ट्रंप यांची वर्षपूर्ती : जेव्हा अमेरिकेची महासत्ता लयाला जाते...

    • Author, निक ब्रायन्ट
    • Role, बीबीसी न्यूज, न्यूयॉर्क

एक वर्षापूर्वी अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला आणि आधुनिक अमेरिकेच्या इतिहासातला अनपेक्षित विजय मिळवला. पण, या घटनेचे संकेत अमेरिकेच्या इतिहासातच दडले होते का? पत्रकार निक ब्रायन्ट यांनी केलेलं विवेचन.

लॉस एंजेलिसचं वाळवंट, डोंगररांगा आणि स्विमिंग पूलनं भरलेली उपनगरं यावरून माझं विमान उतरत होतं तसतसा मी भूतकाळात गेलो.

30 वर्षांपूर्वी मी असाच हवाई मार्गाने अमेरिकेत उतरलो होतो. एकदातरी अमेरिकेला जावं, असं माझं बालपणापासूनचं स्वप्न होतं.

अमेरिकेनं मला स्वप्नांचे पंख दिले होते. या कल्पनेच्या भराऱ्या घेतच मी इथं पोहोचलो होतो.

मी जेव्हा इमिग्रेशन हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हाचा - अमेरिकेचे मूव्ही स्टार राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचा फोटो मला अजूनही आठवतो. तेव्हा काही मी दिसताक्षणी त्यांच्या प्रेमात पडलो नव्हतो.

कॉप शोज, सुपरहिरो कॉमिक स्ट्रीप, वेस्ट साईड स्टोरी आणि ग्रीस यासारखे चित्रपट या गोष्टींमुळे अमेरिकेबद्दलचं माझं आकर्षण फार जुनं आहे. माझ्यावर लंडनपेक्षा गॉथमचा जास्त प्रभाव होता.

अमेरिकेत नव्यानं आलेल्या माझ्यासारख्या माणसारखी मलाही लगेचच अमेरिकन असल्याची भावना जाणवायला लागली.

आपण याच कुटुंबातले आहोत, असं वाटू लागलं.

80 च्या दशकात अमेरिका आपल्या मनासारखं जगत होती. मल्टीलेन फ्रीवेजपासून ते मोठमोठ्या बोगद्यांच्या रस्त्यांपर्यत.

ड्राइव्ह इन मूव्ही थिएटर्सपासून ते ड्राइव्ह थ्रू बर्गर जॉइंट्सपर्यंत.

माझं या भव्यतेवर प्रेम जडलं होतं. मी अशा देशातून आलोय जिथं अगदी लहान वयातच बऱ्याच जणांचं आयुष्य त्यांच्या प्राक्तनाशी जोडलेलं असतं.

त्यामुळे अमेरिकन ड्रीमची मला खूप आसक्ती होती. ते मला मुक्त करणारंही होतं.

वरवर जात राहण्याची महत्त्वाकांक्षा माझ्यात आणि माझ्या शाळेतल्या मित्रांमध्ये नव्हती.

मला डावललं जाण्याची भावनाही इथे नव्हती. यश मिळू शकतं, याचा हेवा करत राहण्यापेक्षा माझा त्यावरचा विश्वास वाढत चालला होता.

रोल्स रॉईसची एक झलक दिसण्यापेक्षा कॅडिलॅकची झलक मनाला जास्त सुखावत होती.

लॉस एंजेलिस ऑलिम्पिक

ते साल होतं 1984. लॉ़स एंजेलिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होत्या. सोव्हिएत रशियानं ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता.

त्यामुळे अमेरिकेच्या खेळाडूंचाच पदकं मिळवण्यात दबदबा होता.

पदकं जिंकलेल्या स्पर्धांसाठी मॅकडोनल्डनं स्क्रॅच कार्ड प्रमोशन केलं होतं.

पूर्वेकडचे देश मॅकडोनाल्डपासून थोडं अंतर राखतील, हे लक्षात घेऊन त्यांनी बिग मॅक, कोक, फ्राईज अशा ऑफर्स ठेवल्या होत्या.

त्यामुळे मी अशा मोफत फास्ट फूडवर ताव मारायचो आणि त्याबदल्यात 'यूएसए! यूएसए!' असं म्हणत चिअर अप करायचो.

अमेरिकेतल्या पुनर्निमाणाच्या काळातला तो उन्हाळा होता. व्हिएतनाम, वॉटरगेट आणि इराणमधलं अपहरण नाट्य या दु:स्वप्नातून अमेरिका बाहेर येत होती.

