You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रंप यांच्या दौऱ्यातून आशियाला काय मिळेल?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप सध्या आशिया दौऱ्यावर आहेत. उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा ठरतो आहे.
शिवाय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर डोनाल्ड ट्रंप पहिल्यांदाच आशिया खंडाच्या दौऱ्यावर आहेत.
5 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत ट्रंप यांनी जपान, दक्षिण कोरिया, चीन, व्हिएतनाम आणि फिलिपाइन्स या देशांना भेटी देणार आहेत. बीबीसीच्या त्या-त्या देशांच्या राजधानीमधील प्रतिनिधींनी ट्रंप यांच्या या भेटीत काय अपेक्षित होतं, याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
दक्षिण कोरिया : 'उत्तरे'च्या विरोधात मदत (मार्क ओवेन, बीबीसी न्यूज, सेऊल)
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उत्तर कोरियाच्या शस्त्रास्त्र कार्यक्रमाविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका आणि दक्षिण कोरिया सोबतच्या मुक्त व्यापाराला ट्रंप यांनी केलेला विरोध यामुळे या देशात थोडी असुरक्षेची भावना आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि दक्षिण कोरियातील मैत्रीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होणं. तसंच मुक्त व्यापाराला पाठबळ मिळणं या दौऱ्यात अपेक्षित आहे. महत्त्वाचं म्हणजे प्योंगयांगला विरोध करतानाच मुत्सद्देगिरीचा दरवाजा बंद न करणे अशा काही बाबी दक्षिण कोरियाला अपेक्षित आहेत.
जपान - मैत्रीची पुन्हा शाश्वती (रुपर्ट विंगफील्ड हेज, बीबीसी न्यूज, टोकयो)
जपानचे राष्ट्राध्यक्ष शिंजो आबे हे ट्रंप यांचे अशियातील सर्वोत्तम मित्र म्हणवून घेतात. पण, ते काळजीत आहेत, त्याचं कारण म्हणजे ट्रंप यांची अमेरिका फर्स्ट ही घोषणा होय.
त्यांच्या या घोषणेमुळं आता अमेरिकेचा प्राधान्यक्रम बदलणार का? अशी शंका आहे आणि या सगळ्यांत अमेरिकेचा आशिया खंडातील जुना मित्र जपान कुठं बसतो?
चीन - व्यापारात सुधारणा (स्टिफन मॅकडोनेल, बीबीसी न्यूज, बीजिंग)
ट्रंप यांनी शी जिनपिंग यांचा उल्लेख चीनचे राजे असा केला आहे. जिनपिंग यांच्या फेरनिवडीवर अनेक विश्लेषणं झाली.
पण व्यापार आणि उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांशी कसा सामना करायचा हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी असतील. अमेरिका आणि चीनमधील व्यापारात सुधारणा होणं, हा मुद्दा दौऱ्याच्या केंद्रस्थानी असणार आहे.
व्हिएतनाम - लष्करी सहकार्य (जोनाथन हेड, बीबीसी आग्नेय आशिया प्रतिनिधी)
अमेरिकेचा जुना शत्रू असलेल्या व्हिएतनामसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न बराक ओबामा यांच्या प्रशासनाने केले होते.
ट्रंप यांच्याकडूनही अशाच अपेक्षा आहेत. दोन्ही देशांतील लष्करी सहकार्य वाढलेलं आहे. व्हिएतनामचा वापर चीनला शह देण्यासाठी एकेकाळी अमेरिका करत होती.
अमेरिकेची व्यापारी तूट कमी होण्यासाठी व्हिएतनामनं अधिकाधिक अमेरिकन उत्पादन विकत घ्यावीत असा प्रयत्न ट्रंप यांचा असणार आहे.
फिलिपाइन्स - परस्पर संबधात सुधारणा (होवार्ड जॉन्सन, बीबीसी न्यूज, मनिला)
परस्पस संबंधात सुधारणा हा मुद्दा सर्वोच्च स्थानी असणार आहे. फिलपाइन्स सरकारनं अमली पदार्थांविरोधात सुरू केलेल्या कठोर कारवाईवर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी टीका केली होती.
तर फिलिपाइन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ओबामा यांच्यावर टीका केली होती. पण अमेरिकेतील नव्या सरकारमुळं परिस्थिती बदलली आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो ड्युटर्टी यांचं कौतुक केलं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)