लग्नासाठीची पोस्ट आणि हॅशटॅगचा फुलतो आहे नवा बाजार

    • Author, जेसिका हॉलंड
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

लग्न आणि लग्नातले सेल्फी हल्ली चर्चेचा विषय असतात. या फोटोंना असलेली मागणी आणि चर्चा यांचं महत्त्व सोशल मीडिया हाताळणाऱ्या वेबसाईट्सनीही ओळखलं आहे. आणि या जोरावर एक मोठी बाजापेठ उभी राहिली आहे.

म्हणूनच लग्नासाठी खास हॅशटॅग तयार करणाऱ्या कंपन्यांची चलती सुरू झाली आहे. या दिवसांत उपवर वधू किंवा वराचं इंटरनेट प्रोफाईल हाताळण्यासाठी 'सोशल मीडिया असिस्टंट' पुरवण्याचाही व्यवसाय आता सुरू झाला आहे.

लग्नात फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडिया वेबसाईटवर फोटो पोस्ट करण्यासाठीची वेगळी तयारी आणि खर्च विवाहेच्छुक जोडपी करताना दिसत आहेत.

जेसिका लेहमन ही 33 वर्षीय ब्रिटीश महिला सध्या न्यूयॉर्कमध्ये असते. तिनं आपल्या साखरपुड्याची घोषणा इन्स्टाग्रामवर केली. चित्रपट निर्माता जेसी अॅश याच्यासोबत ती विवाहबद्ध होणार होती.

साखरपुड्यासाठी हॅशटॅग : #JessTheTwoOfUs

इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना तिच्याकडे एक हॅशटॅग तयारच होता. #JessTheTwoOfUs. लंडनमध्ये तिच्या पुढच्या पार्टीच्या वेळी तिनं हा हॅशटॅग वापरला आणि पार्टीला आलेल्या पाहुण्यांनाही तिनं खास हा हॅशटॅग वापरण्याची विनंती केली.

आपल्या लग्नाचं असं नियोजित ब्रँडिंग करणारी जेसिका याबाबत ठामपणे तिची मतं मांडते. जेसिका म्हणाली की, "लग्नाचा एखादा चांगला हॅशटॅग त्या जोडप्याबद्दल बरंच काही सांगून जातो."

"त्या जोडप्याला हॅशटॅगमुळे दिसणाऱ्या फोटोंमुळे त्यातून निर्भेळ आनंद मिळतोच आणि त्या आठवणीही जपून राहतात. "

सध्या जगभरात 70 कोटी इन्स्टाग्रामचे वापरकर्ते आहेत. आणि 100 कोटींहून अधिक फेसबुकचा वापर करणारे आहेत. एवढ्या मोठ्या संख्येनं असलेले हे वापरकर्ते आपल्या लग्नाची तयारी करताना सोशल मीडियाकडे खास लक्ष देत आहेत.

त्यामुळे या एका ट्रेंडवर एक उद्योग उभा राहतो आहे. लग्नाचा वापर सोशल मी़डियासाठी करणाऱ्यांना नव्या गोष्टी देण्यासाठी व्यवसायही आकाराला येत आहेत.

हॅशटॅग विक्रीसाठी कंपनी

मॅरीएल वॅकीम या लॉस एंजेलिस स्थित एका मासिकाच्या संपादक आहेत. वॅकीम यांनी 2016 मध्ये 'हॅपिली एव्हर हॅशटॅगर' या कंपनीची स्थापना केली. त्यांना अनेकांनी लग्नासाठी खास हॅशटॅग बनवून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर ही कल्पना सुचली.

विशिष्ट हॅशटॅगसह फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर टाकलेली माहिती किंवा फोटो इतरांनी त्याच हॅशटॅगचा वापर केल्यावर त्यांनाही मिळते.

वॅकिम यांनी हॅशटॅगचं महत्त्व ओळखलं. आता त्यांची कंपनी एक विशिष्ट हॅशटॅग तयार करून देण्याचे 40 डॉलर घेते. तर एकदम तीन हॅशटॅग घेणाऱ्यांना त्या काहीशी सूट देतात... सूट म्हणजे फक्त 85 डॉलर घेतले जातात.

सध्या त्यांच्या कंपनीकडे लग्नासाठी विशेष हॅशटॅग करून देण्याची मागणी जास्त आहे.

ही मागणी वाढल्यानं कोणत्याही वेळी त्यांच्याकडे हॅशटॅग तयार करून घेण्यासाठी 150 जणांची प्रतिक्षा यादी असते.

