You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर कोरिया: किम जाँग उन यांनी हाती घेतलं रॉकेट लाँच साइट बनवण्याचं काम
ज्या रॉकेट लाँच साइट नष्ट केल्याचा दावा उत्तर कोरियाने केला होता पुन्हा त्या बनवण्यात येत आहेत. विश्लेषकांनी ही गोष्ट सॅटेलाइट फोटोच्या आधारावर सांगितली आहे.
डोनाल्ड ट्रंप आणि किंम जाँग उन यांच्या भेटीनंतर हे फोटो घेण्यात आले आहेत. नुकताच किम जाँग उन आणि ट्रंप यांच्यात व्हिएतनामची राजधानी हनोई येथे चर्चा झाली. ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता उत्तर कोरिया आण्विक निशस्त्रीकरणावर ठाम नसल्याचे दिसत आहे.
आतापर्यंत उत्तर कोरियाच्या डोंगचांग-री येथे सोहाए परीक्षण केंद्रात सॅटेलाइट लाँच आणि इंजिन टेस्टिंग केलं जात होतं. तिथं बॅलेस्टिक मिसाइलचं टेस्टिंग करण्यात आलं नव्हतं. पण या ठिकाणी कदाचित अण्वस्त्राचं परीक्षण होऊ शकतं या भीतीनं ही साइट नष्ट व्हावी अशी अमेरिकेची इच्छा होती.
ही साइट नष्ट करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी सुरू झाली होती. पण आता अमेरिकेनं बोलणी थांबवल्यानंतर पुन्हा ही साइट बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही साइट नष्ट करण्याची उत्तर कोरियाने केलेली प्रतिज्ञा ही दोन्ही देशातल्या सुधारत चाललेल्या संबंधांचं प्रतीक होती.
जर उत्तर कोरियानं आण्विक निशस्त्रीकरणासाठी पाऊलं उचलली नाहीत तर उत्तर कोरियावर आणखी निर्बंध लादले जातील असं अमेरिकेनं ठणकावलं आहे.
अमेरिकेच्या अनेक थिंक टॅंकनं सॅटेलाइट फोटो प्रसिद्ध केले आहेत तसेच दक्षिण कोरियाच्या गुप्तहेर खात्याने देखील या माहितीला दुजोरा दिला आहे. या साइटचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. गेल्या जुलैमध्ये ही साइट उत्तर कोरियाने नष्ट केली होती. 2012पासून सोहाए ही साइट सॅटेलाइट लाँचसाठी महत्त्वाची मानली जाते. याच ठिकाणी मिसाइल्सच्या इंजिनची टेस्टिंगसाठी झाल्याची शंका आहे.
38 नॉर्थ पर्यवेक्षक समूहाचे मॅनेजिंग एडिटर जेनी टाउन सांगतात की या साइटची पुन्हा बांधणी करणं हा महत्त्वाचा बदल आहे. ते म्हणाले उत्तर कोरियाचे लोक या कार्यक्रमाकडे शंकेनी पाहणार नाहीत. त्यांना वाटेल की अवकाश संशोधनाचाच प्रयोग या ठिकाणी होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिका आणि उत्तर कोरियात जी बोलणी सुरू होती त्यात विश्वासाची कमतरता आहे.
आणखी निर्बंध लादणार
उत्तर कोरियावर लादलेले निर्बंध कमी व्हावेत असं किम जाँग उन यांनी म्हटलं होतं पण डोनल्ड ट्रंप आणि त्यांच्यातील चर्चा फलद्रूप झाली नाही. अमेरिकेनं उत्तर कोरियावर असलेले निर्बंध कमी केले होते त्यानंतर उत्तर कोरियानं निशस्त्रीकरणाच्या दिशेने काय पावलं उचलली याची समाधानकारक उत्तरं अमेरिकेला न मिळाल्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरल्याचं म्हटलं जात आहे.
अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी मंगळवारी एका वाहिनीला मुलाखत दिली त्या मुलाखती ते म्हणाले की सध्याची स्थिती पाहता उत्तर कोरियावर आणखी निर्बंध लादले जाऊ शकतात. पुढे ते म्हणाले की उत्तर कोरिया आण्विक निशस्त्रीकरणाबाबत काय पावलं उचलत आहे याकडे अमेरिकेचं लक्ष राहील.
राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची भूमिका स्पष्ट आहे जर उत्तर कोरिया त्यांच्या अणुकार्यक्रमावर नियंत्रण घालू शकलं नाही तर त्यांच्यावर असलेले निर्बंध शिथील होणार नाहीत तसेच नवे निर्बंध लादले जातील त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था कोलमडू शकते.
जर अमेरिकेने आणखी निर्बंध लादले तर दोन्ही देशात चर्चेसाठी आणि शांततेसाठी प्रयत्न सुरू आहेत ते प्रयत्न देखील निष्फळ ठरतील. असं टाउन सांगतात.
अमेरिकेनं जे निर्बंध लादले असले तरी उत्तर कोरिया नेहमीच कराराचं उल्लंघन करत आला आहे. नवीन निर्बंध लादल्यानंतर चर्चेची गती मंदावू शकते. असं टाऊन यांना वाटतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)