1984 हे साल म्हणूनच जॉर्ज ऑरवेलच्या म्हणण्यानुसार साजरं करण्यासारखं आणि आशेचे किरण दाखवणारं वर्ष होतं.

अंकल सॅम म्हणजेच अमेरिकन सरकार मनातल्या मनात खूश दिसत होतं.

रेगन यांचा विजय

लाखो लोकांसाठी खरंच अमेरिकेत पुन्हा सकाळ झाली होती. रोनाल्ड रेगन यांच्या दुसऱ्या निवडणुकीच्या काळातलं हे घोषवाक्य होतं.

त्यावर्षीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार वॉल्टर मोंडेल यांचा दणदणीत पराभव केला.

त्यांनी लोकप्रिय मतांमध्ये 50 पैकी 49 जागा जिंकल्या.

अमेरिकेचं वर्णन राजकीयदृष्ट्या एकसंध असं करणं कठीण होतं. कारण सरकारमध्ये फूट पडली होती.

रिपब्लिकन लोकांनी सिनेटवर ताबा मिळवला होता. पण, अमेरिकन लोकप्रतिनिधीगृहावर डेमोक्रॅट्सचं वर्चस्व होतं.

रेगन यांचा आशावाद त्यांच्या 1980च्या 'स्टेट्स' 'राइट्स' मोहिमेमुळं झाकोळला गेला.

हे त्यांचं नागरी हक्क नाकारण्यासाठीचं भुंकणं आहे, असं अनेकांना वाटलं.

त्यांनी यासाठी फिलाडेल्फियाची निवड केली. पण, हे शहर बंधुभावासाठी किंवा स्वांतत्र्याच्या घोषणांसाठी प्रसिद्ध नव्हतं.

याउलट फिलाडेल्फिया आणि मिसिसिपी ही बॅकवॉटरच्या जवळची शहरं होती.

या शहरांत 1964मध्ये नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या तीन कार्यकर्त्यांचा गोऱ्या वर्चस्ववाद्यांनी खून केला.

रेगन यांना कृष्णवर्णीयांच्या आक्रमक लढ्याची भीती वाटत होती.

रेगन यांच्यावर टीकेची झोड

त्यावेळी ली ग्रीनवूड यांचं 'गॉड ब्लेस द यूएसए' हे गाणं राष्ट्रगीत बनलं होतं आणि तेव्हा राजकारणाचं ध्रुवीकरणही झालं नव्हतं.

डेमोक्रॅटिक पक्षाचे लोकप्रतिनिधीगृहातले अध्यक्ष टिप ओ नील यांनी रेगन यांच्या अर्थकारणावर कठोर शब्दांत टीकेची झोड उठवली.

त्यांनी रेगन यांना 'चिअरलीडर ऑफ सेल्फिशनेस' आणि 'हर्बर्ट हूवर विथ अ स्माईल' असं म्हटलं होतं.

या दोन आयरिश-अमेरिकनांना देशहितासाठी काम करण्यासाठीचं सारखंच व्यासपीठ मिळालं.

या दोघांनाही हे समजलं की, अमेरिकेची स्थापना करणाऱ्या नेत्यांनी सरकारी व्यवस्थेसोबत तडजोड केली आणि वॉशिंग्टनच्या सत्तेमध्ये एकमेकांचा वरचष्मा ठेवला.

पण, हे देवाणघेवाणीशिवाय शक्य नाही. त्यांनी करांमध्ये सुधारणा आणि सामाजिक सुरक्षा यावर एकत्र काम केलं.

अमेरिका महासत्ता म्हणून उदयाला येत होती. 1950ची विचित्र मन:स्थितीत राहिली नव्हती. 1960मध्ये जशी ती अस्वस्थ होती तशी ती आता नव्हती.

1970 मध्ये ती नाउमेद झाली होती तशीही ती नव्हती.

इतिहास हा कधीच एकदम नीट आणि एकमार्गी नसतो. एका दशकामध्ये आपोआप एक व्यक्तिमत्व निर्माण होत नाही.

पण, 1984 नंतरचा काळ दोन विशिष्ट पर्वांमध्ये विभागता येऊ शकतो.

विसाव्या शतकातली शेवटची 16 वर्षं ही अमेरिकन एकाधिकारशाहीची होती. तर एकविसाव्या शतकातली पहिली 16 वर्षं ही निष्क्रियता, निष्फळता, भ्रमनिरास आणि घसरणीची होती.

या दोन पर्वांमधले बेसूर आजच्या अमेरिकेत उमटलेले दिसतात.

