You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#MeToo चळवळीबद्दल मोदी सरकारच्या महिला मंत्री काय म्हणतायत?
देशात सध्या सर्वाधिक चर्चिला जाणार विषय म्हणजे #MeToo. दररोज या मोहिमेत नवनवीन लोकांची नावं समोर येत आहेत. अनेक नेते, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते तसंच पत्रकार आणि संपादकांचं नाव यात समोर आलं आहे.
भारतात या चळवळीनं जोर धरल्यानंतर शुक्रवारी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयानं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांची एक तपास समिती नेमण्याची घोषणा केली आहे.
हे स्वागतार्ह असलं तरी मोदी सरकारसाठी एक नाव सध्या चिंतेचं कारण बनलं आहे - परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर. त्यांच्यावर अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत.
दुसरीकडे मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक महिला मंत्री या विषयावर मात्र गुळमुळीत भूमिका घेताना दिसून येत आहेत. नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज स्वराज यांनी याबद्दल अद्याप एखादं ट्वीटही केलेलं नाही.
स्वराज यांना #MeToo किंवा अकबर यांच्यावरील आरोपांविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आणि त्या निघून गेल्या.
वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी कुणाचंही नाव न घेता बोलणं पसंत केलं. "या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप लागले आहेत, तेच याच्यावर उत्तर देऊ शकतात, एवढं मी सांगू शकते," असं इराणी यांसंबंधी म्हणाल्या.
स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे की, "मीडियातल्या महिला यासंबंधी बोलत आहेत, याचा मला आनंद आहे आणि ज्यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांनी यावर स्पष्टीकरण द्यायला हवं. यावर मी बोलू शकत नाही कारण मी घटनास्थळी उपस्थित नव्हते."
#MeToo मोहिमेवर बोलताना त्यांनी म्हटलं की, "ज्या महिला त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट वर्तणुकीविषयी बोलत आहेत त्यांना याबद्दल वाईट वाटता कामा नये."
एका टीव्ही चॅनेलशी बोलताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी #MeToo मोहिमेला पाठिंबा दिला. असं असलं तरी त्यांनी एम. जे अकबर यांच्यावरील आरोपांबद्दल काही प्रतिक्रिया दिली नाही.
"आपले अनुभव सांगणाऱ्या महिलांचा मी आदर करते. या महिलांना वाईट प्रसंगातून जावं लागलं असेल आणि असं समोर येण्यासाठी खूप ताकद लागते," असं त्या म्हणाल्या.
केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी "राजकीय व्यक्तींवरील आरोपांसहित सर्वांची चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी केली.
केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर यांनी #MeToo बद्दल ट्वीट केलं आहे. "या मोहिमेअंतर्गत महिलांबद्दलच्या ज्या घटना समोर येत आहेत, त्यांच्याबद्दल विचार केल्यास खूप वाईट वाटतं. समाजातल्या वाईट गोष्टींविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक महिलेसोबत मी आहे," असं त्या म्हणाल्या.
केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री उमा भारती यांनीही #MeToo बद्दल प्रतिक्रिया दिली आहे. इंडियन एक्सप्रेसनुसार त्या म्हणाल्या, "#MeToo एक चांगली चळवळ आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी चांगले बदल घडून येतील. महिलांना वाईट वागणूक देण्याचा पुरुष विचार करणार नाही. यामुळे महिला न भीता काम करू शकतील आणि फक्त महिला असल्यामुळे कुणी त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्या शांत बसणार नाही. पुरुषांनी आता सजग राहायला हवं."
कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांनी ट्वीट करत महिलेला शक्तीचं रूप म्हटलं आहे. पण #MeTooबद्दल त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पुरुष मंत्र्यांचंही मौन
एम. जे. अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मोदी सरकारमधील पुरुष मंत्र्यांनीसुद्धा काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्रकार परिषदेत #MeTooबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा पत्रकार परिषदेशी संबंधित मुद्द्यावरच प्रश्न विचारण्यात यावे, असं त्यांनी म्हटलं.
स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही #MeToo मोहिमेवर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)