You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ट्रंप यांच्या पत्नी म्हणतात, 'आमचं सगळं बरं चाललंय'
आमचं सगळं बरं चाललंय, डोनाल्ड यांच्याशी माझे संबंध उत्तम आहेत, असा खुलासा अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रंप यांनी केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर होत असलेल्या व्यभिचारांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या की त्यांच्या वैवाहिक जीवनात कसलाही तणाव नाही. त्यामुळे त्यांच्या लग्नासंदर्भात माध्यमांतून जे तर्कवितर्क सुरू आहेत, ते योग्य नाहीत, असं मेलानिया ABC न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाल्या.
आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना मेलानिया ट्रंप यांनी ही मुलाखत दिली. या मुलाखतीचा पहिला भाग गुरुवारी दाखवण्यात आला.
डोनाल्ड ट्रंप यांचे कथित विवाहबाह्य संबंध या माझ्यासाठी काळजीचा विषय नसून आयुष्यात करण्यासारख्या इतर बऱ्याच गोष्टी आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्यावरील हे आरोप नाकारले आहेत.
पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्स आणि प्लेबॉय मासिकाची मॉडेल करेन मॅकडोगल यांनी डोनाल्ड ट्रंप यांच्यासमवेत त्यांचे शरीरसंबध असल्याचा दावा केला होता.
मेलानिया यांनी त्यांचं त्यांच्या पतीवर प्रेम असून माध्यमांतून त्यांच्यातील नात्यांवर येणाऱ्या बातम्या कधीच खऱ्या नसतात, असं म्हटलं आहे.
त्या म्हणाल्या, "मी आई आहे. अमेरिकेची फर्स्ट लेडी आहे. विचार करण्यासाठी आणि काम करण्यासाठी इतर महत्त्वाचे विषय आहेत. काय खरं आहे आणि काय खोटं आहे, हे मला माहीत आहे."
ज्या महिलांनी हे आरोप केले आहेत, त्यांना सबळ पुरावे द्यावे लागतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.
काय आहेत आरोप?
2006 मध्ये ट्रंप यांच्याशी मी 10 महिने रिलेशनशिपमध्ये होती, असा दावा करेन यांनी केला होता. ट्रंप आणि मेलानिया यांचं लग्न यापूर्वीच झालं होतं. ही बातमी छापण्यासाठी करेन यांनी The National Enquirer या टॅब्लॉइडशी 1.50 लाख डॉलरचा करारही केला होता. त्यानंतर त्यांनी तडजोड करून हा करार रद्द केला.
तर स्टॉर्मी डॅनियल्स यांनी त्यांचे ट्रंप यांच्या समवेत 2006मध्ये शरीरसंबंध आल्याचं आणि त्यानंतर दोघं रिलेशनशिपमध्ये राहिल्याचा दावा केला होता. स्टॉर्मी डॅनियल्स यांनी याबद्दल वाच्यता करू नये म्हणून ट्रंप यांचे वकील मायकेल कोहन यांनी त्यांना 1.30लाख डॉलर दिल्याचा वाद गाजला होता.
डोनाल्ड ट्रंप यांनी दोन्ही महिलांचे आरोप नाकारले आहेत.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)