1991 साली प्रचंड वेगानं आक्रमणासह अमेरिकेनं आखाती युद्ध जिंकलं. या विजयामुळे व्हिएतनाम युद्धाच्या कटू आठवणी झाकल्या गेल्या.

विचारवंत फ्रान्सिस फुकुयामा यांचा प्रसिद्ध शोधनिबंध, 'द एंड ऑफ हिस्टरी'नुसार पाश्चिमात्य उदारमतवादी लोकशाहीचं समानीकरण म्हणजे मानवी समूहाच्या सरकारचं प्रारूप आहे.

जपान जगातली ताकदवान अर्थव्यवस्था होईल, असा होरा तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.

मात्र अमेरिकेनं आर्थिक आणि व्यापारी वर्चस्व कायम राखत जागतिक पातळीवर वरचष्मा कायम राखला.

अमेरिकेची सद्दी राहिल्यानं सोनीऐवजी सिलीकॉन व्हॅली व्यापारउदीमाचं महत्त्वपूर्ण केंद्र झालं.

अमेरिकेच्या वर्चस्वासंदर्भात माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी अनेक दावे केले.

मात्र प्रत्यक्षात मायक्रोसॉफ्ट, अॅपल आणि गुगल या कंपन्या खऱ्या अर्थानं संक्रमणाच्या शिल्पकार आहेत.

अवकाशविज्ञानाच्या बरोबरीनं अमेरिकेनं सायबरविश्वात स्वत:ची हुकूमत सिद्ध केली.

अमेरिकेच्या या वर्चस्वाला गालबोटही लागलं होतं.

1992 मध्ये लॉस एंजेलिस इथं झालेल्या दंगलीमुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली.

रॉडनी किंग यांना झालेली मारहाण आणि मारहाण करणाऱ्या पोलिसांचं निर्दोष सुटणं अमेरिकेच्या समाजातील वांशिक कडवेपण सिद्ध करतात.

तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर झालेली महाभियोगाची कारवाई ही पक्षपातीपणाच्या प्रमाणाचं द्योतक होतं.

24 तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्यांच्या आगमनामुळे राजकीय समीकरणं दैनंदिन मालिकांप्रमाणे झाली.

विसाव्या शतकाचा उत्तरार्ध अंतिम टप्प्यात असताना बिल क्लिंटन यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं. अमेरिकेच्या राष्ट्रीय स्तरावरील चित्र हळूहळू बदलत गेलं.

2000 मध्ये डॉट कॉम विश्वाचा बुडबुडा फुटला.

जॉर्ज डब्ल्यू बुश आणि अल गोर यांच्यातील निवडणुकीच्या निमित्तानं रंगलेल्या कलगीतुऱ्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेच्या लोकशाहीची नाचक्की झाली.

याच काळात अमेरिकेचा कट्टर शत्रू असलेल्या रशियामध्ये सत्तेचं परिवर्तन झालं. बोरिस येलत्सिन यांच्याकडून व्लादिमीर पुतिन यांनी सूत्रं स्वीकारली.

2001 हे वर्ष अमेरिकेसाठी दुर्देवी ठरलं. 2001मध्ये अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरसह पेंटगॉनवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात शेकडो नागरिकांनी जीव गमावला.

पर्ल हार्बरच्या तुलनेत हा हल्ला अमेरिकेला मुळापासून हादरवून टाकणारा होता. या घटनेनंतर अमेरिका अंर्तबाह्य बदलली.

देशात येणाऱ्या माणसाचं स्वागत करणारी अमेरिका आता प्रत्येकाकडे संशयानं पाहू लागली.

बुश यांच्या प्रशासनानं दहशतवादाविरोधातली लढाईची मोहीमच उघडली.

अफगाणिस्तान आणि इराण देशांमध्ये अमेरिकेनं पुकारलेल्या लढाईमुळे प्रचंड प्रमाणावर मनुष्यबळ आणि खजिना रिता झाला.

2008 मध्ये लेहमन ब्रदर्स बँकेचं डबघाईला येणं आणि त्यापाठोपाठ आलेल्या आर्थिक मंदीनं अमेरिकेचं कंबरडंच मोडलं.

9/11 दुर्घटनेनं अमेरिकेच्या नागरिकांच्या, सुरक्षा यंत्रणांवरच्या विश्वासाला तडा गेला. तर आर्थिक मंदीनं आर्थिक स्थैर्याबद्दलच्या धारणेला छेद दिला.

नव्या पिढीला चांगलं आयुष्य देता येईल, याची शाश्वती अमेरिकेतल्या मध्यमवयीन पालकांना वाटेना. यातूनच एक मानसिक अस्थिरता निर्माण झाली.

