You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका : 'प्लेबॉय'च्या मॉडेलला पैसे देण्याचं ट्रंप यांचं बोलणं झालं रेकॉर्ड
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे तत्कालीन वकील मायकल कोहेन यांनी प्लेबॉयसाठी काम केलेल्या मॉडेलला पैसे देण्यासंदर्भातलं ट्रंप यांचं संभाषण उघडकीस आलं आहे. त्याबद्दलच्या बातम्या अमेरिकी माध्यमांत चर्चेचा विषय झाल्या आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला न्यूयॉर्कमध्ये FBIनं कोहेन यांच्या मालमत्तेवर छापा टाकला होता. या छाप्यात या रेकॉर्ड केलेल्या टेप्स आढळल्या आहेत.
प्लेबॉय मॉडेलला पैसे देण्याचं प्रकरण
द न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, कोहेन यांनी रेकॉर्ड केलेल्या टेप्समध्ये ट्रंप आणि कोहेन हे दोघं कॅरेन मॅकडॉगल या मॉडेलला पैसे देण्यासंदर्भात चर्चा करत आहेत. मॉडेल मॅकडॉगल हिनं ट्रंप यांच्यासोबत पूर्वी प्रेमसंबंध असल्याचा दावा केला होता.
तसंच, या टेप्स अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या दोन महिने आधीच रेकॉर्ड झाल्याचेही स्पष्ट होत आहे. गप्प राहण्यासाठी ही रक्कम मॅकडॉगलला दिली गेली आहे का याचा तपास अमेरिकेतील डीपार्टमेंट ऑफ जस्टिस करत आहे.
सध्या कोहेन यांच्यावर कोणतीही कलमं लावण्यात आलेली नसली तरी बँक आणि कर घोटाळ्यासंदर्भात त्यांची चौकशी सुरूच आहे. तसंच, निवडणुकीच्या कायद्याचं उल्लंघन केल्याच्या आरोपांचीही चौकशी सुरू आहे.
कोहेन यांचे वकील लॅनी जे. डेविस यांनी या प्रकरणाबाबत त्यांची बाजू मांडली. गेल्या शुक्रवारी डेविस यांनी सांगितल्याप्रमाणे, कोहेन हे या तपासाबाबत संवेदनशील असून ते सहकार्य करत आहेत.
डेविस सांगतात, "हे रेकॉर्डिंग ऐकल्यावर त्यातून एक कळतं की कोहेन यांना कोणताही धोका नाही. बाहेर याबाबत कोणतीही वक्तव्य झाली तरी जे टेपमध्ये आहे ते बदलू शकत नाही."
'मेलेनियाआधी माझे ट्रंप यांच्याशी संबंध'
2016च्या अध्यक्षीय निवडणुकांवेळी मॅकडॉगल यांनी त्यांची ही कथित 'प्रेम कथा' नॅशनल एन्क्वायर नावाच्या टॅबोलाईडला विकली होती. हे वृत्तपत्र ट्रंप यांच्या जवळच्या मित्राच्या मालकीचं आहे.
मॅकडॉगल यांनी सांगितल्यानुसार, ही कथा छापण्यासाठी त्यांच्यात आणि नॅशनल एन्क्वायरमध्ये 150,000 अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास 1 कोटी रुपयांचा करार झाला होता. या करारानुसार, मॅकडॉगल यांनी याविषयी बाहेर कुठेही वाच्यता न करण्याचेही ठरले होते.
परंतु, एन्क्वायरने ही कथित 'प्रेम कथा' छापलीच नाही. त्यामुळे आपल्याला हुषारीनं फसवण्यात आल्याचं मॅकडॉगल यांना वाटतं आहे.
तसंच, गेल्या शुक्रवारी, ट्रंप यांचे आणखी एक वकील रुडी गियुलियानी यांनी द न्यूयॉर्क टाइम्ससोबत बोलताना सांगितलं की, अध्यक्ष ट्रंप आणि कोहेन यांच्यात मॅकडॉगल यांना पैसे देण्याबाबत चर्चा झाली होती. परंतु, असे पैसे कधीचे दिले गेले नाहीत. याचे पुरावे ही टेप नीट ऐकली तर त्यातून सिद्ध होतात.
कॅरेन मॅकडॉगल यांच्यामते, ट्रंप यांचा मेलेनिया यांच्याशी विवाह होण्याआधी त्यांचे ट्रंप यांच्याशी 2006मध्ये 10 महिने प्रेमसंबंध होते. याबाबत, ट्रंप यांना विचारलं असता त्यांनी असे कोणतेही प्रेमसंबंध असल्याचा इन्कार केला होता. तसंच, असे कुठले पैसे दिले गेले नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्स प्रकरणाशी साधर्म्य?
मात्र, मे महिन्यात ट्रंप यांनी मान्य केलं होतं की, कोहेन यांनी एका महिलेला गप्प राहण्यासाठी पैसे दिले म्हणून मी कोहेन यांना ते पैसे देऊन टाकले होते.
यापूर्वीही ट्रंप यांच्याबाबतीत असं घडलं आहे. स्टॉर्मी डॅनियल्स नावाच्या पॉर्नस्टारला पैसे दिल्याचाही त्यांनी इन्कार केला होता. स्टॉर्मी डॅनियल्स हिच्यासोबत झालेल्या कराराबाबत कुठेही वाच्यता न करण्यासाठी 130,000 अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास कोटी रुपये तिला दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता. ज्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचा ट्रंप यांनी म्हटलं आहे.
2006मध्ये कॅलिफोर्निया आणि नेवाडा यांच्यादरम्यान असलेल्या लेक टाहो नावाच्या रिसॉर्टमध्ये ट्रंप यांनी स्टॉर्मी डॅनियल्स यांच्यासोबत शरीरसंबंध ठेवले होते. असा दावाच डॅनियल्स हिनं केला होता.
याबाबत कुठेही वाच्यता न करण्यासाठी ट्रंप यांनी डॅनियल्स आणि मॅकडॉगल यांच्यासोबत केलेले करार हे बेकायदेशीर नाहीत.
मात्र, या सगळ्यातून ट्रंप यांना त्रास होऊ शकतो. कारण, महिलांशी संबंध असलेल्या गोष्टी दाबण्यासाठी आर्थिक व्यवहार जर झाला असेल तर तो US कँपेन फायनान्स लॉ म्हणजेच अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीच्या संदर्भातील कायद्याचं उल्लंघन मानलं जाऊ शकतो.
दरम्यान, या सगळ्यामुळे ट्रंप आणि त्यांचे कोणेएकेकाळी निकटवर्ती असलेले कोहेन यांच्यातले संबंध ताणले गेले आहेत. ट्रंप यांनी नुकतंच सांगितल्याप्रमाणे कोहेन हे त्यांचे खाजगी वकील नाहीत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)