You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
माऊंट एव्हरेस्टवर एकट्यानं चढाई करण्यास नेपाळची बंदी
नेपाळनं जाहीर केलेल्या नव्या नियमांअंतर्गत अपघात टाळण्यासाठी माउंट एव्हरेस्टसह इतर पर्वतांवर एकट्यानं चढाई करण्यास गिर्यारोहकांना बंदी घातली आहे.
नवीन सुरक्षा नियमांनुसार यापुढं वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय जगातील सर्वोच्च शिखरावर पोहोचण्याच्या प्रयत्न करणाऱ्या अपंग आणि अंध गिर्यारोहकांना मज्जाव करण्यात आला आहे.
गिर्यारोहण सुरक्षितपणे करता यावं आणि कमीत कमी अपघात व्हावेत यादृष्टीनं नियमांची फेररचना करण्यात आल्याची माहिती पर्यटन अधिकाऱ्यानं दिली.
2017 साली एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. एव्हरेस्ट चढाईचा उच्चांक करण्याच्या प्रयत्नात अनेक अपघात झाल्याची माहितीसुद्धा पुढे आली आहे.
यंदाच्या मोसमात 6 मृत्यू झाले आहेत. जगातील सर्वांत वयोवृद्ध गिर्यारोहकाचा किताब मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे 85 वर्षीय मीन बहादूर शेरचन यांचाही मृतांमध्ये समावेश आहे.
'स्वीस मशीन' नावानं ओळखले जाणारे जगप्रसिद्ध स्वीस गिर्यारोहक उएली स्टेक यांचाही मृत्यू झाला आहे. एकट्यानेच माऊंट एव्हरेस्टवर चढाईच्या प्रयत्नात असताना त्यांना मृत्यूनं गाठलं.
नव्या नियमावलीनुसार परदेशी गिर्यारोहकांना त्यांच्यासोबत गाईड ठेवावा लागणार आहे. या नियमामुळे नेपाळी गाईडना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होतील, असा विश्वास प्रशासनाला आहे.
अपंग आणि अंध गिर्यारोहकांना प्रतिबंध घालण्याच्या निर्णयावर काही जणांनी टीका केली होती. पण ज्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नाही, अशांनाच निर्बंध घालण्यात येणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं.
अफगाणिस्तानात तैनात असताना दोन्ही पाय गमावलेले उदयोन्मुख एव्हरेस्ट गिर्यारोहक हरी बुधा मगर यांनी फेसबुक पोस्टद्वारे हा निर्णय अन्यायकारक आणि भेदभाव करणारा असल्याचं म्हटलं आहे.
"सरकारनं कुठलाही निर्णय घेतलेला असो, मी माऊंट एव्हरेस्टची चढाई करणारच," असा निर्धान त्यांनी व्यक्त केला आहे.
1920 पासून माऊंट एव्हरेस्टवर दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 1980 नंतर त्यात सातत्याने वाढ होताना दिसते.
एव्हरेस्ट चढाई करताना गिर्यारोहकांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. बीबीसीला मिळालेल्या माहितीनुसार 2015 मध्ये झालेल्या सर्वाधिक मृत्यूंमध्ये 29 टक्के मृत्यू हिमस्खलनामुळे झाले आहेत. त्यानंतर 23 टक्के प्रमाण हे शिखर चढताना पडल्यामुळे झाले आहेत.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)