2001 ते 2011 या दशकभरात अमेरिकेतल्या सर्वसामान्य माणसाची आर्थिक पत घसरली.

2014च्या उत्तरार्धापर्यंतच्या अभ्यासानुसार, अमेरिकेतील 1 टक्का श्रीमंतांकडे उर्वरित 90 टक्के जनतेपेक्षा जास्त पैसे असल्याचं स्पष्ट झालं आहे.

69 दशलक्ष अमेरिकेच्या जनतेनं बराक ओबामा यांच्याबाजूनं मतदान केलं.

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कृष्णवर्णीय व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाली.

'येस वुई कॅन' हे त्यांचं निवडणुकीतलं घोषवाक्य अत्यंत लोकप्रिय झालं.

सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या बराक हुसेन ओबामा यांचा प्रवास अमेरिकेतल्या प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी ठरली.

ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी पावलं उचलली. मात्र दुभंगलेल्या समाजाला ते एकत्र आणू शकले नाहीत.

ओबामा यांच्या काळात अमेरिकेच्या समाजाची विविध मतप्रवाहांमध्ये शकलं झाली.

निवडणुकीपूर्वी आणि राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ओबामा ज्या तत्त्वांविषयी, धोरणांबाबत बोलत होते. त्या सगळ्या मुद्यांना तिलांजली मिळाली.

ढासळणारा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न ओबामा प्रशासनानं केला. मात्र सातत्यानं त्यातला फोलपणा उघड झाला.

ओबामा पर्वाचा अस्त होत असतानाच डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यकाळाचे पडघम वाजू लागले होते.

ट्रंप यांची ध्येयधोरणं पूर्णत: वेगळी होती. ट्रंप हे रेगन नाहीत.

तीन दशकांच्या कालावधीत सकाळच्या प्रसन्नतेतून कातरवेळचं संक्रमण झालं.

राष्ट्राध्यक्षपदी त्यांची निवड होणं हे अमेरिकेतल्या विचारवंतांना धक्का देणारं होतं.

ट्रंप अध्यक्ष होणं हा ऐतिहासिक अपघात असल्याचं मत जागतिक स्तरावर व्यक्त झालं.

खंडप्राय अमेरिकेवर कोण राज्य करणार हा निर्णय तीन राज्यांच्या मतदारांनी ठरवला.

पेनसिल्व्हानिया, मिशिगन आणि व्हिस्कॉन्सिन या राज्यांनी मिळून 77, 744 मतं ट्रंप यांना दिली.

1984 ते 2016 या कालावधीतील अमेरिकेच्या राज्यकारणातील उदयास्त लक्षात घेतले तर ट्रंप यांच्या निवडीचं आश्चर्य वाटत नाही.

ट्रंप यांचा विजय हा अमेरिकेतल्या राजकारण, संस्कृती आणि समाजातील विविध बदलत्या समीकरणांची परिणती होती.

ट्रंप यांची अमेरिका

अंदाधुंद गोळीबाराची प्रकरणं अमेरिकेला नवीन नाहीत.

1984 मध्ये मी अमेरिकेत आलेलो तेव्हा सॅनडिएगो शहरात एका अज्ञात इसमानं बेधुंद गोळीबार करत 21 लोकांचा जीव घेतला.

ट्रंप यांच्या कालखंडात गोळीबाराची प्रकरणं नियमितपणे घडू लागली.

हॉटेल्स, कॅफे, शाळा, स्टेशनं... काहीही सुरक्षित राहिलं नाही.

शस्त्रास्त्रं इतक्या सहजपणे कशी उपलब्धं होतात आणि ते कोणीच रोखू शकत का नाही, यावर उलटसुलट चर्चा झाल्या. पण हाती काहीच लागलं नाही.

काही दिवसांपूर्वीच ट्रंप यांच्या एका पत्रकार परिषदेला उपस्थित होतो.

आफ्रो-अमेरिकन वंशाचा कॅमेरामन मोठ्यानं बोलत होता. हा माणूस शालेय मुलामुलींसमोर काय आदर्श ठेवणार?

या प्रश्नाचं उत्तर कोणीच देऊ शकलं नाही. पण, अमेरिकेच्या विविध राज्यातले पालक दररोज याप्रश्नी चिंता व्यक्त करतात.

ट्रंप यांच्याप्रमाणे आपली मुलं बोलू लागली, तर काय याचं उत्तर या पालकांकडे नाही.

