इराण : सरकारविरोधी आंदोलन चिघळलं, 10 जणांचा मृत्यू

इराणच्या सरकारी टीव्ही चॅनलच्या मते देशात सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनात आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण हे मृत्यू कुठे झाले आणि कधी झाले याची मात्र माहिती देण्यात आलेली नाही.

यापूर्वी 6 लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त होतं. यातील दोघांचा मृत्यू काल रात्री इजेह या शहरात झालेल्या गोळीबारमध्ये झाला होता.

राष्ट्रपती हसन रुहानी यांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं असूनही देशात आंदोलन सुरूच आहे.

तेहरानमधील इगलेबा चौकात आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर आणि पाण्याचा मारा केला आहे. पश्चिमेतील करमनशाह आणि खुर्रमाबाद आणि ईशान्यकडील शाहीन शहर आणि उत्तरेतील जनजान या शहरांतही आंदोलन सुरू आहे.

इराणमधील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असलेल्या मशहदमध्ये 2009नंतर होत असलेली ही सर्वांत मोठी निदर्शनं आहेत. 2009मध्ये इथे झालेल्या ग्रीन मूव्हमेंट या आंदोलनाला सरकारनं चिरडलं होतं.

कुठं झाले मृत्यू?

सरकारी टीव्ही चॅनलनं दहा निदर्शकांचा मृत्यू झाला या वृत्ताचा मृत्यूला दुजोरा दिला आहे. यातील 6 लोक पश्चिमेतील दोरूद या शहरात शनिवारी मारले गेले आहेत. सरकारने या मृत्यूंना सुन्नी कट्टरपंथी आणि विदेशी शक्तींना जबाबदार धरलं होतं.

या शहरात आंदोलकांनी अग्निशमन गाडीवर ताबा मिळवून ही गाडी लोकांवर चालवली होती. तर इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार इजेह शहरात गोळीबारमध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला आहे.

रुहानी यांनी दिलेल्या संदेशात हिंसा खपवून घेतली जाणार नाही, असं म्हटलं होतं. त्यांनी अर्थव्यवस्थेतील समस्यांमुळे होत असलेला लोकांचा त्रास, पारदर्शकतेचा आभाव आणि भ्रष्टाचार हे मुद्दे मान्य केले होते. पण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीचं समर्थनही केलं होतं.

"इराणच्या नागरिकांना सरकारच्या बद्दल असलेला असंतोष प्रकट करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.

प्रशासनाची प्रतिक्रिया

रुहानी यांनी त्यांच्या भाषणात जनतेमधील असंतोषांच्या कारणांना मान्य केलं होतं. ते म्हणाले, "सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणारे, कायदा मोडणारे आणि समजात असंतोष निर्माण करणाऱ्यांना सहन केलं जाणार नाही."

इराणच्या इराण रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्पने लोकांना इशारा दिला आहे की, जर देशात राजकीय असंतोष सुरू राहिला तर त्यांना कडक भूमिका घ्यावी लागेल.

रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्पही इराणमधील शक्तिशाली व्यवस्था आहे. देशातील सर्वोच्च नेत्याचे आदेश पाळणं आणि इस्लामी व्यवस्था टिकवणं यासाठी ही व्यवस्था कार्यरत असते.

इथल्या पत्रकारांच्या मते, जर रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प दंगलखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी रस्त्यावर उतरली तर परिस्थिती अधिकच चिघळू शकते.

देशभरात आतापर्यंत देशभरात 400च्यावर आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

ट्रंप आणि रुहानी यांच्यात वाद

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रपती रुहानी म्हणाले होते, "काही अरब देश असे आहे जे कधीच इराणचे मित्र नव्हते. अशा देशांना आता फारच आनंद झालेला आहे. आपल्याला अशांपासून सावध राहिलं पाहिजे, कारण राष्ट्रीय सुरक्षा हीच आपली संपत्ती आहे."

यापूर्वी एक दिवस आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ट्वीट करून इराणमध्ये जे काही सुरू आहे ते जग पाहात आहे, असं मत व्यक्त केलं होतं.

त्यांनी म्हटलं होत की, "इराणमध्ये दर तासाला मानवी हक्कांची पायमल्ली होते. इराण दहशतवादाचा समर्थक आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना एकमेकांशी बोलता येऊ नये म्हणून इंटरनेटही बंद केलं आहे. ही चांगली बाब नाही."

ट्रंप यांनी असंही म्हटलं होत की, "इराणची जनता आता हुशार झाली आहे. त्यांना कळू लागलं आहे की कशा प्रकारे त्यांचा पैसा चोरून दहशतवादावर वापरला जात आहे."

तर रुहानी यांनी याला प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं की, "अमेरिकेतील हे सज्जन आजकाल आपल्या देशाबद्दल सहानभूती व्यक्त करत आहेत. पण ते विसरत आहेत की, दिवसांपूर्वी त्यांनी इराणाला कट्टरपंथी देश म्हटलं होतं. पण वस्तुस्थिती अशी आहे की हा माणूस डोक्यापासून ते पायापर्यंत इराणचा शत्रू आहे."

आंदोलन : पुढे काय?

बीबीसी फारसीचे प्रतिनिधी कसरा नाजी यांच्या मते, इराणमधील लोकांची आर्थिक परिस्थिती ढासळत असून लोकांतील असंतोष वाढत आहे. बीबीसीच्या हाती असलेल्या एका अहवालानुसार इराणमधील लोक गेल्या 10 वर्षांत 15 टक्क्यांनी गरीब झाले आहेत.

सरकारविरोधातल्या या आंदोलनात युवक आणि पुरुष सहभागी आहेत. युवकांना इराणमधील धर्मगुरूंची सत्ता संपवायची आहे. गेल्या काही दिवसांत हे आंदोलन इराणच्या लहान शहरांतही पसरू लागले असून हे आंदोलन वाढण्याची शक्यता आहे.

या आंदोलनाला कोणी नेता नाही. कारण विरोधी नेत्यांना यापूर्वीच शांत करण्यात आलं आहे.

काही आंदोलकांनी देशात पुन्हा शाही शासन आणण्याची मागणी केली आहे. इराणच्या माजी शहांचा मुलगा रेजा पेहलवी यांनी अमेरिकेत आश्रय घेतला आहे. त्यांनी या आंदोलकांना पाठिंबा दिला आहे.

पण हे आंदोलन कोणत्या दिशेनं जाईल हे सध्या कोणीच सांगू शकत नाही.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)