You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सिंगापूर भेटीमुळे नेमका फायदा कोणाचा, ट्रंप की किम?
सिंगापूरमध्ये सोमवारी ट्रंप आणि किम यांनी एका करारावर स्वाक्षरी केली. आम्हा दोघांसाठीही ही भेट अपेक्षेपेक्षा चांगली झाली, असं ट्रंप यांनी म्हटलं आहे. पण असं खरंच झालं आहे का?
सोलहून बीबीसी प्रतिनिधी लॉरा बिकर या संपूर्ण भेटीचं विश्लेषण करतात.
सोमवारच्या भेटीनं ट्रंप यांना खरंच काय मिळालं? सर्वप्रथम अणुचाचण्या जिथं केल्या जातात ती जागा बंद केली जाणार आहे. हे अजून झालेलं नाही, पण ते होईल असं आम्ही ऐकलंय. ते कधी होईल हे आपल्याला बघावं लागेल.
ट्रंप यांना संपूर्ण नि:शस्त्रीकरण करण्याचं वचन मिळालंय. पण त्यात दोन महत्त्वाच्या संकल्पना नाहीत. निश्चित आणि खात्रीलायक हे शब्द मात्र त्यात नाही.
अमेरिकेला नेमकं तेच हवंय. मात्र कागदोपत्री त्यांना असं काहीही सांगण्यात आलेलं नाही. ट्रंप यांना हवं असलेलं नि:शस्त्रीकरण कदाचित ट्रंप यांना मिळेलही पण ते कधी हे सध्या निश्चित नाही.
युद्धकैद्यांचे अवशेष परत देऊ असं किम यांनी ट्रंपना सांगितलं आहे. त्यामुळे अमेरिकेतले काही लोक नक्कीच सुखावले असतील.
मग किम जाँग-उन यांना काय मिळालं? तर त्यांची रॉकस्टारची प्रतिमा तयार झाली आहे. सहा महिन्यापूर्वी एकटा राहणारा, मानवाधिकारांचं उल्लंघन करणारा, सतत युद्धाची भाषा करणारा हुकुमशहा अशी त्यांची प्रतिमा होती. मात्र सिंगापूरमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं.
सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे किम आता युद्धाच्या बाता मारणार नाहीत. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यादरम्यान लष्करी कवायती होत होत्या. ट्रंप जाणूनबुजून उद्युक्त करतात असं किम गेल्या बऱ्याच काळापासून बोलत आहेत. या लष्करी कवायती थांबणार असल्याचं ट्रंप म्हणाले आहेत.
या युद्ध कवायती थांबवल्यामुळे आमचा बराच पैसा वाचेल असं ट्रंप म्हणाले. त्यामुळे ही भेट दोन्ही बाजुंसाठी सकारात्मक होती की फक्त किम यांचं पारडं जड होतं हे सांगणं सध्या कठीण आहे, कारण बैठकीचा संपूर्ण तपशील बाहेर आलेला नाही. कागदोपत्री तरी किम जाँग-उन हे खेळ जिंकले असं समजायला हरकत नाही.
जगभरातून प्रतिक्रिया
या ऐतिहासिक भेटीनंतर जगभरात अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
रशियानं राक्षस हा राक्षस असतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
इराणशी असलेला अणुकरार नुकताच अमेरिकेनं मोडला आहे, त्यामुळे इराणनं अमेरिकेवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे
भेटीबाबत बहुतांश प्रतिक्रिया सकारात्मक आहेत. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांनी नुकतीच किम यांची भेट घेतली होती. "दोन्ही कोरिया आणि अमेरिकेची ही भेट शांतता आणि सहकार्याचा एक नवा इतिहास रचेल," असं ते म्हणाले.
तर दक्षिण कोरियाच्याच एका प्रवक्त्यानं, "ट्रंप यांच्या वक्तव्याचा खरा आणि योग्य अर्थ काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे," असं वक्तव्य केलं आहे.
उत्तर कोरियाशी चीनचे उत्तम राजनैतिक आणि आर्थिक संबंध आहेत. या भेटीनं नवीन इतिहास घडला आहे, अशी भूमिका चीननं घेतली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अटी पूर्ण केल्या तर उत्तर कोरियावरील निर्बंध कमी होण्याची चिन्हं आहेत असंही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचं मत आहे.
जपानचे पंतप्रधान शिझो आबे यांनी ट्रंप यांच्या नेतृत्वगुणाचं कौतूक केलंय. उत्तर कोरियाच्या आण्विक नि:शस्त्रीकरणाला दिलेला पाठिंबा म्हणजे उत्तर कोरियाशी असलेले वाद सोडवण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल आहे असं ते म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)