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात 28 वर्षीय ग्राफिक डिझायनर अॅली बर्टलसननं 'स्नॅपचॅट जिओफिल्टर्स'ची निर्मिती केली. याची विक्री ती ऑनलाईन मार्केटसाठीची वेबसाईट 'इट्सी'वर करू लागली.

'अॅलीचे स्नॅपचॅट जिओफिल्टर्स'

जिओफिल्टर्स म्हणजे विशिष्ट फोटो फ्रेम आहेत. या फोटो फ्रेमचा वापर स्नॅपचॅटसाठी फोटो ठेवताना करता येतो. विशेषतः लग्नातील एखाद्या सोहळ्यासाठीचा फोटो टाकताना या फ्रेमचा वापर करता येतो.

बर्टलस्टोननं लग्न करणाऱ्या जोडप्यांसाठी खास फ्रेम तयार केल्या आणि त्याची विक्री 8 पाउंडला एक अशी करण्यास सुरुवात केली. ही फ्रेम फोटो आणि व्हीडिओ दोन्हीला लावता येत असल्यानं अनेकांच्या नजरा या फ्रेम्सकडे वळल्या.

वेडिंग हॅशटॅग वॉल

अशीच कहाणी अॅमस्टरडॅममधल्या युसूफ अल-दार्दिय आणि पिम स्टुरमन यांचीही आहे. त्या दोघांनी मिळून 2014 मध्ये 'वेडींग हॅशटॅग वॉल' कंपनीची स्थापना केली. कंपनीकडून 79 डॉलरमध्ये 'व्हर्चुअल वॉल' विकत घेता येऊ शकते.

ही 'व्हर्चुअल वॉल' म्हणजे एक वेब लिंक असते. ही लिंक उघडल्यावर आपल्या लग्नासाठी तयार करण्यात आलेल्या हॅशटॅगचा वापर कोणी-कोणी आणि नेमका कशासाठी केला आहे याची माहिती पाहता येते.

यामुळे आपल्या लग्नाबद्दल कोण काय-काय म्हणतंय हे त्यांना सहज पाहता येतं.

काही कंपन्यांनी तर लग्नात फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी खास सोशल मीडिया असिस्टंट ठेवले आहेत.

सोशल मीडिया असिस्टंट

न्यूयॉर्कमधील मासिक 'द नॉट'च्या दोन माजी संपादकांनी 2015 मध्ये अशाच सेवा पुरवणाऱ्या स्टार्टअपला सुरुवात केली.

कंपनीकडून 500 डॉलरच्या पॅकेजपासून 5-कॅरेट अशा मोठ्या पॅकेजपर्यंत सेवा दिली जाते. यात हॅशटॅग तयार करणे, कंपनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर विशेष पोस्ट, तसेच लग्नाबद्दल सोशल मीडियावर चर्चा होण्यासाठी काय करावं लागेल याच्या टिप्स दिल्या जातात.

लग्नाची सोशल मिडीयावर चर्चा होण्यासाठी आणि त्यासाठीच्या पेजेसवर फॉलोअर्स वाढवण्यासाठीचे प्लॅन देखील आहेत. यासाठी एक टीम ग्राहकासोबत काम करते.

तसेच लग्नाच्या दिवशी कोणत्या ब्रँडसोबत पार्टनरशिप असावी आणि त्याला माध्यमांमध्ये कशी प्रसिद्धी मिळेल याचीही काळजी घेतली जाते. इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट हे लग्नाच्या दिवशी पार्टनर म्हणून सहभागी होण्यास तयार असतात.

या सगळ्यासाठी कंपनी हजारोंनी पैसे ग्राहकांकडून घेते.

इतरांना आकर्षून घेण्यासाठी...

जे सोशल मीडियाचे वापरकर्ते नाहीत त्यांना या कशाचेच महत्त्व वाटत नाही. पण, जे डिजीटलचे भोक्ते आहेत त्यांना आपल्या ऑनलाईन प्रोफाइलची विशेष काळजी असते. ऑनलाईन प्रोफाइल या त्यांच्या खाजगी आयुष्याचं एक बाह्यरूप असतं.

आपल्या ऑनलाईन प्रोफाइलचा वापर ते आपल्या व्यावसायिक कामांसाठीही नियमितपणे करत असल्यानं आपल्या प्रोफाइलवर काय असावं? काय असू नये? याबाबत ते काळजी घेतात.

