ओसामा बिन लादेनच्या नातवाची हत्या?

    • Author, बीबीसी मॉनिटरिंग
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

कट्टरवादी संघटना अल कायदाच्या एका जिहादी समर्थकानं ओसामा बिन लादेनच्या 12 वर्षीय नातवाची हत्या झाल्याची माहिती दिली आहे.

अल कायदाच्या ऑनलाईन समर्थकांकडून या प्रकरणाशी संबंधित एक पत्र शेअर केलं जात आहे. हे पत्र ओसामाचा मुलगा हमजा बिन लादेन यानं लिहिल्याचं सांगितलं जात आहे.

एक हाय प्रोफाईल ऑनलाईन जिहादी अल वतीक बिल्लाह यानं 31 डिसेंबरला टेलिग्राम या मेसेजिंग ऍपवर ओसामा बिन लादेनच्या नातवाच्या मृत्यूची बातमी दिली होती.

त्यानंतर हाय प्रोफाईल अल कायदा इनसाईडर शायबत अल हुकमा याच्यासह अनेक प्रमुख अल कायदा समर्थकांनीसुद्धा टेलिग्रामवर ही बातमी शेअर केली आहे.

अल बतीकनं ओसामाच्या नातवाची हत्या कशी आणि कुठे झाली याची कोणतीच माहिती दिलेली नाही. पण अबु खल्लाद अल मुहनदीस या दुसऱ्या एका जिहादी समर्थकानं ही हत्या 26 मे ते 24 जून दरम्यान रमजान महिन्यात झाल्याचं सांगितलं आहे.

अबु खल्लाद अल मुहनदीस यानं लादेन कुटुंबाला लिहिलेलं एक पत्र जारी केलं आहे. हे पत्र हमजा बिन लादेन यानं लिहिल्याचं मानलं जातं.

या पत्रात हमजा बिन लादेननं सांगितलं आहे की, शहीदांसारखं मरण यावं अशी या मुलाची इच्छा होती आणि 2011 साली ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर तो कायम दु:खी असायचा.

हमजा बिन लादेन यानं आपल्या पुतण्यांना ओसामा बिन लादेन, ओसामा हमजा बिन लादेन आणि आपल्या भावांच्या हत्येच्याविरोधात जिहाद करण्याचं आवाहन केलं होतं.

अल वतीक बिल्लाह बऱ्याच काळापासून एक ऑनलाईन जिहादी आहेत आणि अल कायदाशी निगडीत त्यांची माहिती खात्रीलायक मानली जाते.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)