न्यूयॉर्क स्टॉक एक्सेंज दरवर्षी नवनवे उच्चांक गाठत आहे. व्यापारी आणि व्यावसायिक वर्ग खूश आहे.

मात्र त्याचवेळी बेरोजगारीनं 16 वर्षांतला निचांक गाठला आहे.

62 दशलक्ष लोकांनी ट्रंप यांना राष्ट्राध्यक्षपदी निवडून दिलं आहे. या मंडळींना ट्रंप म्हणजे अजूनही मसिहा वाटत आहेत.

दुसरीकडे ट्रंप यांच्या वागण्यानं, धोरणांनी अस्वस्थ लोकांना त्यांची नियुक्ती म्हणजे राष्ट्रीय नामुष्की वाटतं आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचे शत्रू ओबामांपेक्षा ट्रंपच्या नेतृत्त्वाला अधिक वचकून आहेत.

तर, ट्रंप यांच्या कार्यकाळात मित्रराष्ट्र अमेरिकेला गृहीत धरत नाहीत. अमेरिका फर्स्ट हे त्यांचं धोरणही वादग्रस्त ठरलं आहे.

पॅरिस हवामान बदल करार आणि इराण आण्विक अस्त्र करार यामध्ये अमेरिकेनं स्वत:चं म्हणणं खरं केलं.

ट्रंप यांनी ट्वीटरच्या माध्यमातून तोडलेले तारे जगभरात चर्चेचा विषय ठरले आहेत.

सोशल मीडिया अस्त्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक शत्रूंना अंगावर घेतलं आहे.

ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्यातील वादानं अण्विकयुद्ध भडकू शकतं असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.

'द इकॉनॉमिस्ट' नियतकालिकात ट्रंप यांच्या ध्येयधोरणांवर कडाडून टीका केली जाते.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग जगातले सगळ्यात शक्तिशाली नेते आहेत, अशी भूमिका इकॉनॉमिस्टनं घेतली आहे.

प्रत्येक मुद्दयावर अमेरिकेचा आडमुठेपणा अन्य देशांना सलतो. 'ओन्ली अमेरिका' या संकल्पनेकडे उपहासानं पाहिलं जातं.

अब्राहम लिंकन यांच्यासारखा अध्यक्ष असल्याच्या ट्रंप आणि व्हाइट हाऊसच्या दाव्याची खिल्ली उडवण्यात आली.

आपल्या प्रशासनावर टीका करणाऱ्या माध्यमसंस्थांचे परवाने रद्द करण्याची धमकी त्यांनी दिली आहे.

दररोज सकाळी ट्रंप यांचं अतरंगी ट्वीट पाहणं अमेरिकेच्या नागरिकांसाठी नित्याचा भाग झाला आहे.

अमेरिकेचं सत्ताकेंद्र असलेल्या वॉशिंग्टनचा ठहराव विसकळीत झाला आहे.

न्यूयॉर्क ही आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी आहे. सॅन फ्रान्सिस्को तंत्रज्ञानाचं केंद्र आहे.

बोस्टन शिक्षणाचं माहेरघर आहे. तर हॉलीवूड मनोरंजन विश्वाचा बालेकिल्ला आहे. या शहरांवर वॉशिंग्टनला तारण्याची जबाबदारी आहे.

उबर कंपनीच्या घोटाळ्यानं कॉर्पोरेट क्षेत्रातील नैतिकतेची लक्तरं वेशीवर टांगली गेली आहेत.

अमेरिकेच्या विद्यापीठांची आजही जगातल्या सर्वोत्तम शिक्षणसंस्थांमध्ये नोंद होते.

मात्र या विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्यांचं व्यवस्थेला योगदान काय हा प्रश्न अनुत्तरित आहे.

अमेरिकेतल्या नोकऱ्यांपैकी 40 टक्के ठिकाणी कॉम्प्युटर आणि मशीन असतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

अमेरिकेचे नागरिक कुठल्या मुद्यावर एकत्र येणार हेच समजत नाही. शस्त्रास्त्रांचा वाद असो, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा वाद असो की सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत म्हणण्याचा वाद असो.

किंवा 9/11 या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्यांना आदरांजली वाहणं असो, अमेरिका अद्यापही तुकड्यांमध्येच असल्याचं जाणवतं.

स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून इथं विरोधी तट पडले आहेत.

खूप वर्षांपूर्वी मी अमेरिकेत आलो होतो तेव्हा एकत्रीकरणाची भावना होती.

आता अमेरिकेला तशाच एकीची गरज आहे. तसं झालं तरच अमेरिका पुन्हा बावनकशी अमेरिका होऊ शकते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)