You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
माझं अणुबाँबचं बटण किमपेक्षा मोठं आणि शक्तिशाली- ट्रंप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आक्रमक भाषेत उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
'अणुबाँबचं बटण माझ्या टेबलावर आहे' असं वक्तव्य किम जाँग उन यांनी केलं होतं.
त्यावर दोन दिवसानंतर ट्विटद्वारे प्रत्युत्तर देत डोनाल्ड ट्रंप म्हणाले,
"नुकतंच उत्तर कोरियाचे नेते किम जाँग हे म्हणाले की, त्यांच्या टेबलावर सतत अणुबाँबचं बटण असतं. पण या दुर्बल आणि भुकेल्या साम्राज्याच्या नेत्याला कुणीतरी सांगा की, माझ्याकडेही अणुबाँबचं बटण आहे. ते त्यांच्यापेक्षा मोठं आणि शक्तीशाली आहे. आणि हो, माझं हे बटण चालू आहे."
यातून अर्थातच एक समजतं की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अणुबाँबचे कोड माहिती असतात आणि तो डागण्याचे सर्व अधिकार आहेत.
किम जाँग उन काय म्हणाले होते?
"अणुबाँबचं बटण कायम माझ्या टेबलवर असतं. ते दाबून अमेरिकेला काही क्षणात संपवू शकतो आणि अमेरिकेला युद्ध करण्याची संधीसुद्धा मिळणार नाही," असं उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जाँग उन यांनी नवीन वर्षानिमित्त एका भाषणात म्हटलं होतं.
"अमेरिका उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांच्या टप्प्यात आहे. ही धमकी नाही, वास्तव आहे." असंही ते म्हणाले होते.
उत्तर कोरियानं क्षेपणास्त्र चाचण्या आणि आण्विक कार्यक्रम राबवल्यामुळे त्याच्यावर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्यात आलेत.
जगातील बहूतेक राष्ट्र उत्तर कोरियापासून दोन हात दूरच राहण्याचा प्रयत्न करतात.
नोव्हेंबर 2017 मध्ये उत्तर कोरियानं हॉसाँग-15 या क्षेपणास्त्राची चाचणी केली. ज्यानं 4475 किलोमीटर इतकी उंची गाठली होती, जी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपेक्षाही जास्त आहे.
आणखी वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)