किम जाँग उन : उत्तर कोरियात फिरायला गेलेल्या तरुणाची गोष्ट

    • Author, दिपलकुमार शाह
    • Role, बीबीसी गुजराती

उत्तर कोरिया हा देश रोज चर्चेत असतो. किम जोंग उन यांच्या या देशात कधी अणू चाचण्या होतात तर कधी क्षेपणास्त्रं सोडली जातात. नुकतीच या देशात हसण्यावर बंदी घालण्यात आली म्हणून उत्तर कोरिया चर्चेत आला होता.

या बंदिस्त देशात लोकांचा राहणीमान काय, ते खातात काय, याविषयी बाहेरच्या देशांमध्ये फारशी माहिती नाही. म्हणून कुतूहलही तितकंच आहे.

गुजरातच्या एका तरुणानंही हिम्मत दाखवली आणि आपलं कुतूहल शमवण्यासाठी थेट उत्तर कोरियात फिरून आला.

जामनगरचा जिगर बरासरा याला सोलो ट्रिपिंग, अर्थात एकटंच फिरायला आवडतं. 30 वर्षांच्या जिगरनं आजवर उत्तर कोरियासह जगभरातल्या 68 देशांमध्ये भ्रमंती केली आहे.

आणि 2017 मध्ये जिगर राजधानी प्योंगयांगला गेला. 'अनेक प्रतिबंध असलेला देश', अशी धारणा असलेल्या या कोरियात त्याला मुक्तसंचार करता आला, फोटोही काढता आले.

या अनुभवाविषयी जिगरनं बीबीसीशी खास बातचीत केलेली -

उत्तर कोरियाबद्दल मला नेहेमीच कुतूहल वाटतं. मी दक्षिण कोरियात पोहोचलो तेव्हा माझ्या मित्रांनी मला एकाप्रकारे आव्हानच दिलं, "इथं गेलास ते ठीक आहे. पण उत्तर कोरियात पाऊल ठेवलंस तर मानू."

मी हे आव्हान स्वीकारलं आणि मग गेलो तिथं.

उत्तर कोरियात प्रवेश मिळवणं सोपं नव्हतं, कारण या देशाचा व्हिसा सहजासहजी मिळत नाही. चीनमधल्या एका खास एजन्सीमार्फत व्हिसा दिला जातो.

तो मी कसंतरी मिळवला आणि मग या रहस्यमयी देशात दाखल झालो.

राजधानी प्योंगयांगच्या विमानतळावर पोहोचलो तेव्हाच तो खरंच एक वेगळा देश असल्याचं प्रकर्षानं जाणवलं. दक्षिण कोरिया किंवा इतर कुठल्याही देशापेक्षा हे जग वेगळंच होतं.

राष्ट्राचे सर्वेसर्वा किम जोंग-उन यांनी या राज्यातल्या नागरिकांच्या मनावर कसलं तरी गारूड केलेलं आहे. असं वाटतं, जणू त्यांनी इथल्या जनतेचा आवाजही दाबून टाकला आहे.

तुम्ही उत्तर कोरियात दाखल झालात, की तुमचंही थो़डं तसंच होतं. इथं इंटरनेट, मोबाईल वापरण्यावर बंदी आहे. त्यामुळे जगाशी आपला संपर्कच तुटतो.

या देशात नियमांचं सक्तीनं पालन होतं, आणि नियमानंच काम चालतं. जवळपास एकसारख्या दिसणाऱ्या भल्या मोठ्या इमारती आहेत. रस्त्यावर फक्त सरकारी वाहनंच दिसतात आणि लोकंही त्याच सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करतात.

दक्षिण कोरियाची एक मोठी कंपनी म्हणजे ह्युंदाई. ती इतकी मोठी की भारतासह अनेक देशांमध्ये त्यांची वाहनं आहेत.

पण उत्तर कोरियाचं तसं नाही. इथं तर त्यांची अशी कंपनी तर सोडाच, कोणाकडे स्वत:ची गाडीही नाही. कारण इथं स्वत:चं वाहन खरेदी करता येत नाही. लोक सायकलचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात

या देशात घर विकत घ्यायचं असेल तर सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. आणि बहुतांश दुकानं सरकारी आहेत.

इथं कोणीही फोटो काढू शकतो. छायाचित्रणावर बंदी आहे, असा कदाचित गैरसमज कोरियाबद्दल अनेकांच्या मनात होता.

पण रस्त्यात कुठेही किम जोंग-उन किंवा अन्य नेत्यांचा फोटो दिसला तर मान झुकवून आदर व्यक्त करावा लागतो.

उत्तर कोरिया इतर देशांशी फारसा संपर्कात नाही. त्यामुळे इथं बाहेरून येणाऱ्यांना सहसा प्रवेश मिळत नाही.

तरीही काही लोक जीवावर उदार होऊन तसा प्रयत्न करतातच की! माझंच उदाहरण घ्या!

इथले लोक शांत आणि हसतमुख आहेत. ते रस्त्यांवर किंवा बाजारपेठेत दिसतात पण कोणत्याही परदेशी व्यक्तीशी सहसा बोलत नाहीत.

मार्केटमध्ये खरेदी करत असताना एका महिलेनं मला विचारलं, "तू कुठून आलास?"

"मी भारतातून आलोय."

"अरे वा. छान!" ती म्हणाली.

इथल्या लोकांना भारतीय सिनेमांविषयी माहिती होती. दरवर्षी इथं भरणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय सिनेमे दाखवले जातात. त्यांनी तर काही कलाकारांची नावंही सांगितली.

उत्तर कोरियात वीज आणि पाणी सरकारतर्फे मोफत दिलं जातं. इथं स्वच्छताही तशी चांगलीच आहे.

इथं लग्न करणाऱ्या जोडप्यांना उत्तर कोरियन नेत्यांच्या पुतळ्यांसमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यावे लागतात.

अर्थातच, गुप्त कॅमेऱ्यानं कोणी काही शूटींग केल्याचं लक्षात आलं तर मोठीच अडचण निर्माण होऊ शकते.

हेही वाचलंत का?

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)