... म्हणून लग्नाचा खर्च वाढतोय

या विषयी बोलताना 'जनरेशन मी' आण 'द फोर्थकमिंग आयझेन' या पुस्तकाचे लेखक जिन ट्वेंगी म्हणतात, "सध्याची पिढी ही स्वकेंद्री आणि स्वतःला स्थान मिळवून देण्यासाठी आग्रही दिसते. त्यांच्या वयाची असताना पूर्वीची पिढी मात्र याबाबतीत पुढे नव्हती. लग्न ही त्यांच्यासाठी इतरांना आकर्षून घेण्याची नामी संधी वाटते."

चांगल्यात-चांगले फोटो ही सोशल मीडिया अॅप्सची सततची मागणी असते. त्यामुळे त्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवणं, तसा लुक ठेवणं याला अधिक महत्त्व दिलं जातं. त्यामुळे सातत्यानं लग्नासाठी लागणारा खर्च हा वाढतच आहे.

कारण, 21 व्या शतकातील पिढीतल्या अनेकांना आपल्या जुन्या पिढीच्या सोहळे साजरा करण्याच्या कल्पनांना हल्ली थारा द्यावासा वाटत नाही. त्यामुळे नव-नव्या संकल्पनांचा त्यांना ध्यास लागलेला असतो.

यातूनच सर्वात वेगळं लग्न साजरं करण्याची आणि त्याला सोशल मीडियावर प्रसिद्धी देण्याची स्पर्धा त्यांच्यात लागलेली असते.

या सगळ्या खर्चाचे आकडे करोडोंच्या पुढे जाऊ लागले आहेत. 2016 मध्ये 'हिच्ड' आणि 'द नॉट' या दोन वेबसाईटच्या सर्व्हेनुसार युकेमध्ये 25000 पाऊंड आणि अमेरिकेत 35000 डॉलर इतके आकडे या खर्चांनी गाठले आहेत.

'डिव्हाईस फ्री वेडींग'

या विषयी शेरी टर्कल या समाज विज्ञानाच्या प्राध्यापक आपल्या 'अलोन टुगेदर' पुस्तकामध्ये म्हणतात की, "हल्ली लोकांना फोनपासून दुरावणं हे शक्य होत नाही. त्यामुळे एकमेकांचे सामाजिक बंध कमी होत चालले असून एकटेपणा वाढीस लागत आहे."

टर्कल पुढे म्हणते की, "पूर्वी लग्नाचा एखादाच फोटो सगळ्या कुटुंबासह काढलेला महत्त्वाचा असायचा. मात्र, आता लोकांना प्रत्येक क्षणाला फोटोमध्ये कैद करायचं आहे, त्याला योग्यतेच्या प्रत्येक कसोटीवर घासून लख्ख करायचं आहे. आणि असं करण्याचा दबावही त्यांच्यावर आहे."

'डिव्हाईस फ्री वेडींग' ही संकल्पना हळूहळू जोर धरेल असं वातावरणही तयार होत आहे, असं टर्कल म्हणतात. पण, दुसरीकडे लग्नासाठी हॅशटॅग तयार करून लग्नाला आलेल्या पाहुण्यांना त्याचा वापर करण्यास सांगणं यात काही गैर नाही असंही टर्कल यांना वाटतं.

तिचा फोनही बंद होता...

आपल्या लग्नासाठी हॅशटॅग तयार करणारी जेसिका लेहमन मात्र आपल्या रिसेप्शनच्या दिवशी प्रत्येकाला हॅशटॅग वापरण्यास उद्युक्त करत होती. '#JessTheTwoOfUs' हा हॅशटॅग सभागृहात प्रत्येकाला दिसेल अशा ठिकाणी लावण्यात आला होता.

आपले मित्र-मैत्रिणी, नातेवाईक फोटो टिपून सोशल मीडियावर शेअर करतील याची जेसिका लेहमन खात्री होती. तिलाही प्रत्येकाने टिपलेला खास क्षण बघायचा होता.

पण, लग्नाचा मुख्य सोहळा चालू असताना प्रत्येकानं मोबाईल मधलं लक्ष काढून सोहळ्याकडे लक्ष द्यावं अशी ती प्रत्येकाला विनंतीही करत होती. तिच्याकडेही तिनं त्या वेळी फोन ठेवला नव्हता. मात्र, लग्नाला आलेल्यांकडे फोन असेल तर त्यांना मुख्य सोहळ्यात लक्ष देणं जडच जाईल हे ही तिला समजून चुकलं होतं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)