रोजच गप्पागोष्टी करतो असा आव आणायचा तो प्रयत्न होता.

पत्रकारितेत रिर्पोटर अनेकदा अशा खळबळजनक गोष्टींचा सामना करतो. उमेदवारीच्या काळात एखाद्या बड्या पोलीस अधिकाऱ्याने रिर्पोटरला फोन केला तर त्याची पत वाढत असे. मग छोट्यामोठ्या राजकीय नेत्यांचे फोन यायला सुरुवात होते.

हळूहळू प्रगती होते आणि सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांचे फोन येऊ लागतात. लोकांना काय वाटेल यापेक्षाही पत्रकाराला स्वत:लाच आपली पातळी उंचावल्याचं जाणवतं.

ज्या डॉनचा देशाभरातले पोलीस शोध घेत आहेत, इंटरपोलने ज्याच्या नावावर रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे, दर थोड्या दिवसांनी जो माणूस पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयच्या कह्यात असलेल्या कराचीत सुरक्षित राहतो आहे - अशा डॉनचा मध्यस्थाविना फोन यावा आणि त्याने स्वत:च रिर्पोटरचा समाचार घ्यावा, यावरुन परिस्थिती किती गंभीर असेल याचा अंदाज येऊ शकतो.

ज्या दाऊद इब्राहिमची मुलाखत घेण्यासाठी जाणकार संपादक आणि मातब्बर पत्रकार सर्वस्व पणाला लावतात, तो स्वत:हून फोन करून तुमच्याशी बोलत असेल तर आवाजात अशी बेपर्वाई येतेच. विशेषत: याप्रकरणाचं गांभीर्य किती आहे याचा तुम्हाला मागमूसही नसावा.

याच बेपर्वाईतून मी दाऊदला माझं म्हणणं सांगू लागलो. 'दाऊद भाई, आम्ही तुमच्याशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला. आमच्या बातमीतली तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नसेल किंवा पटली नसेल तर तुम्ही आम्हाला तसं लेखी कळवू शकता. आम्ही तुमचं म्हणणंही छापू.'

पलीकडून आवाज आला, 'तुला आठ दिवसांची मुदत देतो'. दाऊदने माझं म्हणणं अर्धवट तोडलं. त्याच्या आवाजातल्या जरबेने माझ्या अंगावर भीतीने शिरशिरी आली. तो पुढे म्हणाला, 'पुढच्या आठ दिवसात आऊटलुकने माझं म्हणणं छापलं नाही तर नीट विचार करा.'

दाऊदसाठी हे बोलणं नेहमीचं आणि रटाळ असेल कारण आयुष्यात त्याने आणि त्याच्या साथीदारांनी धनाढ्य व्यावसायिक, उद्योगपती, चित्रपट निर्माते, सरकारी अधिकाऱ्यांशी याच भाषेत बोलणी केली असतली.

पण माझ्यासाठी तो अनुभव पहिलाच होता. माझं अवसानच गळालं. अजित पिल्लई आणि माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना माझी अवस्था समजली. भाईने आपली ताकद फोनवरून मला दाखवली आहे हे त्यांना माझ्याकडे बघूनच कळलं.

मी कसंबसं बोलणं पुढे रेटत म्हटलं,' भाई पुढच्या एक तासात बातमीबाबत तुमचं म्हणणं आम्हाला पाठवलंत तर आम्ही मासिकात नक्कीच छापू.'

माझ्या बोलण्याला प्रतिसाद द्यावा असं दाऊदला वाटलं नाही. पुन्हा एकदा फोनवर त्याचा जवळचा साथीदार छोटा शकील बोलू लागला- 'एका तासात मी तुम्हाला फॅक्स करतो आहे. तुमच्या संपादकांना तो दाखवा. एवढं बोलल्यावर फोन डिस्कनेक्ट करण्यात आला. मात्र मी फोन हातात घेऊनच उभा राहिलो.

हे सगळं बोलणं आऊटलुकचे संपादक विनोद मेहता यांच्या केबिनबाहेरच होत होतं. दाऊदच्या धमकीला कमी लेखू शकत नाही. दाऊद जे बोलला त्याची कल्पना मेहता यांना देणं अत्यावश्यक होतं.

विनोद मेहता एखादी गोष्ट दहा सेकंदापेक्षा जास्त वेळ ऐकून घेऊ शकत नाहीत याची कल्पना त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांना आणि त्यांना ओळखणाऱ्या माणसांना होती. मग ते बोलणं सामान्य माणसाचं असो की दाऊद इब्राहिमचं.

'गेट हिम ऑफ माय बॅक' अर्थात दाऊदकडून वक्तव्य आलं तर छापा असं म्हणून त्यांनी हा मुद्दा निकाली काढला आणि ते त्यांच्या कामात गढून गेले.

ते वर्ष होतं 1997. त्यावेळी मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन काहीही नव्हतं. वर्तमानपत्रं किंवा मासिकाच्या कचेरीत सगळे सातत्याने फॅक्स मशीनभोवती गोळा होत असत.

एक तास होण्यापूर्वीच फॅक्स मशीन चिरचिरू लागलं आणि दुसऱ्या बाजूने कागद बाहेर पडू लागले. आऊटलुकचं वृत्तांकन कसं चुकीचं आहे अशा अनुषंगाचं तीन पानी वक्तव्य दाऊदने रितसर धाडलं होतं.

संपादक मेहतांनी दाऊदचं वक्तव्य पाहिलं आणि बातमीचा मथळा दिला- दाऊदचं आऊटलुकच्या बातमीला उत्तर. दाऊदची बाजू प्रश्नोत्तराच्या स्वरुपात पुढच्या अंकात छापण्यात आली.

अंक छापून आला त्याच्या दुसऱ्याच दिवशी छोटा शकीलचा फोन आला- 'बडे भाई खूश है. आता काळजी करू नका. अजिबात घाबरू नका. मी फोनमधून तुम्हाला गोळी मारणार नाही.'

अर्थात छोटा शकीलचा मला आलेला तो शेवटचा फोन नव्हता, पण त्यावर कधीतरी नंतर बोलू या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)