You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
किम जोंग नामः किम जोंग उन यांच्या भावाला विमानतळावरच संपवण्यात आलं होतं
12 फेब्रुवारी 2017. मलेशियाची राजधानी क्वालालंपूरच्या एका रेस्टॉरंटमध्ये काही मित्र जमले होते. सीती आयस्याह या इंडोनेशियन महिलेचा 25वा वाढदिवस ते साजरा करत होते.
तिच्या मित्रमंडळींपैकी एकाच्या फोनमधील व्हिडिओमध्ये ती हसताना, केकवरच्या मेणबत्त्या विझवताना आणि गाताना दिसत होती.
त्या रात्रीचं जे वर्णन आयस्याहनं केलं आहे त्यानुसार, आपल्याकडे एक आनंदाची बातमी असल्याचं तिनं तिच्या मित्रमैत्रिणींना सांगितलं. तिला टीव्हीवरच्या एका रिएलिटी शोमध्ये काम मिळालं होतं. आता तिला क्वालालंपूरमधल्या बदनाम सार्वजनिक स्नानगृहातली नोकरी सोडून दूर जाता येणार होतं. तिच्या मित्रमैत्रिणींनी तिच्यासाठी ड्रिंक टोस्ट केलं, "आता तू स्टार होणार!"
दुसऱ्या दिवशी सकाळी सीती आयस्याहने क्वालालंपूर विमानतळावर आपलं लक्ष्य हेरलं. निळा टी शर्ट आणि स्पोर्ट्स जॅकेट घातलेला गलेलठ्ठ, टक्कल पडलेला माणूस. तो चेक-इनच्या जवळ पोहोचला असतानाच ती धावत तिथं गेली आणि त्याच्या चेहऱ्यावर तिनं एक द्रव्य ओतलं.
"हे तू काय करत आहेस?" मोडक्यातोडक्या इंग्रजीत तो बोलला.
"सॉरी," इतकंच बोलून ती तिथून पळून गेली.
आयस्याहचं म्हणणं आहे की हा एका टीव्ही शोसाठी करण्यात आलेला प्रँक होता. पण मलेशियन अधिकाऱ्यांनी तिच्यावर खुनाचा आरोप लावलेला आहे.
या सगळ्यापासून काही मीटरच्या अंतरावर एका कॅफेमध्ये उत्तर कोरियाचे तथाकथित एजंट बसले होते. आपली मोहीम फत्ते झाल्याचं पाहून समाधानी होत, डिपार्चर गेटकडे जात दुबईचं विमान पकडताना ते CCTV मध्ये दिसले.
त्या गलेलठ्ठ माणसाला आता अस्वस्थ वाटू लागलं होतं. चेहऱ्याला खाज सुटली होती आणि श्वास घेणं कठीण जात होतं. काही मिनिटांतच तो एका खुर्चीवर बेशुद्ध होत कोसळला. विमानतळावरच्या कर्मचाऱ्यांनी अॅम्ब्युलन्स बोलावली. ती क्वालालंपूरच्या दिशेनं वेगानं जात असतानाच त्याच्या फुफ्फुसांमध्ये पाणी भरलं आणि तो मरण पावला.
तो उत्तर कोरियाचा मुत्सद्दी अधिकारी किम चुल असल्याचं त्याच्या पासपोर्टवर म्हटलं होतं. पण मरण पावलेला हा माणूस प्रत्यक्षात होता किम जाँग-नाम, किम जाँग-उनचा मोठा सावत्र भाऊ.
किम जाँग-नामवर VX या तीव्र नर्व्ह एजंटचा विषप्रयोग करण्यात आला होता. या द्रव्याचा अगदी वाळूच्या कणाइतका थेंबही श्वासाद्वारे गेल्यास मृत्यू अटळ असतो.
किमची हत्या निगरगट्टपणे करण्यात आली होती. आपला यामध्ये हात असल्याचं उत्तर कोरियाने कितीही फेटाळलं असलं, तरी सगळे पुरावे त्याच्या प्याँगयांगमधल्या लहान सावत्र भावाच्या दिशेनेच बोट दाखवत होते. पण यामागचा उद्देश काय असावा?
त्यांचे वडील किम जाँग-इल यांचे गुंतागुंतीचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या दोन अधिकृत बायका होत्या. शिवाय त्यांचे इतर तीन महिलांसोबत विवाहबाह्य संबंध होते, आणि यातूनच पाच मुलं होती.
किम जाँग-नाम हा त्यांच्या पहिल्या प्रेयसी साँग हेय-रिम यांचा मुलगा. किम जाँग-उन हा को याँग-हुई या दुसऱ्या प्रेयसीचा धाकटा मुलगा. या वृद्ध हुकुमशहाने त्याच्या प्रेयसी आणि त्यांच्या मुलांना गुप्त ठेवलं होतं. ते एकमेकांपासून दूर, स्वतंत्र बंगल्यांमध्ये रहायचे. म्हणून त्यांचे वडील एकच असले तरी, किम जाँग-नाम आणि किम जाँग-उन कधीही भेटले नाहीत.
मोठा मुलगा असल्याने किम जाँग-नामला बराच काळ किम जाँग-इल यांचा संभाव्य वारसदार मानलं जात होतं. पण 2001 मध्ये बनावट पासपोर्टच्या मदतीने जपानमध्ये शिरत असताना त्याला अटक करण्यात आली होती. त्याला टोकियोमधल्या डिस्नेलँडला भेट द्यायची होती.
उत्तर कोरियाच्या या भावी राजाला पकडून विमानाकडे नेत असतानाचं आणि त्याची रवानगी करतानाचं चित्रण करण्यात आलं. प्याँगयांगमध्ये त्याचे वडील हा अपमान कधीच विसरू शकले नाहीत. त्यामुळे वारसा हक्कातून किम जाँग-नामला बेदखल करण्यात आलं आणि त्याला चीनमध्ये अज्ञातवासात पाठवण्यात आलं. किंबहुना तसं सांगण्यात आलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)