You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सतीश उके, प्रदीप उके यांना ED कडून अटक, आज मुंबई कोर्टात हजर करणार
- Author, प्रवीण मुधोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी नागपूरहून
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नागपूर येथील वकिल सतीश उके आणि त्यांचा भाऊ प्रदीप उके यांना अटक केली आहे. त्यांना आज मुंबई येथील कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
ED ने सतीश उके यांच्या घरावर गुरुवारी (31 मार्च) पहाटे पाच वाजता छापा टाकला होता. नागपुरमध्ये जमीन बळकावल्या 2 प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती मिळाली आहे. यामध्ये उके यांच्यावर 11 कोटींच्या मनी लाँडरिंगचा आरोप लावण्यात आलेला आहे.
दक्षिण नागपुरातील पार्वतीनगरात उके यांच्या निवासस्थानावर पहाटे 5 वाजता ईडीचे अधिकारी दाखल झाले होते.
पाच तासांच्या झाडाझडतीनंतर ईडीने सतिश उके यांना अटक केली, अशी माहिती उके यांचे वकील कमाल सतुजा यांनी माहिती दिली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सतीश उके यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांना नागपूरच्या ईडीच्या कार्यालयात नेलं.
"अंमलबजावणी संचालनालयाच्या आमच्या नागपूर येथील कार्यालयातील अधिकारी अॅडव्होकेट सतिश उके यांच्या घरावर छापेमारी करण्यासंदर्भात गेले," अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीला दिली.
सतिश उके यांच्यावरील कारवाईचा त्यांचे सहकारी वकील निहालसिंग राठोड यांनी निषेध केला आहे.
"अॅड. उके हे एक प्रकारे whistleblower चे काम करत आहेत. ते समाजासाठी काम करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांच्या घोटाळ्यासंदर्भात ते उघडपणे न्यायालयीन लढाई लढत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील निवडणूक याचिकेतूनही त्यांनी लढा दिला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या हातातील बाहुले बनलेल्या ईडीने ही कारवाई केली आहे," असं राठोड म्हणाले आहेत.
उके कुटुंबियांचं म्हणणं काय?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच ईडीने सतीश उके यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
"सतिश उके यांच्याकडे न्या. लोया मृत्यू प्रकरणी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात महत्त्वाची माहिती होती. त्याआधारे भविष्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता होती. त्यामुळेच ईडीकडून सतिश उके यांच्यावर कारवाई करण्यात आली," असा आरोप सतिश उके यांचे भाऊ प्रदीप उके यांनी केला आहे.
"सतिश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अनेक केसेस केल्या होत्या. यापैकी एका प्रकरणाचा निकाल तीन ते चार दिवसांत लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आमच्या घराची रेकी सुरु होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केवळ सतीश उके यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला आहे. त्यामध्ये अनेक कागदपत्रे आहेत.
"भविष्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर होऊ शकणाऱ्या केसेस बघण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी हा लॅपटॉप ताब्यात घेतला असावा. तसंच आर्किटेक्ट निमगडे हत्याकांड आणि न्या. लोया मृत्यू प्रकरणा विषयीही लॅपटॉपमध्ये महत्त्वाची माहिती होती," असा दावाही प्रदीप उके यांनी केला आहे.
ईडीचे अधिकारी घरातून बाहेर पडल्यानंतर सतिश उके यांच्या कुटुंबीयांनी बीबीसीला सांगितलं की,"सकाळी साडेपाच वाजता ईडीचे अधिकारी सुरक्षारक्षकांचा फौजफाटा घेऊन आमच्या घरी आले. अधिकाऱ्यांनी आम्हा सर्वांचे मोबाईल फोन जप्त केले. फक्त मुलांना शाळेत जाऊन देण्याची मुभा दिली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सतिश उके आणि प्रदीप उके यांच्या खोलीची झडती घ्यायची असल्याचं सांगितलं. त्यांना काहीतरी कागदपत्रं हवी होती."
कोण आहेत सतिश उके?
व्यवसायाने वकील असलेले सतिश उके हे गेल्या सात वर्षांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कोर्टात विविध याचिका दाखल करण्यावरून चर्चेत आले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सतिश उके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
2014 च्या निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्र सादर करताना देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप सतिश उके यांनी केला होता.
मागील आठवड्यात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात फोन टॅपिंग प्रकरणातील वक्तव्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 500 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला होता. हा मानहानीचा दावा सतिश उके यांनीच नाना पटोले यांच्या वतीने पाठविला होता.
नाना पटोले यांच्या अनेक केसेसमध्ये सतिश उके हेच वकील म्हणून काम पाहत आहेत. सीबीआय विशेष न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश दिवंगत बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणातही याचिका उके यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.
काँग्रेस पक्षाशी जवळीक
सतिश उके यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी जवळीक आहे. मध्यंतरी नाना पटोले यांनी मोदींचा उल्लेख करत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
पंतप्रधान मोदी यांच्याविषयी अवमानजनक भाषा वापरल्याने भाजप पटोले यांच्याविरुद्ध आक्रमक झाली होती. या प्रकरणात पटोले यांच्यावर कारवाई होण्याची मागणी केली जात होती. त्यावेळी पटोले यांनी आपण पंतप्रधान मोदी नव्हे तर गावगुंड मोदीवर टिप्पणी केल्याची सारवासारव केली होती.
मात्र, पटोले यांचा हा युक्तिवाद कोणीही ऐकून घ्यायला तयार नव्हते. त्यावेळी सतिश उके यांनी पुढाकार घेत गावगुंड मोदीला शोधून काढलं होतं. नागपुरात पत्रकार परिषद घेऊन त्याला स्पष्टीकरण द्यायला लावलं होतं. याशिवाय, विदर्भातील भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही सतिश उके यांनी अनेक आरोप केले आहेत.
सतिश उके यांच्यावरील धाडीचे कारण काय?
भूखंड व्यवहारातील आर्थिक प्रकरणाच्या तपासासाठी ही धाड टाकल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे.
नागपूर शहरातील एका भूखंड व्यवहारातील आर्थिक प्रकरणाच्या तपासासाठी ईडीने ही धाड टाकल्याचं या अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)