You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
FBIनं ट्रंप यांच्या सहकाऱ्यांवर पाळत ठेवली होती?
FBIनं डोनाल्ड ट्रंप यांच्यावर पाळत ठेवली होती असा आरोप एका मेमोद्वारे रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये केला आहे.
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवेळी त्यावेळचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांच्या निकटवर्तीयांवर FBIनं पाळत ठेवली होती असा आरोप या मेमोमध्ये ठेवण्यात आला आहे.
या मेमोला FBIनं उत्तर दिलं आहे. या मेमोमध्ये काही गोष्टींचा उल्लेख मुद्दामहून टाळण्यात आला आहे, असं FBIनं म्हटलं आहे.
ट्रंप यांनी निवडणुकीच्या वेळी रशियाचं सहकार्य घेतलं की नाही या मुद्द्यावर चौकशी सुरू आहे. त्या चौकशीची दिशा बदलण्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे या मेमोचा हत्यारासारखा वापर करण्यात येत असल्याचा आरोप डेमोक्रेटिक पक्षातर्फे करण्यात आला आहे.
चौकशी सुरू असतानाच रिपब्लिकन पक्षानं हा मेमो काढल्यामुळं रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्षात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
या मेमोचा चौकशीवर काहीही प्रभाव पडणार नाही असं काँग्रेसचे स्पीकर आणि रिपब्लिकन पक्षाचे सदस्य पॉल रायन यांनी म्हटलं आहे. एखाद्या अमेरिकी नागरिकावर पाळत ठेवण्यासंदर्भात असलेल्या अधिकाराचा दुरुपयोग होऊ न देणं ही काँग्रेसची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय घडलं याची चर्चा होणं आवश्यक आहे असं रायन यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रंप यांचे सहकारी आणि परराष्ट्र धोरण सल्लागार कार्टर पेज यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली होती.
ही परवानगी मिळण्यासाठी एफबीआय आणि न्याय विभागाने (सरकारी पक्ष) कोर्टात डोसियर (कागदपत्रं) सादर केली होती. या डोसियरच्या आधारावरच कोर्टाने पाळत ठेवण्याची परवानगी दिली होती. पण ही परवानगी घेताना FBIनं कोर्टाला अंधारात ठेवलं होतं.
या डोसियरमध्ये असलेली माहिती माजी ब्रिटिश एजंट क्रिस्टोफर यांनी गोळा केली होती. ही माहिती गोळा करण्यासाठी डेमोक्रेटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या अभियानाच्या निधीतून पैशांची तरतूद करण्यात आली होती, असं या मेमोमध्ये म्हटलं आहे.
ट्रंप आणि रशियाच्या कथित संबंधांबाबत असलेली आकडेवारी तपासण्यासाठी पाळत ठेवण्यात आली होती असं मेमोमध्ये म्हटलं आहे.
ट्रंप यांनी काय म्हटलं?
अमेरिकन काँग्रेसमध्ये सादर करण्यात आलेला मेमो सार्वजनिक करण्याचे आदेश डोनाल्ड ट्रंप यांनी दिले. पाळत ठेवण्याची घटना ही लाजिरवाणी आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
"उच्चपदस्थ नेते, FBIचे अधिकारी आणि न्याय विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. डेमोक्रेटिक पक्षाने त्यांचे अधिकार रिपब्लिकन पक्षाला नुकसान पोहोचवण्यासाठी वापरले," असं ट्रंप यांनी म्हटलं.
या प्रकरणाशी निगडित महत्त्वपूर्ण व्यक्ती
कार्टर पेज - 46 वर्षांच्या पेज यांच्यावर FBIनं पाळत ठेवली होती. ट्रंप यांच्या परराष्ट्र धोरणाचे ते सल्लागार होते.
त्यांनी 2016 या वर्षात अनेक वेळा रशियाचा दौरा केला होता. रशिया आणि ट्रंप यांच्यातील संबंध दृढ होण्यास मध्यस्थी करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तो त्यांनी फेटाळून लावला आहे.
डेविन न्यूनेस- न्यूनेस हे इंटेलिजन्स पॅनेलचे अध्यक्ष आहेत. मेमो बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. हा मेमो सार्वजनिक करण्यात आला आहे.
रॉड रॉजेन्सटाइन - ते 53 वर्षांचे आहेत. गेल्या वर्षी ते डेप्युटी अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्त झाले. एखाद्या नागरिकावर जर पाळत ठेवायची असेल तर त्यासाठी परवानगी लागते. ही परवानगी देण्याच्या प्रक्रियेतील भिन्न स्तरांवर ते सहभागी होते.
त्यांच्या प्रामाणिकपणावर ट्रंप यांनी शंका घेतली होती, असं CNNनं म्हटलं होतं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)