You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
किम यांच्याबरोबरच्या चर्चेतून ट्रंप ‘उठून गेले’, हनोई भेट निष्फळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि नॉर्थ कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांच्यातील व्हिएतनामच्या हॅनोईमध्ये झालेली भेट कोणत्याही ठोस कराराशिवायच आटोपली.
उत्तर कोरियावर असलेले निर्बंध उचलण्यात यावे, अशी किम यांची मागणी होती जी अमेरिकेनं धुडकावून लावली. "निर्बंधांवरून काही करार होऊ शकला नाही. उत्तर कोरियावरचे सर्व निर्बंध पूर्णपणे उठवण्यात यावेत, अशी त्यांची मागणी होती. हे आम्ही करू शकत नाही," असं ट्रंप यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
"कधी कधी तुम्हाला बैठकीतून उठून जावं लागतं आणि ही तशीच एक बैठक होती," ट्रंप म्हणाले.
या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही दुसरी बैठक होती. भविष्यात अशी बैठक होईल की नाही, याची तूर्तास योजना नसल्याचं त्यांनी म्हटलं.
हा करार पूर्ण झाला असता तर त्यावर सह्या करण्याचा सोहळा पार पडला असता आणि मग सहभोजन केलं असतं, असं व्हाईट हाऊसच्या कार्यक्रम पत्रिकेवर नमूद होतं. पण करार न झाल्यामुळे ही योजना बारगळली.
यापूर्वी सिंगापूर येथे झालेल्या परिषदेमध्ये फारसे काही साध्य झाले नसल्याची टीका झाली होती. त्यामुळे हनोई येथील परिषदेमध्ये अण्वस्त्रमुक्तीचा करार होण्यासाठी ट्रंप दबाव आणतील, असं वाटलं होतं.
अण्वस्त्रमुक्तीचा अर्थ दोन्ही देश कसा घेतात, याबाद्दल साशंकता आहे.
निर्बंध मागे घेण्यासाठी उत्तर कोरियाने आपल्याकडच्या सर्व अण्वस्त्रांचा त्याग करावा, अशी अमेरिकेने भूमिका पूर्वीच घेतली होती. मात्र ही अट उत्तर कोरियाबरोबरच्या चर्चेमधील अडथळ मानली जाते.
अण्वस्त्रमुक्तीचा काय अर्थ अभिप्रेत आहे, असं ट्रंप यांना मंगळवारी विचारलं असता ते म्हणाले, त्याचं उत्तर सोपं आहे, "आपली अण्वस्त्रांपासून सुटका होण्याची गरज आहे."
ते अमेरिकन शिष्टमंडळाला म्हणाले, "हनोई येथे होत असलेल्या चर्चेमध्ये नक्कीच सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा मला होती. पण करार झाला नाही. पण या चर्चेमुळे मी भविष्याबाबत आशावादी आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)